वंचितांच्या मानवतेसाठी...

    02-Sep-2025   
Total Views |

डॉ. विजय कोकणे हे सामाजिक कार्यकर्ते असून साहित्यिकही आहेत; त्यांच्यामुळे लाखो लोकांचे आयुष्य उजळले. त्यानिमित्ताने डॉ. कोकणे यांच्या आयुष्याचा मागोवा घेणारा हा लेख...

घरकाम करणारी एक महिला, तर दुसरी गृहिणी होती. मात्र, कौशल्य विकास प्रशिक्षण घेऊन या दोघींनी हजारो महिलांना प्रशिक्षित केले. त्यांच्या या कार्यासाठी काही वर्षांनी त्या दोघींना सरकारच्या ‘कौशल्याचार्य पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. तेव्हा डॉ. विजय कोकणे यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. या दोघीच नव्हे, तर आजपर्यंत लाखो व्यक्तींनी सक्षम व्हावे, स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे म्हणून, डॉ. विजय कोकणे यांनी ‘जनशिक्षण प्रशिक्षण संस्थे’च्या माध्यमातून अहोरात्र प्रयत्न केले होते. ‘नाही रे’ गटातील त्या भगिनींच्या सन्मानाने डॉ. विजय यांना कृतकृत्य वाटले. कोण डॉ. विजय? डॉ. विजय हिरामण कोकणे हे भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाची योजना ‘जन शिक्षण संस्थान’ रायगड योजनेचे विद्यमान संचालक आहेत. सामाजिक कार्यकर्ते, विश्लेषणकार, लेखक, कवी व चित्रकार म्हणून त्यांची आजपर्यंत ‘वेदांत’, ‘घोडदौड’, ‘वारली चित्रकला कलात्मक पुस्तिका’, ‘कॉलेज विश्व’, ‘प्रधानमंत्री सांसद आदर्श ग्राम योजना’, ‘मला कळलेले पीएफएमएस’ अशी सहा पुस्तके प्रकाशित आहेत.

समाजकार्य, कौशल्य, ग्रामीण विकास व महिला सक्षमीकरण इत्यादी विविध विषयांमध्ये एकूण सहा मानद डॉक्टरेट, तसेच सकारात्मक समाजसेवी कार्य, कौशल्य विकास समाज प्रबोधन, लेखन व संशोधनासाठी सर्वोच्च मानद ‘डि.लीट’ (डॉक्टर इन लिटरेचर) पदवी मिळवली आहे. सामाजिक, साहित्यिक कार्यासाठी त्यांना ‘आंतरराष्ट्रीय रवींद्रनाथ टागोर साहित्यरत्न पुरस्कार’, ‘भारत श्री राष्ट्रीय पुरस्कार’, ‘आदर्श विद्या सरस्वती राष्ट्रीय पुरस्कार’ व ‘राष्ट्रीय साहित्य शिरोमणी सन्मान पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे. ‘भारतीय समाजरत्न पुरस्कार’, ‘आयकॉन ऑफ एशिया पुरस्कार’, ‘युनिव्हर्सल मदर टेरेसा पीस अॅवॉर्ड’, ‘भारतीय नोबेल सोशल अॅक्टिव्हिस्ट ऑफ द इयर पुरस्कार’, ‘भारत गौरव पुरस्कार’ व ‘राष्ट्रीय पद्म गौरव पुरस्कर’ अशा अनेक पुरस्कारांचे ते मानकरी ठरले आहेत.

त्यांच्या यशाचा आलेख देदीप्यमान आहे. पण, या यशामागे सेवाकार्याची तपस्या आहे. या तपस्येची साधना सहज प्राप्त झालेली नाही, तर डॉ. विजय कोकणे यांच्या कार्याला त्यांच्या माता-पित्यांच्या सेवाकार्याचा आधारसुद्धा आहे. सेवेचा पिढीजात वारसा डॉ. विजय यांच्यामध्ये आहेच.

हिरामण कोकणे आणि सुमन कोकणे हे मराठा समाजाचे दाम्पत्य मूळचे त्र्यंबकेश्वर येथील खंबाळा गावचे. हिरामण हे एका स्वयंसेवी संस्थेत सामाजिक कार्यकर्ता म्हणून कार्यरत होते. ८०च्या दशकात कोकणे दाम्पत्य पनवेलला आले आणि पनवेलकरच झाले. तेव्हा येथील आदिवासी पाड्याचे प्रश्न पाहून या दोघांनी ठरवले की, या गावातच राहायचे. गावच्या समस्या लोकसहभागातून सोडवायच्या. त्याकाळी गावात ‘नारू’ हा आजार फैलावला होता. हिरामण यांनाही ‘नारू’चा संसर्ग झाला. पण, गावातील ‘नारू’च्या उच्चाटनासाठी त्याही अवस्थेत त्यांनी काम केले. पाड्यातील मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी वसतिगृह सुरू केले.

शोषित-वंचित समाजासाठी आपले आईवडील किती निःस्वार्थीपणे काम करतात, हे विजय यांनी पाहिले होते. तेच संस्कार त्यांच्यावर झाले. खेड्यापाड्यात सगळ्यात मोठा प्रश्न होता पाणीटंचाईचा. विजय यांनी विद्यार्थीजीवनातच सोबतच्या विद्यार्थ्यांना घेऊन, गावकर्यांच्या मदतीने गावाच्या परिसरात १५ बंधारे बांधले. गावातील पाण्याचा प्रश्न सुटला. गावकर्यांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. हे करत असतानाच, त्यांनी शिक्षण पूर्ण केले. आपण समाजासाठीच काम करायचे, हे त्यांनी ठरवले होते. त्यानुसार त्यांनी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून समाजकार्याला सुरुवात केली. आदिवासी पाड्यात न जाणे किती वर्षे नाशिकमधील आदिवासीबहुल पट्ट्यांमध्ये विजय यांनी समाजकार्याला सुरुवात केली. नाशिकमधील असा एकही पाडा नाही की, जिथे त्यांचा संपर्क नव्हता. त्यांनी या पाड्यांनाच आपले घर मानले. स्थानिकांच्या सहभागाने समाजात सकारात्मक बदल कसा करता येईल, यासाठी ते झटत राहिले.

मात्र, एक दिवस ते पाड्यातल्या लोकांशी चर्चा करत होते आणि त्याचवेळी ते चक्कर येऊन पडले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. पाच दिवसांनी जेव्हा ते शुद्धीवर आले, तेव्हा त्यांच्यासमोर त्यांचे आईबाबा होते. विश्रांती न घेता, अथक काम करत राहिल्याने तेे आजारी पडले होते. त्यानंतर त्यांनी दिव्यांगांच्या उत्थानासाठी काम सुरू केले. शोषित-वंचित समाजाच्या सर्वच घटकांना मानवी आणि सामाजिक न्यायाच्या कक्षेत कसे आणता येईल, यासाठी त्यांनी सर्व स्तरावर प्रयत्न केले. पुढे ते ‘जनशिक्षण संस्थान, रायगड’शी जोडले गेले. २१ वर्षांच्या सामाजिक कार्यात डॉ. विजय कोकणे यांनी एक लाखांहून अधिक व्यक्तींचे जीवनमान उंचावले आहे. ते म्हणतात, "माझे आईबाबा हे माझे आदर्श आहेतच. पण, डॉ. किरीट सोमय्या, डॉ. मेधा सोमय्या, डॉ. नितीन गांधी यांच्यामुळे सामाजिक कार्यात सुस्पष्टता आली. तसेच, पत्नी आशा आणि मुलगा वेदांत यांची साथ आहे. यापुढेही सामाजिक कार्यात आयुष्य व्यतित करायचे आहे. संपर्कातील कुणीही वंचित राहू नये, हीच इच्छा आहे.” डॉ. विजय कोकणे यांची इच्छा पूर्ण होवो, हीच शुभेच्छा!

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.