सोनार नव्हे शरियाचा बांगला!

    19-Sep-2025   
Total Views |

धार्मिक प्रशिक्षकाऐवजी संगीत आणि नृत्यशिक्षकांची नियुक्ती पूर्णपणे अस्वीकार्ह आहे. संगीत आणि नृत्य हा विषय विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य नाही. ज्यांना आपल्या मुलांना हे शिक्षण द्यायचे आहे, त्या पालकांनी त्यांच्या घरी नृत्य किंवा संगीत शिक्षक नेमून त्यांच्या पाल्यांना शिक्षण द्यावे. मुलांना धार्मिक शिक्षण देणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांच्यात इस्लामिक मूल्य रूजतील. जर तसे केले नाही, तर पूर्ण बांगलादेश पुन्हा रस्त्यावर उतरेल,” अशी धमकी बांगलादेशातील ‘जमात-ए-इस्लामी’ या संघटनेचे महासचिव मिया गुलाम परवार याने बांगलादेशाच्या अंतरिम सरकारला दिली आहे. हे सगळे पाहून बांगलादेशचे राष्ट्रगीत आठवल्याशिवाय राहात नाही. सध्यातरी बांगलादेशाचे राष्ट्रगीत बदललेले नाही. रविंद्रनाथ टागोरांनी लिहिलेल्या बांगलादेशाच्या राष्ट्रगीतामध्ये म्हटलेले आहे,

माझा स्वर्णिम बंगाल
मी तुझ्यावर प्रेम करतो
सदैव तुझे आकाश, तुझा वायु
माझ्या आत्म्यामध्ये
बासुरीसारखी वाजत असतात


बांगलादेशाच्या राष्ट्रगीतामध्ये ‘बासुरी’ म्हणजे संगीतसंदर्भ आहे. मात्र, आज बांगलादेशमध्ये संगीत आणि नृत्यशिक्षण विद्यार्थ्यांनी घेऊ नये, यासाठी कट्टरतावाद्यांनी त्यांच्या अंतरिम सरकारलाच धमकी द्यावी? त्यांची ही हिंमत झाली. कारण, बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतर काय घडले, हे त्यांना चांगलेच माहीत आहे. बांगलादेशचे पूवचे सरकार कोसळले, तो मुद्दा काही हिंदू विरुद्ध मुस्लीम नव्हता. तसेच तिथे तसे वरवर वातावरणही नव्हते. नव्हे, तोपर्यंत तिथल्या हिंदूंना कदाचित जाणीवही नव्हती की, ज्या बांगलादेशच्या निर्मितीसाठी त्यांच्या पूर्वजांनी रक्त सांडले, त्याच बांगलादेशमध्ये त्यांचे शिरकाण होईल. पण, तसे झाले! बांगलादेशमध्ये सत्तांतरण व्हावे, यासाठी लोक रस्त्यावर उतरले. त्यांना शेख हसीना यांना सत्तेतून खाली खेचायचे होते. शेख हसीना याही मुस्लीमच होत्या. मात्र, त्यांच्या निवासस्थानावर हल्ला करून प्रचंड लूटमार केली गेली. आईच्या-आजीच्या वयाच्या असलेल्या शेख हसीना यांची अंतर्वस्त्रेही डोक्यावर घेऊन मिरवत हे लोक लूटमार करत होते. पण, त्यानंतर काय झाले? याच लोकांनी बांगलादेशातील हिंदू वस्त्यांवर, त्यांच्या मंदिरांवर सशस्त्र हल्ले केलेे. हिंदूंना वेचून वेचून त्रास दिला. त्यांची हिंसेची जी नेहमीची पद्धत आहे, त्याप्रमाणे हिंदूंच्या बायका-मुलींवर अत्याचार केले. हिंदूंवर अत्याचार करण्यासाठीच हा सत्तांतराचा मुखवटा वापरण्यात आला का, असे बांगलादेशचे चित्र झाले. जागतिक स्तरावर बांगलादेशमधील हिंदूंवर होणारा अत्याचार बाहेर आला. या हिंदूंवर अनन्वित अत्याचारामागचे कारण केवळ एकच, ते म्हणजे ते गैरमुस्लीम होते, हिंदू होते!

त्यावेळी बांगलादेशात आतापर्यंत कुठेतरी लपून राहिलेली धर्मांधता सगळ्या जगाने पाहिली. अल्पसंख्याक हिंदूचे जगणे तर नरक झाले. या सगळ्यामुळे बांगलादेशच्या राजकीय नेत्यांना कळून चुकले की

सत्तेत राहायचे असेल, तर बांगलादेशातील धर्मांधांचे समर्थन करायलाच हवे. या कट्टरपंथीयांच्या अटी-शत मान्य केल्या, तरच आपण बांगलादेशात सत्तेत येऊ.

इथल्या बहुसंख्य इस्लामिक जनतेला कायमच आपल्या ताब्यात ठेवायचे, तर त्यांना अविवेकी कट्टरतेने बांधून ठेवायला हवे. कट्टरपंथीयतेची झापडे त्यांच्या डोळ्यांवर लावली, तर ते विकास, सुरक्षा वगैरे मुद्द्यांवर आवाज उठवणार नाहीत. बांगलादेशातील जनता राजकीय अस्थिरता, सामाजिक नीतीमूल्यांचा ऱ्हास किंवा बांगलादेशनिर्मितीचा इतिहास विसरेल.

त्यामुळे बांगलादेशमध्ये ‘जमात-ए-इस्लामी’च्या मिया गुलाम परवारने शाळांमधील संगीत-नृत्यशिक्षक नियुक्ती थांबवा आणि धार्मिक शिक्षक नेमा, असे म्हटले. खरे तर, बांगलादेशाची निर्मिती ही बांगला संस्कृती भाषेच्या संवर्धनासाठी झाली होती. त्या बांगला संस्कृतीमध्ये साहित्य होते, संगीत होते, काव्य होते आणि नृत्यही होते. ही संस्कृती बांगलादेशाच्या हिंदूंचीच नव्हती, तर बांगलादेशामध्ये असलेल्या मुस्लिमांची, जे मूळचे हिंदूच होते, त्यांचीही ही संस्कृती होती. त्यामुळेच बांगलादेशनिर्मितीनंतर या देशात साहित्य, संगीत, कला आणि नृत्य यांना कधीही, कुणीही विरोध केला नाही. मात्र, आता बांगलादेशला कट्टरपंथीयांचे ग्रहण लागले आहे. त्यांना ‘सोनार बांगला’ हा ‘शरिया’युक्त बांगला करायचा आहे.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.