जालना : एकही शेतकरी पंचनाम्यात वंचित नाही राहू नये. नुकसान झालेल्या प्रत्येक भागाचा पंचनामा करण्यात यावा. शेती, गुरे, विहिरी या सर्व गोष्टींचे पंचनामे करा, असे निर्देश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवार, २४ सप्टेंबर रोजी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जालना जिल्ह्यातील बदनापूर तसेच अंबड तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांना थेट दूरध्वनीवरून सूचनादेखील दिल्या. ते म्हणाले की, "जालना जिल्ह्यात प्राथमिक स्वरूपात २ लाख ५४ हजार एकर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. तर, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये प्राथमिक अंदाजानुसार राज्यात ३३ लाख ५१ हजार १७५ हेक्टर म्हणजे ८३ लाख ७७ हजार ९३७ एकर क्षेत्र बाधित आहे. सप्टेंबर महिन्यात जास्त पाऊस पडला आहे. कृषी विभाग आणि महसूल विभागाकडून पंचनाम्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील आज नुकसानग्रस्त भागांची पाहणी करत असून त्यांचे सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष आहे. लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत."
पंचनामा राहिला तर अधिकारी जबाबदार
“शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही राज्य शासनाची प्राथमिकता आहे. कुठल्याही शेतकऱ्याला मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही. ज्यांचे नुकसान झाले आहे, त्याची नोंद करून घ्या. शेतकऱ्याच्या एक गुंठ्याचा पंचनामा जरी राहिला तर त्याला तुम्ही जबाबदार असाल. शेतकरी खूप अडचणीत असून तो वंचित राहणार नाही याची काळजी घ्या," असेही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बजावले.
यावेळी शेतकऱ्यांनी सोयाबीन, कपाशी, तूर यांसारख्या पिकांचे नुकसान, जमिनीवर पाणी साचल्याने उभ्या पिकांची झालेली हानी, रस्ते आणि पायाभूत सुविधांवर झालेला परिणाम याबाबत मंत्री दत्तात्रय भरणे यांना माहिती दिली. दरम्यान, त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ फोन करत योग्य त्या सूचना दिल्या.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....