मुंबई : वाराणसीमध्ये सलग तीन वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनतेने निवडून दिले. याऊलट महाराष्ट्रातील जनतेने तुम्हालाच हादरे दिले आहेत, असे प्रत्युत्तर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी शुक्रवार, १९ सप्टेंबर रोजी संजय राऊत यांना दिले.
नवनाथ बन म्हणाले की, "राहुल गांधींनी काल जो बॉम्ब फोडण्याचा प्रयत्न केला बॉम्ब नसून फुसका बार होता. ती सुरसुरी होती आणि त्याचा प्रकाश राहुल गांधींच्या डोक्यात पडायला हवा होता. याच फुसक्या बाराची बाजू घेण्याचे काम संजय राऊत करतात. महाराष्ट्राच्या जनतेने आधीच राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यावर मतांचा हायड्रोजन बॉम्ब टाकून त्यांना पराभूत केले आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मतदार तुम्हाला पुन्हा मतांचा बॉम्ब टाकून हादरे दिल्याशिवाय राहणार नाहीत.”
संजय राऊत राहुल गांधींचे प्रवक्ते निवडणूक आयोग भाजपचे कार्यकर्ते आहेत, या संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर बोलताना ते म्हणाले की, “निवडणूक आयोग भाजपचे प्रवक्ते आहेत का, किंवा भाजप निवडणूक आयोगाचे प्रवक्ते आहेत, हे सांगण्याचा अधिकार संजय राऊत यांना नाही. कारण ते स्वतः राहुल गांधींचे स्थायी प्रवक्ते झाले आहेत. राहुल गांधी दिल्लीत बोलतात आणि दुसऱ्या दिवशी मुंबईत राऊत दवंडी पिटतात. आपण सिल्व्हर ओकची चापलुसी करता आणि मातोश्रीचे मीठ खात असताना उद्धव ठाकरे यांना कसे अडचणीत आणता, हे जनतेला ठाऊक आहे,” अशी टीकाही बन यांनी केली.
राऊतांनी शिवसेना संपवली"आनंद दिघे यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेला. पण राऊत सातत्याने हिंदूविरोधी लोकांचा वारसा पुढे नेत आहेत. अफजलखानाचा, औरंगजेबाचा वारसा पुढे नेणारे संजय राऊत दिघेसाहेबांविषयी चकार शब्द काढण्याच्या लायकीचे नाहीत. दिघेसाहेबांनी शिवसेना वाढवली आणि राऊतांनी शिवसेना हिरवी सेना करून संपवली. त्यामुळे त्यांना आनंद दिघेंसारख्या नेत्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही,” असेही ते म्हणाले.
वर्षाताईंची मती चोरीला गेलीकाँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांच्या टीकेला उत्तर देताना नवनाथ बन म्हणाले, “वर्षाताई, मत नाही तर मती चोरीला गेली आहे. काँग्रेसला सलग ४० पराभव मिळालेत. मुंबईत काँग्रेस संपली आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वामुळे काँग्रेसला देशभर पराभव मिळत असून त्याच राहुल गांधींच्या सोबत राहून तुमचीही मती चोरीला गेली आहे.”