मुंबई, नवी मुंबई विमानतळावर यापूर्वी काही चाचणी उड्डाणे झाली होती. डिसेंबर २०२४ मध्ये इंडिगोचे एअरबस ३२० विमान नेव्हिगेशन प्रणालींची तपासणी करण्यासाठी उतरले होते, तर गेल्या ऑक्टोबरमध्ये भारतीय वायुदलाचे एअरबस C-295 हे विमान कोणत्याही ग्राउंड-बेस्ड प्रणालीशिवाय प्रतीकात्मकरीत्या उतरले होते. मात्र, नुकतेच घडलेले हे उड्डाण एक महत्त्वपूर्ण टप्पा मानले जात आहे, कारण यात प्रत्यक्ष प्रवासी चार्टर सेवेचा समावेश होता. या विमानाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून यशस्वीरीत्या लँडिंग आणि टेकऑफ केले.
माध्यमातील अहवालानुसार, भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) १९ सप्टेंबर रोजी नवी मुंबई येथे नॉन-शेड्युल्ड प्रवासी विमानाला उतरवण्याची परवानगी दिली होती. या ऐतिहासिक लँडिंगसाठी भाविप्राने यापूर्वी जारी केलेली एनओटीएएम रद्द करून नवीन नोटिफिकेशन काढले. त्यात शनिवारी सकाळी ८:३० ते ११ वाजेपर्यंत आणि रविवारी आणखी तीन तास धावपट्टी खुली राहील, असे नमूद करण्यात आले होते.
समाज माध्यमात आलेल्या व्हिडीओनुसार, हे विमान पिलाटस PC-24 (VT-APV) अहमदाबादहून सकाळी ९ वाजता उड्डाण करून खंभातचा आखात आणि अरबी समुद्र ओलांडून मुंबईच्या हवाई क्षेत्रात आले. त्यानंतर विमानाने नवी मुंबई विमानतळाच्या दक्षिणेकडील परिसरात वर्तुळाकार उड्डाण केले आणि सकाळी १०:२० वाजता धावपट्टी क्रमांक २८ वर सुरळीत लँडिंग केले. रविवारी दुपारी १२:४० वाजता विमान परत अहमदाबादला रवाना झाले.
प्लेन स्पॉटरने टिपला क्षणया ऐतिहासिक क्षण सोशल मीडियावर एका एव्हिएशन हँडलद्वारे शेअर करण्यात आला. या पोस्टनंतर विमानप्रेमी आणि उद्योगातील जाणकारांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण दिसून आले.