मुंबईच्या जहांगीर कलादालनात दि. १६ ते दि. २२ सप्टेंबर दरम्यान ’ Letters n Spirit’ या गटांतर्गत ‘अनबाऊंड’ या अक्षरचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. याअंतर्गत एकूण १६ सुलेखनकारांच्या अक्षरचित्रांच्या एका आगळ्यावेगळ्या विश्वाची आपल्याला ओळख होते. त्याविषयी...
अक्षरांचा श्रम केला| फळा आला तेणें तो|
अवघियाचा तळ धरी| जीवा उरी नुरवुनी॥धृ.॥अर्थात, अक्षरांच्या पाठांतराचे श्रम केले, म्हणून मला आता त्याचे चांगले फळ मिळत आहे. यामध्ये ‘मी’ म्हणजे शरीराचा भावच उरलेला नाही. अक्षरचित्रांच्या विश्वामध्ये माणूस जेव्हा प्रवासाला सुरुवात करतो, तेव्हा याच अनुभूतीची त्याला प्रचिती येते. अक्षरचित्रे म्हणजे केवळ सुलेखन नसून, ते अक्षरांच्या अभिव्यक्तीचे व्यापक रूप आहे. हे रूप लक्षात घेण्यासाठी चित्र, रंग, अक्षर यांच्या समन्वयाचे भाव आधी लक्षात घेणे गरजेचे. आजमितीला सुलेखनकार अच्युत पालव यांच्या अक्षरचित्रांमुळे ‘कॅलिग्राफी’ हा विषय केवळ घराघरांत पोहोचला नसून, तो अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेला दिसतो. शब्द आणि रंग यांच्या संगमातून तयार होणारे विश्व किती अद्भुत असते, याची आपल्याला यानिमित्ताने प्रचिती आली.
मुंबईच्या जहांगीर कलादालनात दि. १६ ते दि. २२ सप्टेंबर दरम्यान ’Letters n Spirit’’ या गटांतर्गत ‘अनबाऊंड’ या आगळ्यावेगळ्या अक्षरचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. याअंतर्गत सुलेखनकार शिरीष शिरसाट, विनय देशपांडे, निलेश देशपांडे, मनिष कसोडेकर, रुपाली गट्टी, स्नेहल बलापुरे, मनिषा नाईक, मनसूर (मनन), अक्षया ठोंबरे, अश्विन कराळे, चिंतामण पगारे, मंगेश अकुला, निलेश जाधव, पिनाकीन रिसबूड, निरु चोबिसा, बी. जी. लिमये अशा एकूण १६ अक्षरचित्रकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या कलाकृतींच्या माध्यमातून अक्षरचित्रांच्या एका वेगळ्या विश्वाची आपल्याला ओळख होते.
अक्षरचित्रांच्या निर्मिती प्रक्रियेमध्येच चित्र काढणाऱ्या कलाकारांना स्वतःचा किंवा स्वतःच्या कलेचा वेगळा शोध लागला आहे की काय, याची आपल्याला प्रचिती येते. कारण, कला दालनाच्या भिंतींवर केवळ अक्षरचित्रांच्या चौकटी आहेत असे नाही, तर माणसाच्या भावविश्वातील वेगवेगळे अनुभव या चित्रांच्या माध्यमातून आपल्यासमो उलगडतात. ही प्रक्रिया अत्यंत सूक्ष्म असते. अक्षरांची वेगवेगळी आवर्तने रेखाटत, एका चौकटीतच वेगळे विश्व निर्माण होते. वर्तुळ किंवा गोलाकार जेव्हा आपण मनात आणतो, तेव्हा साहजिकच पृथ्वी, सूर्य, चंद्र हे निसर्गाचे आकार आपल्या डोळ्यांसमोर येतात. अक्षरचित्रांच्या विश्वामध्ये याच वर्तुळातून अनेक गोष्टींचे उगमस्थान, बलस्थान, अक्षरचित्रकारांनी अत्यंत खुबीने साकारले आहे. हे साकारताना दृश्य स्वरूपात आपल्याला ज्या गोष्टीचे आकलन होते, त्यापलीकडेसुद्धा अशाच एखाद्या सृष्टीचे स्थान दैवीशक्तीने निर्माण केले आहे, याचा चित्र बघताना बोध होतो.
साधारणपणे हे अक्षरचित्र बघताना, या चित्रांमधले अक्षर शोधण्याचा आपण प्रयत्न करतो. रंगांच्या आड लपलेली अक्षरांची दुनिया आपल्याला व्यवस्थितसुद्धा भासते. मात्र, नेमके त्याचवेळेला असे लक्षात येते की, आपल्याला परिचित असणार्या अक्षरांच्या पलीकडे एक समग्र चित्र आहे, ज्यामधून आपल्याला आणखी नव्या गोष्टींचा बोध होतो आहे. एकाच वेळेला वेगवेगळ्या रंगांमध्ये संमिश्र झालेली ही अक्षरं, या रंगांच्या जंजाळातून मुक्त झाल्याचे आपल्याला बघायला मिळते.
शब्द हा भाषेचा प्राण असेल, तर लिपी त्याच शब्दांचा प्राणवायू, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. भारत हा जसा भाषाप्रधान, तसाच तो लिपीप्रधानसुद्धा आहे, असे अनेक भाषातज्ज्ञांनी नमूद केले आहे. या लिप्यांचे महत्त्व नेमके काय आहे, भाषेच्या प्रवाहात वाहक म्हणून काम करणार्या लिपीची सौंदर्यस्थळे कुठली आहेत, याचा यानिमित्ताने आपल्याला बोध होतो. अक्षरचित्रांच्या प्रदर्शनाचे आणखी एक महत्त्व म्हणजे, आपल्याला इथे मानवी भावभावनांच्या प्रतिमांचेसुद्धा दर्शन होते. दुःख, वेदना, भीती, अगतिकता या सर्व भावनांच्या, आदेशांच्या वेगवेगळ्या छटा. त्या सगळ्या छटांची मांडणी अत्यंत सुरेखरित्या कॅनव्हासवर उतरलेली आपल्याला बघायला मिळते. अक्षरचित्रांच्या माध्यमातून भावनांचा जमलेला कोलाज एक वेगळाच विचार यातून देऊन जातो.
सुलेखनकार मनसूर यांनी मराठीतील मूर्धन्य व्यंजने, दंतव्य व्यंजने अशा वेगवेगळ्या व्यंजनांचे अत्यंत सुरेख प्रकटीकरण कागदावर घडवून आणले आहे. ‘कोविड’च्या साथीनंतर त्यांना फुप्फुसाचा काही काळ त्रास जाणवला. त्यांच्या आयुष्यातील याच आजारपणात भाषेतील वेगवेगळे शब्द तथा त्यांच्या व्यंजनांतील उच्चारांच्या अनेक गमतीजमती त्यांच्या लक्षात आल्या. याच पार्श्वभूमीवर त्यांनी व्यंजनांची मांदियाळी दर्शवणारे एक अक्षरचित्र तयार केले.
कलाकाराची कला त्याच्या व्यक्तिगत आयुष्यातून जशी वेगळी काढता येत नाही, तीच बाब अक्षरचित्रांच्या आणि सुलेखनाबाबतीत आहे. असे वेगवेगळे अनुबंध आपल्याला या अक्षरचित्रांच्या प्रदर्शनामध्ये बघायला मिळतात. समाजमाध्यमांवर ज्यांची अक्षरचित्रे कवितेच्या ओळींच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचली, असे सुलेखनकार शिरीष, बी. जी. लिमये यांच्या आगळ्यावेगळ्या कलाकृती प्रेक्षकांना अनुभवायला मिळतील. चित्र म्हणजे जशी एक स्वतंत्र अनुभूती असते, अगदी त्याचप्रकारे अक्षरचित्रे हीसुद्धा तितकीच सक्षम आणि समृद्ध अनुभूती आहे. या प्रदर्शनामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे.