मुंबई : (Meenatai Thackeray statue defaced) मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) जवळ असलेल्या मीनाताई ठाकरे (शिवसेनाप्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी) यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मीनाताईंच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीने लाल रंग फेकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
हा प्रकार समोर आल्यानंतर शिवाजी पार्क परिसरात उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. पोलिसही या परिसरात दाखल झाले असून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने आरोपीचा शोध घेत आहेत. या परिसरात खबरदारी म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या घटनेचा माहिती मिळताच उबाठा स्थानिक शाखाप्रमुख आणि उपशाखाप्रमुख घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी पुतळ्यावर आणि चौथऱ्यावर उडालेला लाल रंग त्यांनी पुसला.
स्थानिक आमदार महेश सावंत यांनी सांगितले की, "आज सकाळी आठ वाजण्याच्या सु्मारास आम्हाला या घटनेची माहिती मिळाली. पोलिसांच्या माहितीनुसार सकाळी ६.१० वाजेपर्यंत सगळं व्यवस्थित असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले आहे. याचा अर्थ ही घटना सकाळ ६.१० वाजल्यानंतर झाली असावी अशी माहिती त्यांनी दिली."
वातावरण दूषित करण्यासाठी कोणीतरी हे कृत्य केल्याचा आरोप उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या घटनेमागे एखादा समाजकंटक आहे की माथेफिरू आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली जात आहे. या घटनेची माहिती होताच खासदार अनिल देसाई, आमदार महेश सावंत, माजी महापौर विशाखा राऊत, शाखा प्रमुख अजित कदम घटनास्थळी दाखल झाले. आमदार मिलिंद नार्वेकर यांनीदेखील घटनास्थळी भेट माहिती घेतली.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\