अमेरिकेकडून ‘एण्टिफा’ दहशतवादी संघटना म्हणून घोषित ; ट्रुथ सोशल प्लॅटफॉर्मवरून ट्रम्प यांची माहिती

    19-Sep-2025   
Total Views |

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘एण्टिफा’ला दहशतवादी संघटना घोषित केले आहे. ट्रम्प यांनी यास धोकादायक, अति डाव्या विचारसरणीचे आणि एण्टी-फॅसिस्ट आंदोलन असे संबोधले. काही दिवसांपूर्वी यूटा व्हॅली विद्यापीठ परिसरातील एका कार्यक्रमात ट्रम्प यांचे समर्थक आणि त्यांचे निकटवर्तीय चार्ली किर्क यांची हत्या करण्यात आली होती. त्याच्या हत्येचा आरोपी टायलर रॉबिन्सन याचे संबंध एण्टिफाशी असल्याचे मानले जात आहे. ट्रुथ सोशल प्लॅटफॉर्मवर या निर्णयाची ट्रम्प यांनी घोषणा केली.

ते म्हणाले की, मला अमेरिकन जनतेला सांगताना आनंद होत आहे की मी एण्टिफाला दहशतवादी संघटना घोषित करत आहे. हे एक आजारी, धोकादायक, कट्टर अति डाव्या विचारसरणीचे आणि मोठे दहशतवादी संघटन आहे. मी ठामपणे शिफारस करतो की एण्टिफाला आर्थिक मदत करणाऱ्यांची कायदेशीर चौकशी करण्यात यावी. या विषयाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद!” एण्टिफा’ हा शब्द एण्टी-फॅसिस्ट मधून आला आहे. अमेरिकेत फॅसिझमविरोधी, उग्रवादी व अति डाव्या विचारसरणीच्या लोकांना एण्टिफा म्हटले जाते. यांचे कोणतेही अधिकृत नेतृत्व किंवा ठरावीक संघटनात्मक रचना नाही. ते वर्णभेद, नव-नाझीवाद, नव-फॅसिझम आणि श्वेत वर्चस्ववाद याच्या विरोधात उभे राहतात.

अशी माहिती आहे की, एण्टिफाचे समर्थक याला एक चळवळ मानतात. यांचे कार्यालय नसते, अधिकृत नेते नसतात. हे आपापसात रणनीती आणि विचारविनिमय करतात. साधारणपणे ते शांततापूर्ण निदर्शने करतात, परंतु उजव्या विचारांच्या सभा, रॅली यांचा विरोध करतात. एण्टिफाशी संबंधित लोक सोशल मीडिया, मेसेजिंग सेवा, एन्क्रिप्टेड पीअर-टू-पीअर नेटवर्क आणि ‘सिग्नल’ वरून जोडलेले असतात. काही राज्यांमध्ये ते नियमित बैठकाही घेतात. एण्टिफाला आता अमेरिकेतील दहशतवादी संघटनांच्या यादीत समाविष्ट केले आहे. परंतु त्याला आयएसआयएस आणि अल-कायदा सारख्या दहशतवादी संघटनांच्या यादीत समाविष्ट केले जाणार नाही.

आपल्या पहिल्या कार्यकाळातही ट्रम्प यांनी एण्टिफावर लगाम घालण्याचा प्रयत्न केला होता. जॉर्ज फ्लॉयड यांच्या हत्येनंतर ट्रम्प यांनी एण्टिफाला दहशतवादी संघटना घोषित करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यावेळी तत्कालीन अटर्नी जनरल विल्यम बार यांनी म्हटले होते की एण्टिफाची कृत्ये ‘घरेलू दहशतवादाला’ चालना देतात. परंतु एफबीआयचे संचालक क्रिस्टोफर रे यांनी साक्षीदारपदी सांगितले होते की, एण्टिफा हे एक संघटन नाही, तर एक विचार आहे. त्याची कोणतीही रचना नाही. आणि एखाद्या गटाला दहशतवादी घोषित करण्यासाठी संघटनात्मक रचना असणे आवश्यक आहे.


ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक