पानिपतकार विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार ९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

    14-Sep-2025   
Total Views |

मुंबई : सातारा येथे पार पडणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. रविवार दि. १४ सप्टेंबर रोजी पुण्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य महमंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये एकमताने विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली. या बैठकीला उपाध्यक्ष गुरय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, मराठवाडा साहित्य परिषदेचे डॉ. दादा गोरे, रामचंद्र काळून्खे, देविदास फुलारी, मुंबई मराठी साहित्य संघाच्या प्रा. उषा तांबे, प्रकाश पागे, विदर्भ साहित्य संघाचे प्रदीप दाते, विलास मानेकर, मराठी साहित्य परिषद, तेलंगणाच्या डॉ. विद्या देवधर, छत्तीसगड मराठी साहित्य संघाचे कपूर वासनिक, मध्य प्रदेश मराठी साहित्य संघाचे पुरुषोत्तम सप्रे, मराठी वाड्मय परिषद, बडोदाचे संजय बच्छाव, गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे रमेश वंसकर हे घटक, समाविष्ट आणि संलग्न संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित राहू शकल्या नाहीत.

प्रा. जोशी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की " ‘घटक संस्थांनी तसेच महामंडळातील सर्व समाविष्ट, संलग्न संस्थांनी विश्वास पाटील यांचे नाव अध्यक्षपदासाठी अग्रक्रमाने सुचविले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेने संमेलनाचे आयोजन केले असल्याने पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने कोणाचेही नाव अध्यक्षपदासाठी सुचविले नाही. संस्थांकडून शिफारस करण्यात आलेल्या नावातून मराठी साहित्याचे दालन समृद्ध करण्यासाठी दिलेले योगदान विचारात घेऊन विश्वास पाटील यांची सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली."

सरस्वतीच्या सेवेसाठी नेहमीच तत्तपर!

"९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला याचा आनंदच आहे. माझ्या लिखाणाला रसिकांनी दिलेली ही पोचपावती आहे, त्यांच्यामुळेच हा साहित्यप्रवास समृद्ध झाला. तंत्रज्ञानाच्या आजच्या युगामध्ये आपले रसिक वाचक पुस्तकांपासून दूर जात आहेत, त्यांना साहित्य विश्वाशी जोडण्याचे काम येणाऱ्या काळात आपण करणार आहोत. प्रत्येक तालुक्यामध्ये किमान एक तरी पुस्तकाचं गाव उभं राहणं आवश्यक आहे. आपल्या साहित्यसंस्कृतीचा उत्कर्ष होत राहावा यासाठी सरस्वतीच्या सेवेसाठी मी नेहमीच तत्तपर असेन याची मी ग्वाही देतो."
- श्री. विश्वास पाटील, ज्येष्ठ कादंबरीकार

असे रंगणार ९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

-    दि. १ जानेवारी ते ४ जानेवारी २०२६ रोजी साताऱ्यातील शाहू स्टेडीयम येथे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडणार आहे.
-   ग्रंथदिंडी संमेलनाच्या उद्घाटनाच्या आदल्या दिवशी निघणार असून त्याच दिवशी दुपारी ग्रंथ प्रदर्शनाचे, कवीकट्टा आणि बालकुमारांसाठीच्या आनंद मेळाव्याचे        उद्घाटन होणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
-   ग्रंथ प्रदर्शनाचा वाचकांना ४ दिवस लाभ घेता येणार आहे.
-   वक्त्यांच्या भाषणांपेक्षा चर्चेतून परिसंवादातील विषयांना न्याय दिला जाणार आहे.
-   निमंत्रितांचे कविसंमेलन, समकालीन गाजलेल्या पुस्तकावरील चर्चा, मान्यवर लेखकांच्या मुलाखती, नामवंत कादंबरीकारांशी संवाद असे विविध दर्जेदार कार्यक्रम      होणार आहेत.
-   या संमेलनासाठी प्रथमच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सर्व पूर्वाध्यक्षांना, सरस्वती सन्मानप्राप्त लेखकांना, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त                निवडक लेखकांना तसेच साहित्य महामंडळाच्या माजी अध्यक्षांना निमंत्रित केले जाणार आहे.

विश्वास पाटील यांची ग्रंथसंपदा

१.पानिपत (राजहंस प्रकाशन - ४७वी आवृत्ती)
२. संभाजी ( मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे २२वी आवृत्ती)
३. पांगिरा:(राजहंस प्रकाशन-१९वी आवृत्ती)
४. झाडाझडती (राजहंस प्रकाशन-२७वी आवृत्ती)
५. लस्ट फॉर लालबाग (राजहंस प्रकाशन-तिसरी आवृत्ती)
६. क्रांतीसूर्य (मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे आठवी आवृत्ती)
७. महानायक ( राजहंस प्रकाशन, पुणे २६ वी आवृत्ती)

विश्वास पाटील यांच्या ग्रंथसंपदेला मिळालेला पुरस्कार

१९९० - महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार (पानिपत),
१९९२ – साहित्य अकादमी पुरस्कार (झाडाझडती)
१९९३ – राज्य शासन सर्वोत्तम कादंबरी पुरस्कार (पांगीरा)
१९९९ – राज्य शासन सर्वोत्तम कादंबरी पुरस्कार (महानायक)
२००५ – महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, सर्वोत्कृष्ट कादंबरी पुरस्कार (चंद्रमुखी)
२००९ – राज्य शासन चित्रपट समीक्षण पुरस्कार (नॉट गॉन विथ द विंड)


मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.