मुंबई : मणिपूरमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेकांचे मोठे नुकसान झाले. या संकटग्रस्त भागांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मणिपूर, मणिपूर सेवा समिती आणि सेवा भारती मणिपूर यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. बुधवारी थौबल जिल्ह्यातील स्वयंसेवकांनी थौबल हाओखा येथील सुमारे ३०० कुटुंबांना पिण्याचे पाणी, तांदूळ, कपडे आणि इतर जीवनावश्यक साहित्य वितरित केले. राज्याच्या इतर भागांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी स्थानिक क्लब, स्वयंसेवक आणि कार्यकर्त्यांबरोबर समन्वय साधला जात आहे.
मणिपूर सरकारने खबरदारी म्हणून इंफाळ ईस्ट, इंफाळ वेस्ट, थौबल, बिष्णुपूर आणि ककचिंग जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. अनेक शासकीय कार्यालये आणि बाजारपेठाही अंशतः पाण्याखाली गेली. काही भागांत वीज आणि पाणीपुरवठा खंडित झाला. संघ स्वयंसेवककांच्या पुढाकाराबरोबरच राज्य आपत्ती प्रतिसाद दल, लष्कर आणि असम रायफल्स यांनाही बचाव व स्थलांतरासाठी तैनात करण्यात आले आहे. प्रभावित खेड्यांमध्ये मदत शिबिरे सुरू करण्यात आली असून तेथे अन्न, औषधे आणि सुरक्षित पिण्याचे पाणी वितरित केले जात आहे. सध्या प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून मदत व पुनर्वसनाची कामे पुढील काही दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे.
जिल्हानिहाय पूरस्थिती...
इंफाळ ईस्ट : इरील नदीने बंधारा फोडल्यामुळे क्षेत्री अवांग लैकै, कोंगबा आणि खुरईसारख्या भागांत मोठा पूर आला. जवाहरलाल नेहरू मेडिकल सायन्सेस संस्था पोरमपट येथे पाण्याखाली गेल्याने रुग्णांना बाहेर काढावे लागले.
इंफाळ वेस्ट : उरीपोक, सगोलबंद, लंफेलपट आणि आसपासच्या वसाहतींमध्ये पाणी साचल्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले.
थौबल : हाओखा, वांगजिंग, यैरिपोक आणि शेजारील गावे पुरामुळे सर्वाधिक प्रभावित झाली. यैरिपोक येथील लोखंडी पूल वाहून गेल्यामुळे संकट आणखी गंभीर झाले.
इतर जिल्हे : उखरूलमध्ये दरड कोसळल्याने रस्ते बंद झाले, तर बिष्णुपूर आणि ककचिंग येथे शेतजमिनी व घरं पाण्याखाली गेली.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक