ग्रामीण विद्यार्थ्यांचा दीपस्तंभ

    16-Sep-2025   
Total Views |

ऊसतोड कामगाराचा मुलगा ते शिक्षण-सेवाक्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवत आज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी झटणार्‍या डॉ. दिपक टोणपे यांच्याविषयी...

आईबाबा ऊसतोड मजूर म्हणून काम करत असल्याने, सहा-सहा महिने गावाबाहेर राहात. मात्र, त्यांची तीन मुलं गावात राहायची. आईबाबांची वाट पाहातच या मुलांनी दिवस ढकलले. वर्ष २००० उजाडले तरीही, या कुटुंबाच्या घरात वीज नव्हती. एकेदिवशी आईबाबा घरी आले तेव्हा, चिमणीच्या प्रकाशात त्यांचा सात-आठ वर्षांचा मुलगा अभ्यास करत होता. त्याने पाहिले की, आईबाबांचे कपडे फाटले होते.,अंगावर जागोजागी खरचटलेे होते. वेदनेने ते तळमळत होते मात्र, आल्या आल्या दोघेही कामाला लागले. आई मुलांसाठी भाकरी बनवू लागली, तर बाबा घरातील छोटे-मोठे काम करू लागले. त्या मुलाने आईबाबांना खोदून खोदून विचारले तेव्हा आई डोळ्यात पाणी आणून म्हणाली, "लेकरा, आज आम्ही मरता मरता वाचलो. आज बैलगाडी रस्ता सोडून घरंगळली, आम्ही दूर फेकलोे गेलो. आम्हाला काही झालं असतं, तर तुमचं कसं झालं असतं?” तसेच, एवढी दुखापत झाली असूनही त्यांना पुन्हा ऊसतोडीसाठी जावेच लागणार होते. हे सगळे पाहून त्या मुलाने ठरवले की, "आपल्या आईबाबांचे दुःख दूर करण्यासाठी खूप शिकायचे.”

आज तोच मुलगा एका मान्यवर महाविद्यालयात प्राध्यापक आहे. त्यांचे नाव आहे डॉ. दिपक अमृत टोणपे. डॉ. दिपक यांनी ‘सोलार सेल’ या विषयात ‘पीएच.डी.’ केली असून, सामाजिक कार्यातही त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. मराठवाड्यातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, गरिबांच्या वस्तीमध्ये शिक्षणाचा टक्का वाढवण्यासाठी मेहनत घेण्याचे काम दिपक करत असतात. मराठवाड्यातील ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थी, छत्रपती संभाजीनगरमध्ये शिकायला येतात. त्यांना शहरात शिक्षण घेणे खर्चिकच असते. त्यामुळे वाढत्या खर्चामुळे हे विद्यार्थी खचतात, निराश होतात किंवा कुविचारांच्या जाळ्यात अडकतात. या विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचे काम डॉ. दिपक करतात. डॉ. दिपक विद्यार्थ्यांना सहज, सुलभ शिक्षण मिळावे यासाठी, पालकांच्या मायेने विद्यार्थ्यांची काळजी घेतात.

बीडच्या आष्टी चौगा निमगावातील अमृत आणि सुनिता टोणपे या उभयतांना, तीन अपत्ये. घरची गरिबीमुळेदोघे ऊसतोड कामगार म्हणून मजुरी करायचे. त्यांचा मुलगा दिपक लहान असल्यामुळे, वयाच्या सहा वर्षांपर्यंत त्यांच्यासोबत कारखान्याच्या परिसरातच राहात असे. ऊसतोड कामगारांचे जगणे, त्यांचे प्रश्न लहानपणीच दिपक यांनी स्वतः अनुभवले होते. पुढे शिक्षणासाठी दिपक आजी-आजोबांसोबत गावात राहू लागले.

आईबाबा दिवाळीच्या दोन-तीन दिवसांआधी, ऊसतोडीच्या हंगामासाठी गाव सोडायचे. सणासुदीच्या दिवशी लहानपणी दिपक यांनी कधीही आईबाबांना घरी पाहिलेले नाही. त्यामुळे सणासुदीचा फराळ, रांगोळी आणि फटाके असा उत्सव कधी त्यांना साजराच करता आला नाही. आईबाबांसोबत आपल्याला उत्सव साजरा करता यावा, त्यासाठी मेहनत करण्याचा विचार दिपक त्यावेळी करत. दिपक यांनी दहावीनंतर विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. तसे लहानपणापासूनच दिपक यांना शिक्षक व्हायचे होते. बारावीनंतर ‘डीएड’ केले की, शिक्षक म्हणून नोकरी मिळते याची त्यांना माहिती होती. पण, त्यासाठीच्या अर्जाची तारीख त्यांना, अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी समजली. शेवटचा दिवस म्हणून, अर्ज देणार्‍यांनी अर्जाची किंमत चारपट वाढवून ८०० रुपये सांगितली. इतके पैसे कुठून आणणार? शेवटी आईबाबांनी व्याजाने पैसे काढले, अर्ज आणला पण, त्यांचा नंबर लागला नाही, याचे त्यांना वाईट वाटले.

पण, दिपक यांना थांबायचे नव्हते. त्यांनी पुन्हा पुढचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली. शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी, ते स्वतः दुसर्‍यांच्या शेतात पडेल ते काम करू लागले. याच काळात त्यांचा संपर्क ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’शी आला. शहरात शिक्षणासाठी आलेल्या गरीब विद्यार्थ्यांच्या कोणत्याही समस्येचे निराकरण करताना, विद्यार्थी परिषदेला दिपक यांनी पाहिले होते. त्यामुळे ते ‘अभाविप’चे सक्रिय कार्यकर्ते झालेे. शेतात काम करता करताच त्यांनी, ‘पीएच.डी’चे शिक्षण सुरू केले. त्यांना फेलोशिपचे पैसे मिळाले. अत्यंत काटकसर करून त्यांनी शिक्षण सुरू ठेवले. पैसे वाचवून त्यांनी, त्या पैशातून आईबाबांचे कर्जही फेडले.

कष्टातून आणि वंचिततेतून शिक्षणाचा मार्ग किती काटेरी असतो, हे त्यांनी अनुभवले. पुढे त्यांच्या प्रयत्नाला यश येत प्राध्यापकाची नोकरीही त्यांनी मिळवली. कोरोना काळातही त्यांनी गावातील मुलांना-तरुणांना एकत्रित करून, त्यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले. दरम्यान निकिता या सुविद्य तरुणीशी त्यांचा विवाह झाला. डॉ. दिपक म्हणतात, "मी मराठवाड्यातील मराठा समाजाचा आहे. ग्रामीण भागात आजही समाजाचे प्रश्न ‘जैसे थे’च आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणाचा टक्का वाढावा, यासाठी आयुष्यभर काम करणार आहे.” डॉ. दिपक टोणपे यांचे विचार पाहून कुणालाही त्यांचा अभिमानच वाटेल. ऊसतोड मजुरांचा मुलगा ते समाजशील प्राध्यापक डॉ. दिपक टोणपे हा प्रवास सोपा नाही. ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी झटणार्‍या डॉ.दिपक टोणपे यांना दै. ’मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!

९५९४९६९६३८

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.