नुकसान भरपाईचे पंचनामे सुरु; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

    15-Sep-2025   
Total Views |

नागपूर :
शेतकऱ्यांच्या पीकांच्या नुकसान भरपाईबद्दल काल मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सूचना दिल्या असून केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमानुसार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची शासनाची तयारी आहे. त्यानुसार, पंचनामे करणे सुरु झाले आहेत, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवार, १५ सप्टेंबर रोजी दिली.

बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीबद्दल बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "प्रत्येक समाजाची त्यांना न्याय मिळण्यासाठी मागणी येत असते. पण शेवटी आरक्षणाचे काही नियम आणि कायदे आहेत. कुठल्याही समाजाच्या आरक्षणात एखाद्या समाजाची नोंद करायची असल्यास केंद्र सरकारकडे पाठवावे लागते. त्यामुळे या मागणीविषयी बंजारा समाजाशी चर्चा करू."

"उद्धव ठाकरेंचा तोल घसरला असून आता काँग्रेसही त्यांना सोडून गेली हे त्यांना माहिती आहे. महाविकास आघाडीतील अनेक लोकांनी नाराज होऊन आपले तोंड फिरवले आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंनी मतांचे राजकारण करण्यासाठी केलेली खेळी फसली असून ते निराश झाले आहेत. म्हणून आता अशी वक्तव्ये करून ते आपली माजी मुख्यमंत्री म्हणून असलेली प्रतिमा मलिन करत आहेत. ते स्वत:ची उंची कमी करत आहेत," अशी टीकाही त्यांनी केली.

कार्यकर्त्यांना थांबवण्यासाठी पवारांचा प्रयोग

"शरद पवारांचे मोर्चा काढण्याचे कामच आहे. आमचे न्याय देण्याचे काम आहे. आम्ही शेतकऱ्यांना न्याय देऊ. निवडणूक आयोगाने यापूर्वी अनेकदा शरद पवारांना बोलवले होते. पक्षाच्या कार्यकर्त्यांना समजवण्यासाठी आता त्यांनी ईव्हीएमच्या डेमोचे दुकाम मांडले आहे. परंतू, निवडणूक आयोगाने अधिकृत नोटीस देऊन त्यांच्या हरकती मागवल्या असता कुणीही बोलले नाहीत. आता कार्यकर्त्यांनी दुसरीकडे जाऊ नये यासाठी केलेला हा प्रयोग आहे," असेही मंत्री बावनकुळे म्हणाले.

भूसंपादनाबाबत बोलताना ते म्हणाले की, "कोणत्याही शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही. प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणे मिळेल. त्यांचे मन दुखावेल असे काहीही राज्य सरकार करणार नाही. भूसंपादन करताना शेतकऱ्यांशी त्यांच्या दराविषयी चर्चा करू आणि ते समाधानी होतील असा मोबदला आम्ही त्यांना देऊ," अशी ग्वाही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.


अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....