डोंबिवली : तिबोटी खंड्या हा पक्षी जखमी झाल्याने त्यावर पाॅज संस्थेकडून प्रथमोपचार करून त्याला पुन्हा निसर्गात सोडण्यात आले. हा पक्षी परतीच्या प्रवासाला जात असताना शहरातील कावळे च्या नजरेत पडला असून त्यानी हल्ला केल्याचा अंदाज पाॅज संस्थेचे संस्थापक निलेश भणगे यांनी व्यक्त केला आहे.
पावसाच्या सुरुवातीला महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीत आढळणारा हा पक्षी आहे. भूतान, श्रीलंका इ. देशातून दोन ते तीन महिन्यांसाठी हा पक्षी स्थलांतरित होवून येथे येतो. पावसाच्या सुरुवातीला आलेले हे पक्षी ऑगस्टमध्ये परतीच्या प्रवासाला निघतात.
एकदा का पाऊस सुरू झाला की, तिबोटी खंड्याला चाहूल लागते ती प्रणयाची. मादीला आकर्षित करण्यासाठी त्याची नृत्य वजा कोर्टशिप पाहण्याजोगी. तसेच मादीला रिझवण्यासाठी खाद्य भेट हे एक वैशिष्ट्य.!या भेटीत छोटे सरडे, कोळी, खेकडे, चोपई असे नानाविध प्रकार सामाविष्ट असतात. यानंतर मग मिलन होऊन नर मादी दोघे पण घरटे बांधायची सुरुवात करतात. सगळेच किंगफिशर हे जमिनीमध्ये खोदून त्यात घरटे करणारे आहेत. ओढ्याच्या काठाचा भाग छोट्या मातीच्या भिंती आणि बांध अशा ठिकाणी बीळ खोदतात. ओढ्यावरती वाकलेल्या फांदीवरून झेप घेऊन वेगाने चोचीच्या साहाय्याने माती खोदून पुन्हा त्याच वेगाने आपल्या जागी येऊन बसताना यांना खोदताना पाहणं एक पर्वणीच आहे. पाल, सापसुरळी, छोटे खेकडे, कोळी, बेडूक इत्यादी त्याचे आवडते खाद्य. जिथे वाहते पाणी आणि भुसभुशीत जमीन असेल तिथे एक मीटर लांबीचे घरटे तयार करून त्यामध्ये एका विणीच्या मोसमात तीन-चार अंडी घालतात. पिल्लू अंड्यातून बाहेर आल्यानंतर वीस दिवसात घरट्याबाहेर येतात तो पर्यंत त्यांची काळजी घेतली जाते.
२०२० मध्ये तिबोटी खंड्याला रायगड जिल्ह्याचा जिल्हापक्षी म्हणून घोषित करण्यात आले. पक्षीप्रेमींसाठी हा पक्षी खूप खास आहे आणि त्याचे फोटो काढण्यासाठी ते उत्सुक असतात. चक्रीवादळे आणि मानवी हस्तक्षेपामुळे त्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो. जखमी झालेल्या तिबोटी खंडयाला संस्थेचे ऋषिकेश सुरसे आणि ओंकार साळुंखे ह्यांनी प्रथमोपचार करून त्याला पुन्हा निसर्गात मुक्त केले आहे.