शब्दसुमन ‘वीणा’

    16-Sep-2025   
Total Views |

साहित्य प्रवाहात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करतानाच, नव्या पिढीमध्ये विचारांचे संस्कार पेरणाऱ्या वीणा रारावीकर यांच्याविषयी...

साहित्य व्यवहाराला मानवी अनुभूतीची जोड लाभली की, श्रेष्ठ साहित्यनिर्मिती होते. वाचक नेहमीच ‘सकस’ साहित्याच्या शोधात असतात. माणसाच्या जीवनमूल्यांचे प्रतिबिंब ज्या साहित्यामध्ये उमटते, त्याच साहित्यकृतींचा लोकगौरव होतो. याच जीवनमूल्यांशी एकनिष्ट राहून, शब्दसुमनांची गुंफून करणार्या लेखिका म्हणजे वीणा रारावीकर. वीणा यांचा परिचय वाचकांना आहे तो एक लेखिका म्हणून. मराठी साहित्यिक वर्तुळात आपल्या लिखाणाच्या माध्यमातून वेगळा विचार पेरणारी लेखिका, अशी त्यांची ख्याती. मात्र, लेखिका म्हणून साहित्यपटलावर येण्यापूर्वीचा त्यांचा प्रवासही तितकाच समृद्ध आणि लेखकांसाठी प्रेरणादायीच आहे.

‘केल्याने देशाटन’ या उक्तीनुसार लहानपणीच त्यांनी, अनेक ठिकाणी प्रवास केला. प्रवासाची गोडी लागली आणि अनुभवांचे संचित वाढत गेले. आपल्या बालपणीचे अनुभव सांगताना वीणा म्हणतात की, "सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय खेळांच्या स्पर्धा दूरदर्शनवर एकत्र बघणे, हा आमच्या घरचा एक शिरस्ता होता. यातून विविध खेळांची माहिती व आवड लहानपणापासून होत गेली.” शिस्त, स्वालंबन आदी गोष्टींचे संस्कार त्यांच्यावर होत गेले. शालेय अभ्यासक्रमात उत्कृष्ट कामगिरी करत, त्यांनी आपल्यातील हुशार विद्यार्थीची चमक सगळ्यांना दाखवून दिली. दहावीला चांगले गुण मिळाले, याचा अर्थ त्या विद्यार्थ्याने विज्ञान शाखेकडे वळावे असा त्याकत्ळचा अलिखित नियमच! पदार्थविज्ञान (बीएससी), संगणक तंत्रज्ञान (बीएससीटेक) व व्यवस्थापन या विषयात पदव्युत्तर शिक्षण, असा वीणा यांचा शैक्षणिक प्रवास झाला आहे.

आई-वडिलांकडून मिळालेली आध्यात्मिक दृष्टी, पदवी शिक्षण, वाचन, अनेक चांगल्या मित्र-मैत्रिणींचा सहवास, यातूनच त्यांची वैचारिक बैठकही पक्की होत गेली. अशातच, त्यांना परदेशात काम करण्याची संधी मिळाली. "या संधीमुळे जीवनविषयक दृष्टिकोनामध्ये आमूलाग्र बदल घडला,” असे मत त्या व्यक्त करतात. सदाचाराचा विचार आणि कार्यसंकल्प हा त्यांच्या आईवडिलांकडून घरातूनच मिळाला होता. वीणा यांच्या आईंनी भारतीय लष्करामध्ये, परिचारिका म्हणून सेवा दिली होती. त्यांच्या आई आणि वडिलांनी मृत्यूपश्चात देहदान केले. देहदान या विचाराभोवती चुकीच्या समजुती पसरलेल्या होत्या. त्यामुळे त्यांचे कार्य अनेकांना दिशादर्शक ठरले. आपल्या आई-वडिलांकडूनच आपल्याला शुद्धतेचा संस्कार, परिपक्व विचार, योग्य आचार या तिन्ही गोष्टींची शिकवण लाभल्याचे वीणा सांगातात.

अशातच जीवनाच्या एका टप्प्यावर त्यांच्या अनुभूतीसंचिताचे रूपांतर शब्दांमध्ये झाले आणि त्यांच्यातील लेखिका हळूहळू घडत गेली. ‘कोविड’ काळात दर आठवड्याला नाशिकच्या रेडिओवरून त्यांचे एक छोटे भाषण प्रसारित होत होते. त्याचेच पुढे ‘आकाशवीणा’ हे पुस्तक ‘ग्रंथाली’ने प्रकाशित केले. त्याला माजी परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळ्ये यांची प्रस्तावना लाभली आहे. लघुकथा, ललित लेख, पाककृती, पुस्तक परीक्षणे असा विविधांगी लेखनप्रवास, त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला. नंतरच्या काळात त्यांच्या १०० शब्दांच्या १०० गोष्टी, असे ‘गुजगोष्टी शतशब्दांच्या’ हे पुस्तक प्रकाशित झाले. त्यांच्या या दोन्ही पुस्तकांवर अनेक पुरस्कारांचा वर्षाव झाला. त्यानंतर डॉ. डॅनियल आमेन यांच्या ‘यू हॅपिअर’ या पुस्तकाचा अनुवादही, मायमिरर पब्लिशिंग हाऊस तर्फे याच वर्षी प्रकाशित झाला. आनंदी जीवन जगण्यासाठी आवश्यक गोष्टींचा शास्त्रशुद्ध विचार मांडणार्या या पुस्तकाला, सध्या वाचकांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.

त्यांच्या साहित्याची योग्य ती दखल घेतली गेलीच परंतु, त्या व्यतिरिक्त त्यांचा यथायोग्य गौरवसुद्धा करण्यात आला. ‘महाराष्ट्र राज्य समरसता साहित्य परिषदे’तर्फे देण्यात येणारा, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे राज्यस्तरीय पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले. ‘राष्ट्रीय संत नामदेव साहित्य पुरस्कार’, ‘साहित्य विहार संस्था’, नागपूर यांच्यातर्फे देण्यात येणारा, ‘सुवर्ण महोत्सवी राज्यस्तरीय उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार’सुद्धा त्यांना प्रदान करण्यात आला.

‘महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालया’च्या शासनमान्य ग्रंथांच्या यादीमध्येही त्यांच्या पुस्तकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांच्या साहित्यकृतींच्या अभिवाचनाचे कार्यक्रमसुद्धा अनेक ठिकाणी पार पडले. सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुरा वेलणकर यांच्या ‘मधुरव’ या कार्यक्रमातदेखील, त्यांच्या साहित्याचा समावेश आहे. ‘संस्कार भारती’च्या माध्यमातून झालेल्या पुस्तक परिचयाच्या सत्रांमध्ये, वीणा यांच्या पुस्तकांचा समावेश आहे. आजच्या काळात वाचकांपर्यंत पोहोचण्याचा, त्यांच्याशी संवाद साधण्याचे माध्यम म्हणून अनेकांची पसंती दैनिकाला असते. वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये विविध विषयांवर लेखन करत, त्यांचे संवादसत्र सुरूच असते. त्याचबरोबर डिजिटल माध्यमांवरसुद्धा वीणा यांचा वावर आहे.

वीणा यांच्या मते, "स्त्रियांनी लेखन करताना, आपल्या अनुभवविश्वाशी प्रामाणिक राहून लेखन करावे.” होतकरू लेखकांना मार्गदर्शन करताना वीणा म्हणतात की, "लिहिण्याआधी विविध भाषांतील व प्रकारांतील वाचन करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जो लेखनप्रकार हाताळायचा आहे, त्याचेे शास्त्रशुद्ध शिक्षण घेणे किंवा माहिती करून घेणे गरजेचे आहे.” त्या लेखनप्रकारात जगभरात काय चालू आहे, याचे ज्ञान प्राप्त करून घेणे केव्हाही महत्त्वाचे ठरते. तारुण्य ही एक प्रभावी शक्ती व समर्थ अभिव्यक्ती यांची विलक्षण अवस्था आहे. त्याचा योग्य दिशेने व उत्स्फूर्त आविष्कार महत्त्वाचा असतो. तरुणांनी आपले विश्व समाजमाध्यमांपुरते मर्यादित न ठेवता, स्वतःचे व समाजातील इतर व्यक्तींचे आयुष्य घडवा, असे प्रभावी विचार लेखनातून मांडावेत.” वीणा रारावीकर यांना त्यांच्या पुढील लेखनप्रवासासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.