सराईत खोटेपणा आणि माफीवीर हीच राहुल गांधीची खरी ओळख; केशव उपाध्ये यांची टीका

    20-Sep-2025   
Total Views |

मुंबई : राहुल गांधी म्हणजे सराईत खोटेपणा आणि माफीवीर आहेत, अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांना त्यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत प्रत्युत्तर दिले.

केशव उपाध्ये म्हणाले की, "मतचोरीबद्दल राहुल गांधी सराईतपणे आत्मविश्वासाने ढळढळीत खोटे कसे बोलतात याचे अनेकांना आश्चर्य वाटत असेल. पण सराईत खोटेपणा आणि माफीवीर हीच राहुल गांधीची खरी ओळख आहे. त्यांचा खोटे बोलण्याचा आणि पसरविण्याच्या आत्मविश्वास पाहून गोबेल्सही शरमला असता हे नक्की," असे म्हणत त्यांनी राहुल गांधींच्या खोटारडेपणाचा पाढाच वाचला.


"राफेल प्रकरणात खोटे बोलण्याबद्दल, दिशाभूल करण्याबाबत त्यांना सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागावी लागली होती हे सर्वश्रुतच आहे. पण दिशाभूल करण्याची ही पहिली वेळ नाही. २०१४ ला निवडणूक रॅलीत राहुल गांधींनी महात्मा गांधीच्या हत्येला रा. स्व. संघ जबाबदार असल्याचा आरोप केला. यावरून त्यांना न्यायालयात खेचण्यात आले. त्यावेळी राहुल गांधींनी सुरुवातीला राणा भीमदेवी थाटात आपण आपल्या विधानावर ठाम असल्याची भूमिका घेतली आणि पुरावे सादर करू असे सांगितले. मात्र सर्वोच्च न्यायालयाने कडक भूमिका घेताच राहुल गांधींनी भूमिका बदलत संघाला हत्येबद्दल दोषी मानत नसून संघाशी संबंधित लोक त्या हत्येत सहभागी होते अशी तकलादू सारवासारव करत कोलांटउडी मारली," असे त्यांनी सांगितले.

आरोप करणे हीच राहुल गांधीची खासियत

"२०१६ मध्ये राहुल गांधींनी सर्जिकल स्ट्राईकनंतर निवडणूक प्रचारात ‘खून की दलाली’ असा आरोप पंतप्रधानांवर केला. या आरोपानंतर सगळीकडून टीका सुरू झाल्यावर राहुल गांधींनी भूमिका बदलली आणि आपण सर्जिकल स्ट्राईकच्या विरोधात नाही असे जाहीर केले. मोदी नावाची बदनामी केल्यावरून त्यांना न्यायालयाने शिक्षा दिली आहे. सावरकरांची बदनामी करण्यावरून त्यांना न्यायालयात खेचण्यात आले आहे. तिथेही सुरुवातीला सगळे पुरावे सादर करेन, अशी भूमिका घेणारे राहुल गांधी प्रत्यक्षात टाळाटाळ करीत आहेत. खोटे बोलणे, बेछूट आरोप करणे ही राहूल गांधीची खासियत आहे," अशी टीकाही केशव उपाध्ये यांनी केली आहे.


अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....