आई राजा उदे उदे!

    24-Sep-2025   
Total Views |

नवरात्रोत्सव साजरा करताना हिंदू म्हणून प्रत्येक समाजाच्या भावना, श्रद्धा समान आहेत. देवीची विविध रूपे शक्तिसमान मानून पूजण्याची परंपराही समान आहे. तरीसुद्धा हिंदूंमधील विविध समाज नवरात्रीमध्ये पारंपरिकरित्या देवीची पूजा करत असतो. पूजेअर्चेमध्येही समाजाचे वैशिष्ट्य जपत असतो. नवरात्रीमध्ये देवीचा गोंधळ घालणार्‍या आणि देवीच्या नावाने जोगवा मागणार्‍या गोंधळी समाजाच्या चालीरिती परंपरा काय असतील, याचा मागोवा घेणारा हा लेख...

"छत्रपती शिवाजी महाराज गळ्यात कवड्यांची माळ घालत. काही कादंबर्‍यांमध्ये असेही वर्णन आहे की, ते तुळजाभवानीमातेच्या नावाने जोगवा मागत आणि पोतही नाचवत. इतकेच काय, छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक मोहिमेवर जाताना आईचा गोंधळ घालत असत. तो जो गोंधळ आहे, ती जी देवीस्तुती आहे, तो खरा गोंधळ होय,” ‘विश्व गोंधळी परिषद संघटने’चे अध्यक्ष विश्वास दोरवेकर सांगत होते. गोंधळी समाजाचे संघटन, तसेच समाजाच्या चांगल्या परंपरांचे संवर्धन तसेच समाजाच्या उत्थानासाठी ते काम करतात. समाजाबद्दल त्यांचा गाढा अभ्यास आहे. पुण्यामध्ये मंगळवार पेठेमध्ये ‘शिव कैलास मंडळ’ हे गेली ४२ वर्षे नवरात्र उत्सव साजरा करते. विश्वास दोरवेकर हे या संस्थेचे कार्याध्यक्ष आहेत, तर तेली समाजाचे रमेश बेलखेडे हे अध्यक्ष असहेत.

नवरात्रीमध्ये नऊ दिवस गोंधळी समाजाच्या नवरात्री पूजनासंदर्भात काय परंपरा आहेत, यावर त्यांच्याशी आणि गिरिधर साळुंखे यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार जोगवा परंपरेबद्दलची माहिती अशी की, अशी आख्यायिका आहे की, देवीच्या मुलाचे नाव ‘जोगवा’ होते. तो हरवला. त्यामुळे मग देवी घरोघरी जाऊन म्हणते, "माझा जोगवा द्या.” ही कथा प्रतीकात्मक आहे. ही परंपरा पुढेही चालत आली आणि विशेषतः नवरात्रीला गोंधळी समाजाच्या महिला नऊ दिवस उपवास करतात. घरात घट बसवतात. टोपलीमध्ये वारुळाची माती आणून त्यामध्ये नऊ प्रकारच्या धान्यांची बिजे टाकतात. नऊ दिवसांत त्या बिजातून रोपं तरारतात. दसर्‍याच्या दिवशी ही टोपली आंब्याच्या किंवा आपट्याच्या झाडाखाली नेऊन ठेवली जाते. या उपवासामध्ये नऊ दिवस महिलांनी पलंगावर बसणे किंवा झोपणे वर्ज्य असते. उपवास करणार्‍या महिला नऊ दिवसांत जोगवा मागतात. तुळजाभवानी माता, यल्लमामाता, रेणुकामाता आणि इतरही स्थानिक देवतांच्या नावाने जोगवा मागितला जातो. नवरात्रीमध्ये परडी घेऊन किमान पाच घरी तरी जोगवा मागतात. हे मागणे केवळ अन्नधान्य मिळविण्यासाठी नसते, तर ते देवीच्या नावाने केलेली परंपरा असते. जोगवा मागायला जाताना महिला पारडी (टोपली), झोळी किंवा थाळी घेतात. लाल-हिरव्या रंगाची साडी कपाळावर मोठा कुंकवाचा टिळा, गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या घालून जणू त्या देवीचे रूप धारण करतात. त्या घरोघरी जातात. म्हणतात, "आई तुझ्या दारी आलो, देवीच्या नावाने जोगवा दे.”

जोगवा देताना पीठ, मीठ, मिरची, कांदा देण्याचा संकेत आहे. हे चार पदार्थ काम, क्रोध, मद, मत्सराचे प्रतीक आहेत. जोगव्यात या वस्तू दिल्या, म्हणजे देणार्‍याने हे काम, क्रोध, मद, मत्सराचा त्याग केला असून, आता त्यांच्या आयुष्यात खर्‍या अर्थाने सुख नांदेल, असे प्रतीकात्मक रूपात समजले जाते. जोगवा घेतल्यानंतर महिला आशीर्वाद देतात, "देवी तुझ्या घराला सुख-शांती देवो. लेकरं बाळगडी होवोत. धनधान्य भरून राहो.

जोगव्यामध्ये मिळालेले दानस्वरूप पीठ, मीठ आणि वस्तू यांचा विनिमय कसा करायचा, हेसुद्धा ठरलेले असते. जोगव्यात मिळालेल्या वस्तूंचा उपयोग काही महिला करत नाहीत. त्यांच्या घरी एखादी महिला जोगवा मागायला आली, तर मिळालेल्या जोगव्यातील वस्तू ते त्या महिलेला जोगवा म्हणून देतात. काही ठिकाणी जोगव्यात मिळालेले पीठ, मीठ आणि इतर खाद्यवस्तू एकत्र करून त्याचे गोलसर लांब आकाराचा एक मुटके बनवतात; प्रसाद म्हणून ते खातात. तसेच घरी येणार्‍या-जाणार्‍यालाही देवीचा प्रसाद म्हणून ते देतात. नऊ दिवसांनंतर पुरणपोळी किंवा तेलचा (करंजीचे सारण पोळीमध्ये भरून तळलेला पदार्थ) बनवला जातो. उपवास सोडताना हे पदार्थ मुख्यतः ग्रहण केले जातात. देवीकडे आशीर्वाद मागितला जातो, "जय माता दी, जय माता दी, तुझ्या कृपेने भरून राहो घर सारी| घराला सुख-शांती दे, आम्हाला आशीर्वाद तुझा देवो|”

याच पार्श्वभूमीवर नवरात्रीनिमित्त हिंदूंमधील अनेक समाज गोंधळी समाजातील पुरुषांना देवीची आरती करायला बोलावतात. नवरात्रीमध्ये घरच्या देवीची पूजा तर होतेच, त्याशिवाय साडेतीन शक्तिपीठांच्या देवींची कृपाही घरावर होते. देवी भक्तांच्या घरी येते. त्या देवीचे स्तवन करून तिला "आशीर्वाद दे,” असे आवाहन करण्यासाठी गोंधळी समाजातील पुरुषांना आरतीसाठी बोलावले जाते. याबद्दल विश्वास दोरवेकर म्हणतात, नव्हे, त्यांचेच नव्हे, तर समाजातील बहुतेकजणांचे असे म्हणणे आहे की, "पूजा कुणी करावी, याचे धार्मिक संकेत आहेत. सत्यनारायणाची पूजा ब्राह्मणांनी करावी, हे ठरलेले आहे. त्याला धार्मिक अधिष्ठान असू शकते.तसेच, नवरात्रीमध्ये देवीची पूजा गोंधळी समाजाने करावी, ही धार्मिक परंपरा आहे.” या परंपरेनुसार पूजा करण्यार्‍या व्यक्तीने शुचिर्भूत असणे गरजेचे आहे. मांसाहार, नशा वर्ज्य असते. त्याशिवाय, नऊ दिवस पूजा करणे, उपवास असेल तर ब्रह्मचार्य पालन करणेही नियम आहे, तर पूजा करणार्‍या व्यक्तीच्या गळ्यात कवड्यांची माळ असते. ती माळ ३३ कवड्यांची असते. त्या ३३ कवड्या म्हणजे ३३ जोगिनीच असतात. पुजारी देवीच्या समोर चौरंगावर पूजा मांडतो. त्या चौरंगावर अंबेमातेचे यंत्र तांदळाच्या अक्षतांनी काढतो. ही श्रद्धेची आणि धार्मिकतेची परंपरा आहे. पूजा करताना चोंडक वाजवले जाते. पूजा करताना संबळवादन करत देवीस्तुती केली. संबळ या वाद्याची निर्मिती भगवान महादेवाच्या डमरूपासून झाली. हे सांगताना विश्वास हे कथा सांगतात. राक्षस मातला. काही केल्या तो पराजित होत नव्हता. तेव्हा देवीमातेने कालीचे रूप घेतले. राक्षसाने सृष्टीचा नाश करताना केलेल्या अत्याचाराने देवीला क्रोध अनावर झाला. तिने अक्राळ-विक्राळ रूप धारण केले. समोर येणार्‍या प्रत्येकाचा तिने समाचार घेतला. राक्षसाचा निःपात करूनही तिचा राग शमला नाही. तिला शांत करण्यासाठी महादेव पुढे आले. पण, रागाच्या भरात तिने महादेवांवरही आक्रमण केले. त्यामुळे महादेवाच्या हातातला डमरू फुटला. त्याचे दोन भाग झाले आणि तेच संबळ. मग देवीचा राग शांत करण्यासाठी महादेवांनी फुटलेल्या डमरूचे वाद्य केले, तेच संबळ. तर ते संबळ वाजवून त्यांनी देवीला शांत केले. ही कथा सांगून विश्वास म्हणाले की, "तर संबळ वाजवल्याने देवीमाता प्रसन्न होते. तुळजा भवानीमाता आणि माहुरच्या रेणुकाआईची आरती तर होतेच. पण, पूजा असलेल्या घरातील कुलदेवतेचीही स्तवन होते.” विश्वास म्हणतात की, "दुर्गे दुर्गटभारी’ ही आरती तर सर्वत्र होते. पण गोंधळी समाजाचा पुजारी ‘जय रामा जय भवानी कृपाळूवंत| आरती ओवाळी मोहन माया रेणुके॥’ ही आरती नक्कीच म्हणतो. नवरात्रीमध्ये देवी घटी बसते, म्हणजे साक्षात भूतलावर अवतरते. त्यामुळे या नऊ दिवसांत कोणत्याही अप्रिय आणि अमंगल शक्तीचा जोर चालत नाही. देवी सगळ्या भक्तांचा, नव्हे आईच्या मायेने सगळ्या सृष्टीचे तारण करते, असा गोंधळी समाजाचा विश्वास आहे.” याच कल्याणकारी विश्वासाने आपणही म्हणूया, ‘आई राजा उदे उदे...!’
९५९४९६९६३८

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.