मुंबई : बीड जिल्ह्यातील नागरिकांच्या दोन पिढ्यांहून अधिक काळ चाललेल्या संघर्षाला अखेर आज दि.१७ सप्टेंबर २०२५ रोजी पूर्णविराम मिळणार आहे. बीड जिल्ह्यातील नागरिकांनी रेल्वे सुरू होण्यासाठी गेल्या गेले ७५ वर्षांपासून संघर्ष केला. त्यांनी केलेल्या आंदोलन आणि संघर्षाला अखेर यश आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बीड ते अहिल्यानगर या शुभारंभ गाडीला हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला राज्याच्या पर्यावरण व हवामान बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे आणि विविध मान्यवर उपस्थित राहणार असून हा कार्यक्रम बीड रेल्वे स्थानकावर पार पडणार आहे. हा कार्यक्रम मराठवाडा मुक्ती संग्राम दिनासोबत साजरा होणार आहे. हा दि.१७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबादच्या निजामावर भारतीय सैन्याने मिळवलेल्या विजयाची आठवण करून देतो. या विजयामुळेच मराठवाड्याचा भारतीय संघराज्यात समावेश झाला होता. याच दिनाचे औचित्य साधून ही सेवा सुरु करण्यात येत आहे.
इतिहास नेमका काय ?
१९६५ या वर्षापासून बीडमध्ये रेल्वे येण्याची चर्चा सुरू होती. परळी-बीड-अहिल्यानगर रेल्वेमार्गासाठी सातत्याने मागणी होत होती. १९९५मध्ये तांत्रिक मान्यता देऊन हा मार्ग मंजूर करण्यात आला. बीडच्या दिवंगत नेत्या आणि तत्कालीन खासदार केशर काकू क्षीरसागर यांनी बीडसाठी पहिल्यांदा रेल्वेची मागणी केली. स्वर्गीय अमोल गलधर यांच्यासह रेल्वे कृती समितीने आंदोलनाचा लढा उभारला. त्यानंतर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी त्याचा पाठपुरावा केला. बीडचा रेल्वेप्रकल्प हे भाजपचे दिवंगत नेते आणि बीडचे भूमिपुत्र गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न होते. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर माजी खासदार प्रीतम मुंडे यांनीही यासाठी पाठपुरावा केला. तर, आता विद्यमान खासदार बजरंग सोनवणे यांच्या काळात ही रेल्वे बीडमध्ये येत असून बीडकरांच्या तीन पिढ्यांची स्वप्नपूर्ती होतानाचा दिवस अखेर उजाडला आहे.
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.