मोनोरेल काही काळासाठी बंद ठेवणार; नव्या ट्रेन ताफ्यात आणण्याचे नियोजन

Total Views |

मुंबई : भारतातील पहिली मोनोरेल अशी ख्याती असणाऱ्या मुंबईतील 'चेंबूर ते जेकब सर्कल' या मार्गावरील मोनोरेल सेवा सुरक्षा आणि व्यवस्थापनाच्या कामासाठी शनिवार,दि.२० सप्टेंबरपासून काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी यांनी दिली आहे. मागील एका महिन्यात प्रवासी सेवा दरम्यान तीन वेळा मोनोची सेवा तांत्रिक बिघाडामुळे ठप्प झाल्याने हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

महानगर आयुक्त संजय मुखर्जी यांनी सांगितले की, मोनोरेलचे परीक्षण होणे गरजेचे आहे. हे पाहता राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी आम्ही चर्चा केली आहे. पुढील काही दिवस आम्ही मुंबई मोनोरेलला एक सार्वजनिक नोटीस जारी करणार आहोत. मोनोरेलने केवळ २५ ते ३० प्रवासी प्रवास करतात. मोनोरेलचे परीक्षण आणि सर्वेक्षणासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षेतेखाली एका उच्चस्तरीय समितीचे गठन करण्यात येईल. यासमितीत याविषयात तज्ज्ञ व्यक्ती,आयआयटी मुंबईचे तज्ज्ञ प्राध्यापक असतील. हे मोनोरेल संचलनात सर्व प्रक्रियेची पाहणी करतील. आम्ही लवकरच नवीन गाड्या सुरू करत आहोत, अशी माहिती डॉ. मुखर्जी यांनी यावेळी दिली.

एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार,दि.२० सप्टेंबर २०२५ पासून मोनोरेल सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार, चेंबूर आणि संत गाडगे महाराज चौक दरम्यान दोन्ही दिशांवरील मोनोरेल सेवा पुढील सूचना येईपर्यंत बंद राहतील. नागरिकांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्याची विनंती केली आहे. या काळात नव्याने ताफ्यात आलेल्या गाड्या आणि सिग्नलिंग यंत्रणा बळकट करण्यात येतील. हैदराबादमध्ये स्वदेशी पद्धतीने विकसित केलेली कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी) सिस्टम पहिल्यांदाच मुंबई मोनोरेलमध्ये बसवली जात आहे.

नवे बदल काय ?

मार्गावर ३२ ठिकाणी ५ इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीमची चाचणी सुरू आहे. २६० वाय-फाय अॅक्सेस पॉइंट्स, ५०० आरएफआयडी टॅग्ज, ९० ट्रेन डिटेक्शन सिस्टम आणि अनेक डब्ल्यूएटीसी युनिट्स आधीच बसवले आहेत. वेसाईड सिग्नलिंगचे काम पूर्ण झाले. इंटिग्रेटेड चाचणी सुरू आहे. ही अत्याधुनिक प्रणाली सुरक्षितता वाढवेल, ट्रेनमधील अंतर कमी करेल आणि सेवा विश्वासार्हता सुधारेल.

१० नवीन रेल्वे डबे ताफ्यात

एमएमआरडीएने एसएमएच रेलच्या सहकार्याने मेसर्स मेधा कडून १० नवीन मेक-इन-इंडिया रेल्वे गाड्या खरेदी केल्या आहेत. त्यापैकी ८ ट्रेन मोनोच्या ताफ्यात आल्या आहेत. तर नववा रेकची चाचणी सुरु आहे. तर १० वा रेक अंतिम असेंब्लीमध्ये आहे.

मोनोरेल सेवा बंद ठेवण्याची कारणे

सकाळी ६:१५ ते रात्री ११:३०पर्यंत दैनंदिन सेवा सुरू असल्याने चाचणी आणि व्यवस्थापनेसाठी केवळ रात्री फक्त ३.५ तास इतकी मर्यादित वेळ मिळते.

ब्लॉक कालावधीत करण्यात येणारी कामे

• नवीन रेल्वे डबे आणि सिग्नलिंग सिस्टमची स्थापना, संचलन आणि चाचणी

• विनाअडथळा कामगिरीसाठी जुन्या रेल्वे डब्यांचे संपूर्ण दुरुस्ती आणि रेट्रोफिटिंग

• नव्या मोनो संचलनासाठी प्रशिक्षित आणि पुरेसे मनुष्यबळ तैनात करण्यात येईल.

वारंवार घडणाऱ्या दुर्घटना

दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यात मोनोरेलची सेवा दोन वेळा प्रभावित झाली. मंगळवार दि.१९ ऑगस्ट रोजी मुसळधार पावसामुळे हार्बर मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली. अशावेळी यामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मोनोरेलने प्रवास करणे निवडले. मात्र, प्रवाशांचा अतिरिक्त भर आल्याने एका वळणावर मोनो बंद पडली. बचावकार्याद्वारे या प्रवाशांना जवळपास तासाभरानंतर सुरक्षित बाहेर काढण्यात आले. अशीच एक घटना २ दिवसांपूर्वी देखील घडली. यापूर्वीही, मोनोरेलमध्ये आग लागण्याची दुर्घटना घडली होती.

मोनोरेलला अधिक मजबूत स्वरूपात परत आणू

"मोनोरेलचा ब्लॉक हा मुंबईच्या वाहतुकीचा कणा मजबूत करण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. नवीन रेक, प्रगत सीबीटीसी सिग्नलिंग आणि विद्यमान ताफ्याचे नूतनीकरण यामुळे नागरिकांना सुरक्षित आणि अधिक विश्वासार्ह सेवा मिळतील. काम जलद आणि अचूकतेने पूर्ण करण्यासाठी हा छोटा ब्लॉक आवश्यक आहे. मुंबईकरांच्या सहकार्याने, आम्ही मोनोरेलला अधिक मजबूत स्वरूपात परत आणू."
- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा एमएमआरडीएचे अध्यक्ष


गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.