अध्यात्मातून प्रबोधनाकडे नेणारी ‘प्रायोगिक संस्था’

    24-Sep-2025   
Total Views |

देवी दुर्गेची भक्ती आणि शक्तीचे प्रतीक असलेली डोंबिवलीतील ‘प्रायोगिक संस्था’ ही नवरात्रोत्सवात व्यसनमुक्तीचा जागर करते. त्यांच्या या जनजागृतीमुळे ही संस्था नवरात्रोत्सवाच्या इतर मंडळांपेक्षा वेगळी ठरते. अध्यात्मातून प्रबोधन करणार्‍या या संस्थेच्या कार्यावर टाकलेला प्रकाश...

डोंबिवली पश्चिमेतील गरिबाचा वाडा येथे ‘मांगल्य कॉम्प्लेस’ येथे प्रायोगिक संस्थेकडून नवरात्री उत्सव साजरा केला जातो. सुरुवातीला म्हणजेच २००२-०३ मध्ये ‘मांगल्य कॉम्प्लेस’ येथे नवरात्रोत्सव साजरा केला जात होता. मात्र, सोसायटीतील अंतर्गत वादामुळे हा उत्सव ‘मांगल्य कॉम्प्लेस’च्या बाहेरील बाजूस रस्त्यावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येऊ लागला. संस्थापक रविंद्र गुरचळ यांच्यासह बहुतांशी विद्यार्थी आणि काही समवयस्क मंडळींनी एकत्र येऊन हा उत्सव सोसायटीपुरता मर्यादित न ठेवता, त्यांचे स्वरूप विस्तीर्ण केले. २००४ साली हा उत्सव सर्वांसाठी खुला करण्यात आला. अभिजीत दळवी यांच्या घरातील देवीचा फोटो आणून उत्सव सुरू केला. उत्सव साजरा करताना आर्थिक अडचणी संस्थेच्या समोर आ वासून उभ्या होत्या. पण, कार्यकर्त्यांनी हार मानली नाही. बहुतांशी कार्यकर्ते हे विद्यार्थीदशेत होते. त्यामुळे त्यांच्याकडून मंडळाला फारशी मदत होणार नव्हती. या कार्यकर्त्यांनी पावती पुस्तक घेऊन वर्गणी गोळा केली. कोणी ऐच्छिक जी वर्गणी देईल, ती वर्गणी त्यांनी स्वीकारली व त्यातून या सार्वजनिक उत्सवाचा श्रीगणेशा झाला. संस्थेने पहिला नवरात्रोत्सव ३५ हजार रु. खर्चात साजरा केला. पण, उत्तरोत्तर मंडळांची प्रगती होत गेली. आजच्या घडीला दहा लाख रु. खर्चात हा उत्सव साजरा केला जात आहे. संस्थेने १८ वर्षे हा उत्सव देवीच्या फोटोची पूजा करून साजरा केला. २०२३ साली देवीची मूर्ती आणून उत्सव साजरा करण्यात येऊ लागला. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष चंदन चौकेकर यांच्या पुढाकाराने देवीची मूर्ती आणि अष्टमीला देवीचा भंडारा घालण्याची प्रथा सुरू करण्यात आली. मागील वर्षी सुमारे १ हजार, ८५० भक्तांनी भंडाराचा लाभ घेतला. यंदाच्या वर्षी सुमारे २ हजार, ५०० भक्त भंडार्‍याचा लाभ घेतील, असा विश्वास दळवी यांनी व्यक्त केला.

संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे, यात कोणीही राजकीय पक्षाचे पदाधिकारी किंवा एखाद्या मोठ्या पदावर असलेली व्यक्ती नाही. त्यामुळे ‘कॉमन मॅन’ने ‘कॉमन मॅन’साठी सुरू केलेला ’सार्वजनिक उत्सव’ म्हणून हा उत्सव ओळखला जातो. नवरात्रोत्सव सुरू झाला, तेव्हा विद्यार्थीदशेत असलेले कार्यकर्ते आता नोकरी व्यवसाय करू लागले आहेत. पण, नोकरी-व्यवसाय सांभाळून ते संस्थेच्या कामाला आणि उत्सवाला पुरेसा वेळ देतात. या नवरात्र उत्सवात ७० ते ८० टक्के महिला दांडिया खेळण्यासाठी येतात. दांडियासाठी दिलेल्या वेळेचे काटेकोरपणे पालन केले जाते. संस्थेच्या उत्सवाला कोणतेही गालबोट लागणार नाही, याची पूर्णपणे दक्षता घेतली जाते. त्यामुळे सुरक्षित वातावरण वाटत असल्याने महिला मोठ्या संख्येने गरबा खेळण्यासाठी हजेरी लावतात. परिसरातील सरोवर नगर, महाराष्ट्र नगर, श्रीधर म्हात्रे नगर अशा विविध ठिकाणांच्या महिलांसह, तरुणाई येथे हजेरी लावतात. गेल्या २१ वर्षांत उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, हे संस्थेकडून अभिमानाने सांगितले जात आहे.

संस्थेकडून नवरात्र उत्सवासोबतच सामाजिक बांधिलकीही जपली जात आहे. नवरात्रोत्सव हा स्त्रीशक्तीचा उत्सव म्हणूनदेखील ओळखला जातो. देवी स्त्रीत्वाला समर्पित आहे आणि देवी दुर्गेच्या विविध रुपांच्या आणि तिच्या राक्षसांवरील विजयाच्या स्मृती जागवते, असे या उत्सवाचे धार्मिक महत्त्व मानले जाते. त्यामुळे या स्त्रीशक्तीच्या जागरात स्त्रियांचादेखील सन्मान केला जातो. ज्या स्त्रियांना एक किंवा दोन मुली आहेत. व त्यांनी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केलेली आहे. अशा तीन महिलांचा ‘जय माता दी’ पुरस्कार देऊन गौरव केला जातो. या पुरस्कारातून मुलगा आणि मुलगी समान असल्याचा संदेश दिला जात आहे. या व्यतिरिक्त संस्थेकडून अनेक उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या जातात. नवरात्र उत्सवात येणार्‍या रविवारी चित्रकला स्पर्धा भरविली जाते. चित्रकला स्पर्धेत तीन उत्कृष्ट चित्रांना पारितोषिक दिले जाते, तर फॅन्सी ड्रेस स्पर्धेत शून्य ते १२ या वयोगटातील मुले सहभागी होत असतात. या मुलांना तयार करण्यासाठी त्यांचे पालक कष्ट घेत असतात. त्यामुळे या स्पर्धेत प्रथम तीन पारितोषिके काढली जातात. पण त्याचबरोबर स्पर्धेत सहभागी होणार्‍या प्रत्येकाला पारितोषिकाने गौरविले जाते. ‘खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम ही संस्थेकडून राबविला जातो. या खेळात लकी ड्रॉ पद्धतीने महिलांची नावे काढली जातात. विजेत्या महिलांना पैठणी देऊन सन्मानित करण्यात येते. हा लकी ड्रॉ दांडियाच्या शेवटच्या दिवशी काढला जातो. महाआरतीचे आयोजन केले जाते.

संस्थेच्या नवरात्र उत्सवासाठी गेल्या २० वर्षांपासून ‘त्रिमूर्ती डिजिटल ग्रुप’चे कैलास म्हात्रे हे बॅन्जो वाजवितात. त्यांच्या बॅन्जोवादनामुळे गर्दी मोठ्या प्रमाणात खेचली जाते. त्यामुळे उत्सवाला गर्दी खेचण्यात म्हात्रे यांचा मोठा हात आहे. म्हात्रे यांच्या बॅन्जोच्या तालावर तरुणाईसह महिला दांडियाचा फेर धरतात. मंडप डेकोरेटरचे काम ‘हायलाईट मंडप डेकोरेटर्स’ प्रदीप केणे पाहतात.

संस्थेकडून प्रतिस्थापना करण्यात येणार्‍या मूर्तीची उंची सुमारे पाच फूट आहे. प्रति तीन वर्षांनी मूर्तीचा आकार थोडाफार वाढवला जातो. २०२६ मध्ये मूर्तींची उंची वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी मंडळ कार्यकारिणीतून चांगल्या सूचना ही येत आहे. सध्या नवीन पिढीच्या हातात धुरा दिल्याने त्यांच्याकडून नवीन संकल्पना मांडल्या जात आहेत. देवीच्या मूर्तीला नवरात्रीतील रंगाप्रमाणे साडी नेसवून साजशृंगार केला जातो. आश्विनी शिंदे या रात्री १२ वाजता सोहळे उरकून मंडळात हजर होतात. देवीला साडी नेसवून साजशृंगार करतात. हा कार्यक्रम रात्री २.३० वाजेपर्यंत चालतो.

संस्थेकडून पुढील वर्षी मूर्ती बदलताना देवीच्या विविध रुपांतील मूर्ती आणण्याची संकल्पना पुढे आली आहे. ही संकल्पना अनेकांना आवडली आहे. संस्थेतील प्रत्येकाने त्याला होकार दिल्यास पुढील वर्षीपासून या संकल्पनेला मूर्त स्वरूप दिले जाईल. सध्या सोशल मीडियाचा काळ आहे. त्यामुळे दांडियाला येणार्‍या प्रत्येकाकडून इन्स्ट्राग्रामला सबस्क्रिपशन करून घेतले जाते. त्यावर त्यांना काही ऑफर्सही दिल्या जातात. आता आरोग्यतपासणीवर पाच टक्क्यांची सूट दिली आहे, असे ही दळवी यांनी सांगितले.

व्यसनमुक्तीचा जागर
सध्याच्या पिढीत व्यसनाधीनता वाढत आहे. तरुण पिढीने त्या मार्गाला जाऊ नये आणि एक सुदृढ, सशक्त भारत निर्माण व्हावा, याकरिता व्यसनमुक्तीविषयी जनजागृती दांडियातून केली जाते. त्यात विशेष भर हा दारूमुक्तीवर दिला जातो. दारूमुक्तीविषयी जनजागृती करणारे बॅनर्स तयार केले जातात. ते बॅनर दांडिया खेळण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या हातात देऊन जनजागृती केली जाते. हा उपक्रम संस्थेत गेल्या दहा वर्षांपासून राबविला जात आहे. दारू सोडलेल्या तीन व्यक्तींचादेखील संस्थेतर्फे सत्कार केला जातो. विशेष म्हणजे, हा सन्मान विष्णुनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या हस्ते केला जातो. या उत्सवात विष्णुनगर पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी वर्ग सहभागी होतो.