कल्याण : केडीएमसीच्या प्रभागात 'स्वच्छता ही सेवा' या उक्तीला अनुसरुन राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता अभियानाला बुधवारपासून प्रारंभ झाला. दि.१७ सप्टेंबर २०२५ ते दि.२ ऑक्टोबर २०२५ या पंधरवड्यात स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जयंती दिन म्हणजेच २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. या स्वच्छ भारत दिवसाची पूर्व तयारी म्हणून, स्वच्छ भारतासाठी स्वयं प्रेरणा व सामुहीक कृतीला बळकटीकरण देण्यासाठी, शासनाच्या निर्देशानुसार स्वच्छता ही सेवा अभियान महापालिकेमार्फत राबविण्यात येत आहे.
महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानांतर्गत ठिकठिकाणी स्वच्छता मोहिम जनजागृती रॅली, आर.आर.आर.सेंटर्स कार्यरत करणे, सिंगल युज प्लॅस्टिकवर दंडात्मक कारवाई, नागरीक व विद्यार्थी यांच्या सहभागातून जनजागृतीसाठी सायकल रॅली, स्वच्छता शपथ, सफाई मित्र सुरक्षा शिबीर, स्वच्छते संदर्भात शाळांमध्ये चित्रकला व तत्सम स्पर्धांचे आयोजन, स्वच्छ भारत दिवसांनिमित्त प्रभाग फेरीचे आयोजन अशा अनेकविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यानुसार बुधवारी महापालिकेच्या विविध प्रभागांत स्वच्छतेबाबत शपथ घेऊन, स्वच्छता मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. त्याचप्रमाणे नागरीकांमध्ये कचरा संकलनाबाबत जनजागृती करण्यासाठी त्यांस मार्गदर्शन करुन जनजागृतीपर रॅली देखील काढण्यात आली.