‘हाता’ची घडी अन्...

    18-Sep-2025   
Total Views |

एकीकडे काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी मतचोरीवरून रान पेटवत असताना, कर्नाटकमधील एका काँग्रेस आमदाराची आमदारकी रद्द करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे एकीकडे राहुल गांधी मोदी सरकार, निवडणूक आयोगावर मतचोरीवरून कंठशोष करीत असताना, दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील आमदाराने केलेल्या प्रतापांमुळे काँग्रेसवर ‘हाता’ची घडी घालण्याची वेळ आली आहे.

कर्नाटकच्या कोलार जिल्ह्यातील मालूर मतदारसंघातील आमदार के. वाय. नंजेगौडा यांची आमदारकी रद्द करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला. तसेच, २०२३च्या या मतदारसंघातील पुन्हा मतमोजणी करण्याचा आदेशही उच्च न्यायालयाने दिला आहे. काँग्रेसचे उमेदवार के. वाय. नंजेगौडा यांच्याविरुद्ध भाजपचे पराभूत झालेल्या के. एस. मंजुनाथ गौडा यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. भाजपचे उमेदवार के. एस. मंजुनाथ गौडा यांनी मतमोजणी प्रक्रियेत अनियमिततेचा आरोप काँग्रेसवर केला होता. हा खटला २०२३ ते २०२५ असा जवळजवळ दोन वर्षे उच्च न्यायालयात चालल्यानंतर यासंदर्भात काल निकाल देण्यात आला. परिणामी, न्यायालयाने फेरमतमोजणीचे आदेश देत, काँग्रेसचे आमदार के. वाय. नंजेगौडा यांची निवडणूकच अवैध घोषित केली. पण, हे प्रकरण पुढे साहजिकच सर्वोच्च न्यायालयात पोहोचेल, यात शंका नाही.

राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष या प्रकरणामुळे चांगलेच तोंडावर आपटले आहेत. कारण, नुसते धादांत खोटे आरोप करायचे आणि धुरळा उडवून द्यायचा, एवढेच उद्योग राहुल गांधींनी आजवर केले. पण, त्यापैकी एकही आरोप त्यांना न्यायालयात सिद्ध करता आला नाही. त्याउलट त्यांच्याच पक्षाच्या आमदाराची निवडणूक आणि तीही कर्नाटकमध्येच न्यायालयाने रद्द ठरवून एक सणसणीत चपराक राहुल गांधींनाच लगावली आहे. अन्य पक्षांवर मतचोरीचे बेछूट आरोप करायचे आणि काँग्रेस पक्ष कसा स्वच्छ राजकीय चारित्र्याचा आहे, असा बुरखा पांघरायचा, ही काँग्रेसची कुनीती जनतेसमोर आहेच. तरीही ‘गिरे तोभी टांग उपर’ असेच राहुल गांधींचे अरेरावीचे वर्तन आणि वाणी राहील, यात तीळमात्र शंका नाही.

तोंडावर बोट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींवरील ‘डिपफेक’ व्हिडिओनंतर काँग्रेसवर प्रचंड टीका झाली. मोदींनीही याविषयी जाहीर नाराजी व्यक्त करीत काँग्रेसने गाठलेल्या राजकारणाच्या या खालच्या पातळीचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. अपेक्षेप्रमाणे हे प्रकरणसुद्धा न्यायालयात गेले आणि काल पटना उच्च न्यायालयाने हा व्हिडिओ समाजमाध्यमांवरून हटविण्याचे आदेश काँग्रेस पक्षाला दिले. खरं तर मोदींच्या आईवरील काँग्रेसच्या त्या व्हिडिओनंतर लगोलग सोनिया आणि राहुल गांधींचेही असेच ‘डिपफेक’ व्हिडिओ व्हायरल झाले. त्यामुळे ‘जशास तसे’ या पद्धतीने काँग्रेसला प्रत्युत्तर मिळाले खरे. पण, त्यातून धडा घेईल, तो काँग्रेस पक्ष कसला...

लोकशाहीमध्ये राजकारण म्हटले की, राजकीय टीकाटिप्पणी ही ओघाने आलीच. ती होऊ नये, असे अजिबात नाही. पण, त्याचे तारतम्य नेत्यांपासून ते अगदी कार्यकर्त्यांनीही बाळगणे गरजेचे. परंतु, दुर्दैवाने सध्याचे राजकीय वातावरण इतके गढूळ झाले आहे की, याची अपेक्षा बाळगणेही ‘माकडाच्या हाती कोलित’ प्रमाणे काँग्रेसच्या हाती ‘एआय’ तंत्रज्ञान लागलेले दिसते. त्याचाच उठसूठ वापर काँग्रेसच्या आयटी सेलकडून राजकीय टीकाटिप्पण्यांसाठी केला जातो. कालही नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त एकीकडे राहुल गांधींनी ट्विटरवरून नाही म्हणायला पंतप्रधानांना शुभेच्छा देण्याचा साळसूदपणाचा शिष्टाचारी आव आणला. पण, त्यांच्याच पक्षाच्या ट्विटर हॅण्डलवरून दिवसभर ‘माय मोदी स्टोरी’ या हॅशटॅगअंतर्गत मोदी सरकार हे कसे अपयशी ठरले आहे, त्याचे ‘एआय’ जनरेटेड व्हिडिओ दिवसभर प्रसारित केले गेले. त्यामुळे ज्यांना आजवर पंतप्रधानांचाच कधी सन्मान करता आला नाही, ते पंतप्रधानांच्या मातोश्रींविषयीही सन्मान दाखवतील, याची अपेक्षा बाळगणेही गैरच. अशा दोन न्यायालयीन दणक्यांनंतर तरी काँग्रेस पक्षाच्या बेताल आणि बेजबाबदार कार्यपद्धतीत सुधारणा होईल, याची शक्यता तरीही धुसरच. कारण, असे कितीतरी न्यायालयीन दणके वेळोवेळी बसल्यानंतरही काँग्रेसने अथवा राहुल गांधींनी आपल्या कार्यशैलीत काडीमात्रही बदल केलेला नाही. पण, जो घडलेल्या चुकांमधून कोणताही धडा घेत नाही, त्याच्यासारखा दुर्दैवी तोच!

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची