
मुंबई : नाशिक येथे शरद पवार गटाच्या वतीने सोमवार, १५ सप्टेंबर रोजी शेतकरी आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यावरून आमदार चित्रा वाघ यांनी त्यांना काही प्रश्न विचारत त्यांच्यावर निशाणा साधला.
चित्रा वाघ म्हणाल्या की, "शरद पवार साहेब शेतकऱ्यांबद्दल कळवळा दाखविल्याबद्दल आपले आभार. पण त्याचवेळी आपण कृषिमंत्री असताना काय केले आणि राज्यात ५५ हजारांहून अधिक शेतकरी आत्महत्या का झाल्या? हेही सांगितले असते तर बरे झाले असते. आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांची जलयुक्त शिवार योजना तुमच्या महाविकास आघाडीने स्थगित केली, तेव्हा तुम्हाला शेतकऱ्यांचा कळवळा नव्हता का? मराठवाडा वॉटर ग्रीड स्थगित केली तेव्हा तुम्हाला शेतकऱ्यांचा कळवळा नव्हता का? बांधावर ५० हजारांचे आश्वासन दिले आणि ते उद्धव ठाकरे यांनी पूर्ण केले नाही, तेव्हा तुम्हाला शेतकऱ्यांचा कळवळा नव्हता का?" असा सवाल त्यांनी केला.
त्या पुढे म्हणाल्या की, "आमच्या देवाभाऊंनी शेतकऱ्यांच्या जीवनात मोठे परिवर्तन घडवले आहे, घडवत आहेत. समृद्धी महामार्ग हा शेतकऱ्यांसाठी होता, तुम्ही त्याला विरोध करण्याचा पवित्रा घेतला. तुम्ही फक्त सत्तेचे राजकारण केले, पण राजकारण हा सेवेचासुद्धा भाव आहे. आपल्या राजकारणासाठी किमान आमच्या शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवू नका," असेही चित्रा वाघ म्हणाल्या.