
मुंबई : काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रात सत्याग्रह यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. परंतू, ही सत्याग्रह यात्रा नसून असत्य यात्रा आहे, अशी टीका भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी रविवार, २१ सप्टेंबर रोजी केली.
नवनाथ बन म्हणाले की, "काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रात सत्याग्रह यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सत्याग्रह यात्रा नसून असत्य यात्रा आहे. कारण त्यांचे नेते राहुल गांधी रोज माध्यमांसमोर येऊन खोटे बोलतात. मतचोरी झाल्याचा खोटा आरोप करतात. त्यामुळे काँग्रेसला सत्याग्रह यात्रा काढण्याचा अधिकार नाही. त्यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वात असत्य यात्रा काढली पाहिजे."
"काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर टीका करतात. पण हर्षवर्धन सपकाळ यांना अजून काँग्रेस कळली नाही. त्यांनी संपूर्ण काँग्रेस समजून घ्यावी आणि मग टीका करावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १४० कोटी जनतेने तर देवाभाऊंना महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेने आशीर्वाद दिले. त्यामुळे मोदीजी पंतप्रधान आणि देवाभाऊ मुख्यमंत्री झालेत. काँग्रेसची अगरबत्ती कुठे आहे? महाराष्ट्रातील अवस्था काय आहे? काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न बघणाऱ्यांच्या स्वप्नावर जनतेने पाणी टाकले. काँग्रेसमध्ये कुणी विचारत नसल्याने भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, देवाभाऊ आणि मोदीजींवर टीका करू नका. तुमचे सरकार असताना मुंबई आणि महाराष्ट्राला घालण्याचे काम केले. भाजप सर्वांना सोबत घेऊन पुढे जाते," असे खडेबोलही नवनाथ बन यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना सुनावले.