आजोबांकडून मिळालेला कलेचा वारसा जोपासत ‘हिंदुस्थानी संगीत अकादमी’च्या माध्यमातून विद्यार्थी घडविणार्या डोंबिवलीकर शिल्पा कुलकर्णी यांच्याविषयी...
शिल्पा यांचा जन्म विदर्भातील एका छोट्याशा गावात झाला. त्यांचे वडील मुकुंद खाडे हे रेल्वेत नोकरीला असल्याने, त्यांची सतत बदली होत होती. त्यामुळे शिल्पा यांचे शिक्षणही विविध शहरातच झाले. त्यांचे पहिलीचे शिक्षण अकोल्यामध्ये झाले तर, दुसरी आणि तिसरी देवळाली आणि चौथीचे शिक्षण त्यांनी डोंबिवलीतील शिशकुंज शाळेत घेतले. मात्र, पाचवीपासूनचे सर्व शिक्षण त्यांनी दत्तनगर येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर या शाळेतून घेतले. शिल्पा यांनी पदवीपर्यंतचे शिक्षणही डोंबिवलीच्या पेंढरकर महाविद्यालयातून घेतले. शिल्पा यांना चार बहिणी असून, त्यातील चौथी आणि सर्वांत मोठी बहीण मुंबईत काकाकडे राहत होत्या. शिल्पा यांचे आजोबा तबलावादन करीत होते. त्याचवेळी शिल्पा यांच्या आई माधवी या गाणी गात असत. माधवी यांनी कधीही संगीताचे शिक्षण घेतलेले नाही पण, तरीही त्या गाण्याचे कार्यक्रम उत्तम करत असत. आईच्या गाण्याच्या कार्यक्रमामध्ये काहीतरी नावीन्य यावे आणि कार्यक्रमात आईलाही आराम मिळावा म्हणून, आईच्या कार्यक्रमामध्ये शिल्पा नृत्य करू लागल्या. त्यानुसारच आईच्या कार्यक्रमाची नव्याने आखणी करण्यात आली. शिल्पा यांनी शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात वगैरे नृत्य सादर केले होते. महाविद्यालयीन जीवनात ‘युथ फेस्टिव्हल’ चे महत्त्व मोठे पण, पेंढरकर महाविद्यालय त्यात सहभाग घेत नसे. आपल्या महाविद्यालयाने ‘युथ फेस्टिव्हल’मध्ये सहभाग घ्यावा, अशी शिल्पा यांची तीव्र इच्छा होती. मग महाविद्यालयाने सर्वखर्चाने ‘युथ फेस्टिव्हल’मध्ये सहभागी होण्याची विद्यार्थ्यांना परवानगी दिली पण, तोपर्यंत शिल्पा यांनी नृत्याचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले नव्हते. कलेचा वारसा शिल्पा यांना आजोबांकडूनच मिळाला होता. त्यातच ‘युथ फेस्टिव्हल’साठी विवेक ताम्हणकर यांनी बांबू डान्स त्यांना शिकविला. शिल्पा यांच्या या सादरीकरणाला प्रथम पारितोषिकही मिळाले. कलेचा वारसा आणि गुरूंकडून मिळालेली शिकवण, याच्या जोरावरच त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
शिल्पा यांच्या दोन क्रमांकाच्या बहिणीला नाटकाची आवड होती. तिने शाहीर साबळे यांच्या समुहामध्ये काम कारण्यास सुरुवात केली. त्यावेळी तिच्याबरोबर शिल्पाही तिथे जायची. त्यामुळे अभिनयाचे संस्कारही त्यांच्यावर झाले. याच काळात सचिन पिळगावकर यांच्या ‘कुंकू’ या चित्रपटासाठी, साहाय्यक नर्तकांची गरज होती. त्यासाठी सचिन यांनी शाहीर साबळे यांची भेट घेतली. या गाण्याच्या कार्यक्रमासाठी दोन सहाय्यक कलाकार कमी पडत होते. त्यावेळी शिल्पा या येथे दररोज येत असल्याने, त्यांनाच घेण्याचे ठरले. ‘कुंकू’ या चित्रपटातूनच सहाय्यक नृत्यांगना म्हणून शिल्पा यांनी मराठी चित्रपट सृष्टीमध्ये पहिले पाऊल ठेवले. हा चित्रपटच शिल्पा यांच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला. त्यानंतर त्यांना एका मागून एक कार्यक्रम मिळत गेले. ‘एैसे भी या जल्दी हैं|’, ‘संघर्ष’ असे विविध कार्यक्रम त्यांच्याकडे चालून आले. त्यातून शिल्पा यांचा आत्मविश्वास वाढला आणि आपण कार्यक्रम करू शकतो, हा विश्वास त्यांच्यात निर्माण झाला. त्यानंतर शिल्पा यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.
शिल्पा १९९६ साली पदवीधर झाल्या. त्यानंतर पेंढरकर महाविद्यालयाने त्यांना, नृत्य दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी दिली. त्यांनी महाविद्यालयची ही ऑफर स्वीकारली आणि तीन वर्षे महाविद्यालयात कामही केले. त्यानंतर त्यांनी ‘उठी उठी गोपाला’ या नाटकाचे अनेक प्रयोग केले. दरम्यान त्यांच्या शाळेतील शिक्षिका दिपाली काळे यांची भेट झाली. काळे यांनाही शिल्पा नृत्य करते, हे तेव्हाच समजले. चैत्र ते फाल्गुनमध्ये येणार्या सर्व सणांवर आधारित कार्यक्रम त्या करत होत्या. शिल्पा यांनी त्याचे २०० ते २५० प्रयोग केले. शासनादरबारीही या कार्यक्रमाचे प्रयोग झाले आहेत. याशिवाय शिल्पा यांनी ‘मेंदीच्या पानावर’, ‘फडकवतो भगवा गगनात’, ‘राष्ट्रवंदना’, ‘मंगलगाणी’, ‘आवाज की दुनिया’, ‘आजादी ५०’, ‘गाने सुहाने’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ असे विविध कार्यक्रम आजवर केले आहेत. १९९८ सालानंतर ‘श्री कला संस्कार बालनाट्य संस्थे’शी काळे यांच्यामुळेच शिल्पा जोडल्या गेल्या. या संस्थेचेही काम शिल्पा करू लागल्या. सन २००० मध्ये त्या ‘हिंदुस्थानी संगीत अकादमी’शी जोडल्या गेल्या. विनायक नाईक आणि महेश कुलकर्णी यांनी ही संस्था उभी केली होती पण, त्यांनी शिल्पा यांनादेखील एक भागीदार म्हणून संस्थेत येण्याची ऑफर दिली व शिल्पा यांनी ती लगेच स्वीकारलीही. ‘हिंदुस्थानी संगीत अकादमी’त लोकनृत्याचे धडे विद्यार्थी गिरवू लागले. दरम्यान २००१ मध्ये शिल्पा यांची लग्नगाठ, सुनील कुलकर्णी यांच्याशी बांधली गेली. शिल्पा डोंबिवली पूर्वेतून पश्चिमेत राहायला लागल्या. २००४ मध्ये शिल्पा यांना कन्यारत्न प्राप्त झाले. मुलीच्या जन्मानंतर त्यांनी दोन वर्षांचा वेळ त्यांनी मुलीच्या संगोपनाला दिला. सासू-सासरे, पती, मुलगी असे सर्वजण आज एकत्र राहतात. शिल्पा यांनी जेव्हा पूर्णवेळ अकादमीला द्यायचे ठरविले, तेव्हा काहीतरी वेगळे करण्याचा विचार त्यांच्या मनामध्ये आला. त्यामुळे त्यांनी शास्त्रीय नृत्य शिकवण्याचे ठरविले. कथ्थकचे लास ‘हिंदुस्थानी संगीत अकादमी’त आता सुरू झाले होते. आजही या संस्थेत विद्यार्थी गायन, नृत्य, वादन शिकत आहेत. आजपर्यंत तीन हजारांहून अधिक विद्यार्थी शिल्पा यांच्याकडून शिकून गेले आहेत. अनंत भोईर यांचा ‘गीतारामायण’ कार्यक्रमही शिल्पा करत होत्या परंतु, भोईर यांच्या निधनामुळे हा कार्यक्रम बंद पडला. शिल्पा यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. अशा या हरहुन्नर व्यक्तिमत्त्वाला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!