बॅप्स संस्थेविरोधात सुरु असलेली चौकशी अधिकृतरीत्या बंद

    19-Sep-2025   
Total Views |

मुंबई  : अमेरिकेच्या न्याय विभागाने बॅप्स संस्था आणि तिच्या सहयोगी संघटनांविरोधात सुरू असलेली चौकशी अधिकृतरीत्या बंद केली. ही माहिती स्वतः न्यूयॉर्कस्थित बॅप्स स्वामीनारायण संस्थेने दिली. संस्थेने सांगितले की चौकशीत बॅप्स किंवा त्याच्याशी संबंधित कोणत्याही व्यक्तीवर आरोप सिद्ध झाले नाहीत. २०२१ मध्ये न्यू जर्सीतील रॉबिन्सविल येथील बॅप्स मंदिरावर झालेल्या छापेमारीनंतर ही चौकशी सुरू झाली होती.

संस्थेने सांगितले, “अमेरिकेच्या न्याय विभागाने आणि न्यू जर्सीतील युनायटेड स्टेट्स अटर्नी ऑफिसने बॅप्स आणि बॅप्स स्वामीनारायण अक्षरधामच्या बांधकामासंबंधी चालू असलेली चौकशी बंद करण्याचा घेतलेला निर्णय आम्ही स्वागतार्ह मानतो. हा निर्णय आमच्या त्या भूमिकेला अधिक बळकटी देतो जी आम्ही सुरुवातीपासून घेतली होती; की, बॅप्स स्वामीनारायण अक्षरधाम हे शांती, सेवा आणि भक्तीचे स्थान आहे आणि हजारो श्रद्धाळूंच्या निष्ठा, प्रेम व स्वेच्छेने केलेल्या सेवेवर उभे राहिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २०२१ मध्ये काही लोकांनी बॅप्स स्वामीनारायण संस्थेवर खटला दाखल केला होता, ज्यात मानव तस्करी, श्रम कायदा आणि इतर आरोप लावण्यात आले होते. गुरुवारी न्यू जर्सीच्या फेडरल कोर्टात दाखल केलेल्या पत्रात, बॅप्सच्या वकिलांनी सांगितले की १५ आणि १६ सप्टेंबर रोजी न्याय विभागाने अधिकृतरीत्या कळवले, की चौकशी संपली असून संस्था किंवा संबंधित व्यक्तींवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही.

बॅप्सच्या एका प्रवक्त्याने म्हटले, “हा गेल्या चार वर्षांच्या अनिश्चिततेचा शेवट आहे. आम्ही नेहमीच म्हटले होते की आमच्यावर लावलेले आरोप खोटे आणि निराधार आहेत. आजचा निर्णय आमच्या त्या विश्वासाला खरा ठरवणारा आहे. आम्ही अमेरिका आणि जगभरातील आमच्या आध्यात्मिक आणि सेवा उपक्रमांना पुढे चालू ठेवू.”

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक