मुंबई : (Manoj Jarange Patil On High Court's Order) मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात मंगळवारी पुन्हा एकदा उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली आहे. मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली आहे. या सुनावणीमध्ये उच्च न्यायालयाने मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांना दिलासा देण्यास नकार दिला आहे. न्यायालयाने जरांगेंना आझाद मैदान रिकामे करण्याचे आदेश देऊन ३ वाजेपर्यंतची अंतिम मुदत दिली होती. मात्र, यावर जरांगेंनी मैदान सोडणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे.
सहा कोटी मराठा बांधवांचा न्यायालयाने विचार करावा. मराठा आंदोलक गावाखेड्यातून आलेले आहेत. मुंबईतील वातावरणाशी जुळवून घ्यायला वेळ लागत आहे, अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलकांनी दिली. तसेच हायकोर्टाच्या निर्णयाचा आदर आहे, परंतु, आझाद मैदान सोडणार नाही, अशी ठाम भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली असल्याचेही मराठा आआंदोलकांकडून सांगण्यात आले आहे.
हायकोर्टाच्या निर्देशांनंतरही मराठा आंदोलक ठाम
दुपारी ३ पर्यंत आझाद मैदान रिकामे करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले असले तरी आझाद मैदान सोडणार नसल्याची ठाम भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली आहे. आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत. आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही. प्रसंगी आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत. मनोज जरांगे पाटील यांचे आदेश येईपर्यंत आम्ही कुठेही जाणार नाही, असेही आंदोलकांचे म्हणणे आहे.