एसटी महामंडळात मेगा भरती प्रक्रिया ; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Total Views |

मुंबई, भविष्यात येणाऱ्या ८ हजार नवीन बसेस साठी मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता असल्याने कंत्राटी पद्धतीने १७४५० चालक व सहाय्यक पदासाठी भरती राबविण्यात येणार असून येत्या २ ऑक्टोबरला त्याची निविदा प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. या संधीचा पुरेपूर फायदा होतकरू तरुण -तरुणींनी घ्यावा असे आवाहनही मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ३००व्या संचालक मंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, बससेवा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक असलेले चालक व सहाय्यक मनुष्यबळ भाडेतत्त्वावर (कंत्राटी पद्धतीने) ३ वर्ष कालावधीसाठी घेण्याकरिता ई-निविदा प्रक्रिया अवलंबण्यात येत आहे. अर्थात, ही ई-निविदा प्रक्रिया ६ प्रादेशिक विभाग निहाय राबविण्यात येणार आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मनुष्यबळ पुरविणाऱ्या संस्थांकडून राज्य परिवहन महामंडळाला आवश्यक मनुष्यबळ वेळेत उपलब्ध होईल. कंत्राटी पद्धतीने भरती होणाऱ्या चालक व सहाय्यक उमेदवाराला सुमारे ३० हजार वेतन देण्यात येणार आहे. याबरोबरच उमेदवारांना एसटी कडून प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. बसेसची वाढती संख्या त्यासाठी लागणारे हे मनुष्यबळ मिळाल्यानंतर प्रवाशांना अखंडित, सुरक्षित व दर्जेदार बससेवा पुरविणे शक्य होईल, असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.


गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.