जगाला न जुमानता ‘हमास’विरुद्ध इस्रायल आक्रमक!

    22-Sep-2025   
Total Views |

इस्रायल विरुद्ध हमास संघर्षांचा वणवा दिवसेंदिवस वाढत जात आहे. हमासचा पूर्ण बंदोबस्त ही इस्रायलची भीष्म प्रतिज्ञा ठरत असून, हमासही नमते घेण्यास तयार नाही. या युद्धाच्या मागेही कुटनितीचे एक युद्ध सुरु आहे. रशिया विरुद्ध एकत्र आलेल्या अमेरिका आणि युरोपीय देशांचे इस्रायलबाबत वेगळी मते दिसून येतात.नुकतेच युरोपमधील काही देश पॅलेस्टाईनला मान्यता देण्याच्या तयारीत असून, नकाराधिकाराचा वापर करत अमेरिका इस्रायलला संरक्षण देत आहे.


सध्या इस्रायलने गाझा शहर आणि गाझापट्टीमधून बाहेर पडण्याचे आवाहन, तेथील जनतेला केले आहे. तेथील जनतेने तो भूभाग रिकामा करावा, यासाठी इस्रायली लष्कराकडून मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात असल्याचे रोजच पाहायला मिळते. गाझापट्टी आणि शहरात राहणारे लोक मिळेल त्या साधनांचा वापर करून, तो भाग सोडून जात असल्याची दृश्येही जगाला पाहण्यास मिळत आहेत पण, कोणत्याही परिस्थिती गाझा शहर आणि गाझापट्टी मुक्त करायचीच, या निर्धाराने इस्रायलची वाटचाल सुरू आहे. ‘हमास’ या दहशतवादी संघटनेने, अजूनही इस्रायलच्या काही ओलिसांची सुटका केलेली नाही. गाझापट्टी बेचिराख होताना दिसत असली, तरी ‘हमास’ही अजिबात नमते घेण्यास तयार नाही. अशा घडामोडी घडत असताना, ब्रिटन, कॅनडा,ऑस्ट्रेलिया यांनी आता पॅलेस्टाईनला मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. फ्रान्सही पॅलेस्टाईनला मान्यता देण्याच्या तयारीत आहे. काही देश इस्रायलविरुद्ध भूमिका घेत असले, तरी आपल्या निर्णयापासून माघार घेण्याची इस्रायलची मुळीच तयारी नाही. इस्रायलचे संरक्षणमंत्री इतामार बेन ग्वीर यांनी तर, पॅलेस्टाईनची दहशतवादी राजवट पूर्णपणे उखडून टाकण्याचे आणि संपूर्ण वेस्ट बँक परिसरच इस्रायलच्या सार्वभौमत्वाखाली आणण्यात यावा असे म्हटले आहे. ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी पॅलेस्टाईनला मान्यता देण्याचा जो निर्णय घेतला आहे तो म्हणजे, खून करणार्यांना पुरस्कार देण्याचा प्रकार असल्याचे इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया या देशांनी केलेली कृती म्हणजे, ‘हमास’ला दिलेला पुरस्कार असल्याचे म्हटले आहे. आमचे ओलीस ‘हमास’च्या ताब्यात आहेत. ते पाहता युरोपीय राजकारणाच्या राजकीय गरजांसाठी इस्रायली जनता आत्महत्येचा मार्ग स्वीकारणार नाही, असे पंतप्रधान नेतान्याहू यांनी म्हटल्याचे वृत्त, एका वृत्तसंस्थेने दिले आहे. ब्रिटनने पॅलेस्टाईनला औपचारिक मान्यता देण्याची घोषणा केली असून, ‘हमास’नेही ब्रिटनच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी, हा निर्णय म्हणजे दहशतवादास पुरस्कार असल्याचे म्हटले आहे. ब्रिटनच्या या निर्णयामुळे ‘हमास’ या दहशतवादी संघटनेस मोठेच बळ मिळाले आहे. ब्रिटनने घेतलेला निर्णय म्हणजे, आमचा विजय असल्याचे ‘हमास’ने म्हटले आहे.

द्विराष्ट्रीय तोडग्याची शयता जिवंत ठेवण्यासाठी हे पाऊल उचलणे आवश्यक होते, असे ब्रिटिश पंतप्रधान स्टार्मर यांनी म्हटले आहे. मात्र, इस्रायलने ब्रिटनच्या या निर्णयाचा निषेध केला आहे. पॅलेस्टाईन राज्य कधीच अस्तित्वात येणार नाही. जॉर्डन नदीच्या पश्चिम किनारपट्टीवर पॅलेस्टाईन राज्य असणार नाही. इस्रायल असे सर्व प्रयत्न हाणून पाडेल, असेही नेतान्याहू यांनी म्हटले. दि. ७ ऑटोबर २०२३ रोजी इस्रायली जनतेचे भीषण हत्याकांड झाले आणि अनेक इस्रायली जनतेस ‘हमास’ने ओलीस ठेवले. त्यामुळे इस्रायलने अत्यंत आक्रमक भूमिका घेत, जवळजवळ संपूर्ण गाझा क्षेत्रच बेचिराख करून टाकले. पण, तरीही ‘हमास’ नमते घेण्यास तयार नाही. अमेरिका देश पूर्णपणे इस्रायलच्या मागे उभा आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये नकाराधिकाराचा वापर करून, अमेरिकेने इस्रायलची सातत्याने पाठराखण केली आहे. त्यामुळे जगातील अन्य देश काय म्हणतील, याची चिंता आणि पर्वा न करता, इस्रायलची मोहीम सुरूच आहे. आपले उद्दिष्ट साध्य होईपर्यंत इस्रायल स्वस्थ बसणार नाही, असेच विद्यमान घडामोडींवरून दिसते.

अयोध्येत विक्रमी दीपोत्सवाची तयारी!

प्रभू रामचंद्राची जन्मभूमी असलेल्या अयोध्यानगरीमध्ये पुढील महिन्यात दि. १८ ते दि. २० ऑटोबर रोजीदरम्यान, भव्य अशा दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा दीपोत्सव विक्रमी ठरणार असून, त्यासाठी अयोध्येमध्ये जोरदार तयारी केली जात आहे. या दीपोत्सवाच्या दरम्यान, शरयू नदीच्या घाटांवर सुमारे २६ लाख पणत्या लावण्यात येणार आहेत. त्याच्या जोडीला लेझर शो, आतशबाजी यांचेही आयोजन करण्यात आले आहे. परंपरा, संस्कृती आणि त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालून, हा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या दीपोत्सवामुळे शरयू नदीचे सर्वच घाट, लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघणार आहेत. हा सोहळा अभूतपूर्व व्हावा, यासाठी योगी आदित्यनाथ यांचे सरकार आतापासूनच कामाला लागले आहे. अयोध्यानगरीस भेट देणारे भाविक, पर्यटक आणि आपल्या संस्कृतीबद्दल आस्था, प्रेम असणार्या सर्वांसाठीच हा दीपोत्सव डोळ्याचे पारणे फेडणारा ठरणार आहे. यानिमित्ताने ‘राम की पौडी’ येथे ४५ मिनिटांचा लेझर शो आणि अन्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभू रामचंद्राचे अयोध्येमध्ये पुनरागमन कसे झाले, त्याचे दर्शन लेझर शो आणि अन्य माध्यमांद्वारे उपस्थितांना घडविण्यात येणार आहे. तसेच, रामायणातील विविध प्रसंगांचे दर्शन या ४५ मिनिटांच्या कार्यक्रमात घडविण्यात येणार आहे. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात १०० हून अधिक कलाकार सहभागी होणार आहेत. राम चरित्रावर आधारित कार्यक्रम त्यांच्याकडून सादर केले जाणार आहेत. या दीपोत्सवानिमित्ताने आजच्या आधुनिक काळात, त्रेतायुगातील कालखंडाचे दर्शन घडविण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशचे पर्यटन आणि सांस्कृतिकमंत्री जयवीर सिंह यांनी या कार्यक्रमाची माहिती दिली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कल्पनेला अनुसरून, हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून अयोध्या हे जागतिक सांस्कृतिक केंद्र आहे, हे सर्व जगाच्या लक्षात येणार आहे. २६ लाख पणत्या शरयू तीरावरील घाटांवर प्रज्वलित करण्यात येणार असून, तो एक नवीन जागतिक ‘गिनीज’ विश्वविक्रम होणार आहे. या तीन दिवसांच्या महोत्सवात, रामायणातील विविध प्रसंगांचे चित्ररथांच्या माध्यमातून दर्शन घडविण्यात येणार आहे. या महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे संबंधित अधिकार्यांकडून सांगण्यात आले. एकूणच अयोध्येतील हा दीपोत्सव नक्कीच अनुपम्य सुखसोहळा ठरणार आहे.

३८ हजार गीते गायलेला झुबीन गर्ग!


आसामचा सुप्रसिद्ध गायक झुबीन गर्ग याची गेल्या दि. २३ सप्टेंबर रोजी प्राणज्योत मालवली. या प्रसिद्ध गायकाच्या निधनाने, संपूर्ण आसामवर शोककळा पसरली. आसाम घुसखोरीच्या संकटात असताना, झुबीन गर्ग याचा आसामी गीतांचा ‘अनामिका’ नावाचा पहिला अल्बम १९९२ साली प्रसिद्ध झाला होता. या एका कॅसेटने आसामी जनतेची संगीताची आवडच बदलून टाकली. त्यानंतर आलेल्या ‘माया’ नावाच्या अल्बमने, आसामी जनतेला वेड लावले. ८० आणि ९०च्या दशकाच्या प्रारंभास हिंदी चित्रपट गीतांची लाट असताना, त्याविरुद्ध एकटा झुबीन गर्ग उभा राहिला. झुबीन गायक, संगीतकार तर होताच; पण आपल्या गायकीने त्याने आसाममधील तरुणांच्या जीवनात स्थान मिळवले होते. झुबीन गर्ग याने आसामी, बंगाली, बोडो, नेपाळी अशा विविध भाषांमधील ३८ हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. १९९९ ते २०२५ या काळात झुबीन याने, अनेक आसामी चित्रपटांना संगीत दिले होते. लोकांसाठी जगलेल्या आणि ज्याच्या आवाजावर आपला जीव ओवाळून टाकण्यास आसामी जनता तयार असे, अशा गायकाची प्राणज्योत गेल्या दि. १९ सप्टेंबर रोजी मालवली. त्याच्या निधनाबद्दल आसाम सरकारने, तीन दिवसांचा दुखवटा घोषित केला होता. झुबीन गर्ग याचे पार्थिव सिंगापूरहून भारतात आणण्यात आले, त्यावेळी दिल्ली विमानतळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा हे स्वतः जातीने उपस्थित होते. झुबीन गर्ग याला अखेरचा निरोप देण्यासाठी त्याचे हजारो चाहते, प्रचंड संख्येने उपस्थित होते. प्रसिद्ध गायक भूपेन हजारिका यांनी आपली गायकी संपूर्ण भारतात लोकप्रिय केली. झुबीन गर्ग हाही आपल्या गायकीने आसामी जनतेच्या गळ्यातील हिरा बनला होता.



दत्ता पंचवाघ

एम. ए. (अर्थशास्त्र), पत्रकारिता क्षेत्रात ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेपासून पत्रकारितेस प्रारंभ. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पर्यटन आदी विषयांवर विपुल लेखन. आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी लेखन.