मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक माधव विनायक कुलकर्णी (मधुभाई) यांचे गुरुवार, दि. १८ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता छत्रपती संभाजीनगर येथे निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांनी देहदान केले असून त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी समर्पण कार्यालयात ठेवण्यात आले होते. मधल्या काळात सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत त्यांना रुग्णालयात भेटून गेले होते.
कोल्हापूर येथे दि. १५ मे १९३८ मध्ये जन्मलेल्या मधुभाईंचे शालेय शिक्षण चिकोडी, जिल्हा बेळगाव (कर्नाटक) येथे झाले. १९५४ मध्ये कोल्हापूर विद्यापीठ हायस्कूलमधून त्यांनी मॅट्रिक पूर्ण केली. पुढे १९५८ मध्ये रुपारेल कॉलेज, मुंबई येथून बी.ए. पदवी प्राप्त केली. काही काळ त्यांनी मुंबई सेल्स टॅक्स खात्यात नोकरी केली. त्यानंतर १९६०-६१ मध्ये सोलापूरच्या दयानंद शैक्षणिक महाविद्यालयातून बी.एड. पूर्ण केले.
शालेय जीवनापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मधुभाई जोडले गेले होते. १९६२ मध्ये ते संघाचे प्रचारक म्हणून कार्यरत झाले. तालुका प्रचारक, जिल्हा प्रचारक, विभाग प्रचारक, पुणे महानगर प्रचारक, गुजरात प्रांत प्रचारक, पश्चिम क्षेत्र प्रचारक, अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या. २०१५ पर्यंत ते संघाच्या कार्यकारिणी मंडळाचे सदस्य होते. त्यानंतर दायित्वमुक्त ज्येष्ठ प्रचारक म्हणून ते संभाजीनगर येथे कार्यरत राहिले.
पुण्यात तळजाई येथे महाराष्ट्राचे भव्य शिबिर त्यांच्याच काळात यशस्वीरित्या संपन्न झाले. तरुण स्वयंसेवकांसाठी त्यांनी लिहिलेले “अथातो संघजिज्ञासा” हे पुस्तक अनेक भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. अखेरच्या क्षणापर्यंत शाखा, प्रवास, संवाद यात त्यांचा सक्रिय सहभाग कायम राहिला. त्यांच्या निधनामुळे संघपरिवारासह समाजजीवनात एक पोकळी निर्माण झाली आहे.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक