मुंबई, मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात महाराष्ट्रात शनिवार,दि.२० रोजी ठाणे जिल्ह्यातील शिळफाटा बोगद्याच्या ब्रेक थ्रू झाल्यानंतर एक महत्वाचा टप्पा गाठला जाणार आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ब्रेक थ्रूसाठी केंद्रीय रेल्वे, माहिती व प्रसारण, तसेच इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव हे मुंबई उपस्थित राहणार आहेत.
शिळफाटा बोगदा हा बुलेट ट्रेन मार्गाच्या पॅकेज सी२ चा भाग आहे आणि अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकडून बांधला जात आहे. न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड ही पद्धत वापरून हा बोगदा बांधला जात आहे, ही पद्धती टनेल बोरिंग मशिन (TBM) पेक्षा भिन्न आहे. या पद्धतीत, भोवतालचा मातीचा भाग नैसर्गिक आधार म्हणून वापरला जातो. खोदकाम सुरु असताना, सुरंगाच्या भिंतींवर काँक्रीटचे आवरण बनवून जागेची स्थिरता आणि मजबुती सुनिश्चित केली जाते. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव शनिवार,दि.२० रोजी घणसोली येथील नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉपोरेशन लिमिटेडच्या कार्यस्थळी भेट देऊन शिळफाटा बोगद्याच्या कामाच्या प्रगतीला प्रोत्साहन देत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक करतील. हा टप्पा मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या महाराष्ट्र विभागासाठी आणि एकंदर मार्गासाठी मोठ्या यशाचे प्रतीक मानला जात आहे. हा प्रकल्प भारतीय हायस्पीड रेल्वे तंत्रज्ञानात एक नवा इतिहास रचणार आहे.
ट्रॅक व बांधकाम प्रगतीनुकतीच, प्रकल्पाच्या सिव्हिल आणि इन्फ्रास्ट्रक्चर कामात मोठी प्रगती झाली आहे. याच महिन्यात, ८ सप्टेंबर रोजी एनएचएसआरसीएलने लार्सन & टुब्रो (L&T) लिमिटेड सोबत महाराष्ट्रातील बुलेट ट्रेन ट्रॅकच्या डिझाईन, पुरवठा आणि बांधकाम साठी करार केला आहे. या करारामध्ये मुंबई बुलेट ट्रेन स्टेशन ते महाराष्ट्र–गुजरात सीमेवरील झरोलि गाव दरम्यान १५७ किमी लांब ट्रॅक, चार स्टेशन आणि ठाण्यातील रोलिंग स्टॉक डेपो यांचा समावेश आहे.