मुंबई, डॉ. रा. चि. ढेरे संस्कृती संशोधन केंद्राद्वारे जवळपास २ वर्ष चालवलेल्या ‘बहुरुपी रामकथा’ व्याख्यानमाला आता ग्रंथरुपात वाचकांच्या भेटीला आली आहे. ‘बहुरुपी रामकथा’ या व्याख्यानमालेच्या अंतर्गत अभ्यासकांनी तथा प्राध्यपकांनी देश विदेशातील रामकथांचा परिचय करुन दिला. बहुरुपी रामकथा या ग्रंथाच्या माध्यमातून काश्मिरी रामायणापासून ते आसामीरामायणपर्यंत अनेक वेगवेगळ्या रामकथांचा वेध घेण्यात आला आहे. पद्मगंधा प्रकाशनाच्या माध्यमातून प्रकाशित केलेल्या या ग्रंथाचे संपादन ज्येष्ठ लेखिका, कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांनी केले आहे. सदर ग्रंथामध्ये डॉ. गौरी माहुलीकर, डॉ. अंजली पर्वते, डॉ. मंजूषा गोखले, डॉ. अंबरीश खरे,प्रणव गोखले, डॉ. सुनीला गोंधळेकर, माधवी भट, दीपाली पाटवदकर आदी तज्ञांच्या व्याख्यानंवर आधारित लेखांचा समावेश आहे.
भारत तसेच भारताबाहेर वेगवेगळ्या प्रांतामध्ये विखुरलेल्या रामकथा प्रथमच वाचकांसमोर पुस्तकरुपाने एकत्रित येत आहेत. अनेक अभ्यासकांनी तथा वाचकांनी या ग्रंथाचे स्वागत केले आहे. सदर प्रकल्पात कार्यरत असणाऱ्या लेखिका दीपाली पाटवदकर दै. मुंबई तरुण भारतशी संवाद साधताना म्हणाल्या की “ आदिकवी वाल्मीकी यांनी रचलेले रामायण हा प्रमाण ग्रंथ आहेच, परंतु त्या व्यतिरीक्त रामकथेची वेगवेगळी रुपं आपल्याला भारतभरात तसेच भारताबाहेर बघायाला मिळतात. बहुरुपी रामकथा या ग्रंथाचे वैशिष्ठय हेच आहे की या रामकथेतील सौंदर्यस्थळांचा वेध घेतला आहे. आजच्या आधुनिककाळात रामकथा समजून घेणे जास्त गरजेचे आहे. नेमके रामायणातून काय घ्यायला हवे हे समजून घेण्यासठी, अपप्रचार खोडून काढण्यासाठी बहुरुपी रामकथा समजून घेणे आवश्यक आहे”