संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ७५ दुर्मिळ वृक्षांची लागवड ; पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते वृक्षारोपण

    17-Sep-2025   
Total Views |

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त ‘मुंबईचे फुफ्फुस’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बुधवार, १७ सप्टेंबर रोजी मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते भारतीय प्रजातीच्या दुर्मीळ वृक्षांची लागवड करण्यात आली. याप्रसंगी दै. मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेलार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

"या वृक्षांपैकी काही झाडे कीटक आणि फुलपाखरांना आधार देतात. काही झाडे पक्ष्यांना, तर काही झाडे छोट्या प्राण्यांना आधार देतात. त्यामुळे जीवनसाखळीचे चक्र पूर्ण होते. भारताच्या विविधतेने आपले शीर्षस्थ नेतृत्त्व म्हणून स्वीकारलेल्या नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी दुर्मीळ अशी सह्याद्रीच्या स्थानिक प्रजातींची ७५ झाडे लावणे आणि जैवविविधता सांभाळणे, अशी या वृक्षलागवडीमागची संकल्पना आहे. ही रोपे झाडे होतील आणि त्या झाडांचे वृक्ष होतील. वन्यजीवांच्या अनेक पिढ्या या वृक्षांचे लाभार्थी असतील. मोदीजींनी घडविलेला नवा भारतही त्यांच्या पुढच्या पिढ्यांसह अशाच प्रकारे वर्षानुवर्षे त्यांच्या कार्याचा लाभ घेत राहील," अशी भावना यावेळी मंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केल्या.

लागवड करण्यात आलेली दुर्मिळ वृक्षे कोणती?

"या उपक्रमांतर्गत ७५ दुर्मिळ वृक्षांची लागवड केली. यामध्ये कारपा, हुम्ब, वटसोल, सफेद धूप, चांदकुडा, उपास, तांबडा कुडा, आंबेरी, तिरफळ, मिरची कंद, फणशी, कडवा शिरीड, गोरखचिंच, कुमकुम, चारोळी, नांद्रूक, खडक पायर, दातीर, नागकेशर, सप्तरंगी, रानजांभूळ, समुद्रशिंगी, शेरस, रानबिबा, काळा धूप, वारंग अशा अनेक दुर्मिळ आणि स्थानिक प्रजातींचा समावेश करण्यात आला आहे.


अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....