शाश्वततेसाठीची भटकंती

Total Views |

इलेक्ट्रिक वाहनांचे महत्त्व अधोरेखित करत शाश्वत वाहतुकीचा प्रचार, प्रसार करण्यासाठी भारतासह जगभरात भ्रमंती करणाऱ्या प्रफुल्ल कोल्हे यांच्या जीवनकार्याचा आढावा घेणारा लेख...

हैदराबादस्थित एक यशस्वी व्यावसायिक आणि उत्साही पर्यटक म्हणजे प्रफुल्ल कोल्हे. प्रफुल्ल कोल्हे हे खाद्यप्रेमीही आहेत. या आवडीबरोबरच इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या वापरातून शाश्वततेचा संदेश देत, ते त्यांचे सामाजिक भानही जपतात. मागील तीन वर्षांत प्रफुल्ल यांनी आपल्या ‘ईव्ही’ कारसह भारताची सीमा ओलांडून, लाखो किमीचा प्रवास केला आहे. जागतिक प्रवासाची आपली आवड जपत प्रफुल्ल यांनी, स्वच्छ वाहतूक उपायांमध्ये विश्वास निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘ईव्ही’ प्रवासमोहिमांची मालिकाच सुरू केली.

प्रफुल्ल हे हैदराबादस्थित ‘रिलेम अलॉयज प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचे संस्थापक आहेत. ही कंपनी ऊर्जा आणि रिलेमिंग, एएम (३डी) आणि ‘ईव्ही’ कचरा व्यवस्थापन आणि पुनर्वापर प्रक्रियेत क्रांती घडवून आणण्याच्या दिशेने काम करत आहे. याचसोबत रिलेम अलॉयज एएम कचरा व्यवस्थापनासाठी आणि लिथियम बॅटरी पुनर्वापरासाठीदेखील काम करते. याचसोबत प्रफुल्ल हे ‘ईव्ही’ चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी, आवश्यक पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातही कार्यरत आहेत.

२०२२ मध्ये प्रफुल्ल यांचा ‘ईव्ही’ वापर जनजगृती करण्याच्या उद्देशाने भारत आणि त्यापुढे जगभर भ्रमंती मोहिमेला सुरुवात झाली. २०२२ मध्ये त्यांनी स्वमालकीची ‘टाटा’ कंपनीची पहिली ‘ईव्ही’ घेतली. भारत आणि त्यापलीकडे असा हा अग्रगण्य प्रवास १७ हजारांपेक्षा अधिक किमीचा होता. प्रफुल्ल कोल्हे आणि त्यांचे मित्र आशिष अरोरा यांनी दि. २८ ऑटोबर २०२२ रोजी हैदराबाद येथून ही ‘ऑल-इंडिया ड्राईव्ह’ सुरू केली. त्यांनी ५२ दिवसांत १७ हजार किमी इतका प्रवास एका ‘ईव्ही’ कारद्वारे यशस्वीरित्या पूर्ण केला. यावेळी त्यांनी तेलंगण, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, श्रीनगर, लडाख मार्गे नेपाळ आणि भूतान असा हा प्रवास केला. प्रफुल्ल यांचा प्रवास सर्व राज्ये आणि लडाख वगळून सर्व केंद्रशासित प्रदेेश तर, भारताबाहेर नेपाळ आणि भूतानपर्यंत असा हा ५३ दिवसांचा प्रवास होता. ‘ईव्ही’ वापरास प्रोत्साहन देणारा असा हा भारतातील पहिलाच उपक्रम होता. या प्रवासासाठी प्रफुल्ल यांना पुण्यातील टाटाच्या कार्यक्रमात Electrified Explorer - Most Countries Travelled या पुरस्काराने गौरविण्यात आले. हा अत्यंत अभिमास्पद क्षण असल्याचे प्रफुल्ल सांगतात.

२०२२ मध्ये केलेल्या या प्रवासाला, जगभरातून मिळालेला प्रतिसाद आणि प्रोत्साहनातून, प्रफुल्ल यांनी २०२३ मध्ये एका नवीन ‘ईव्ही’ प्रवासाची आखणी केली. यावेळी त्यांचा प्रवास ‘कच्छ ते काझीरंगा : इंडिया हेरिटेज ड्राईव्ह’ असा होता. यामध्ये प्रफुल्ल यांनी १४ युनेस्को जागतिक वारसास्थळे आणि दहा राज्यांमधील राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या स्थळांना भेट दिली. हा प्रवास भूतकाळ आणि अधिक शाश्वत भविष्यातील सेतू म्हणून, नव्याने परिभाषित करण्याबद्दल असल्याचे प्रफुल्ल सांगतात. यावेळीचा प्रवास त्यांनी ‘महिंद्रा’ कंपनीच्या नव्या ‘महिंद्रा एक्सयुव्ही ४००’ या गाडीने केला. या प्रवासासाठी ‘महिंद्रा’ कंपनीने प्रफुल्ल यांना, नवीन एक्सयुव्ही ४०० दिली. अशा रितीने २०२३ मध्ये गुजरात ते आसामपर्यंतचा ८ हजार, २०० किमीपेक्षा अधिकचाअ प्रवासही प्रफुल्ल यांनी पूर्ण केला.

आता वर्ष २०२५-२६ मध्ये नव्या उद्दिष्टांसह, एक नवीन सहलीची आखणी प्रफुल्ल करत आहेत. यावेळी सहलीची टॅगलाईन ‘ईव्ही फॉर एव्हरीवन’ अशी असेल. यावेळी असणारी मोहीम पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडेल, परंतु यावेळी अधिक समावेशक दृष्टिकोनासह हा प्रवास असेल असे प्रफुल्ल नमूद करतात. या मोहिमेचे ध्येय सुलभ, दररोजच्या इलेट्रिक वाहनांचा वापर करून प्रगत तंत्रज्ञान, नव्याने उभारण्यात आलेल्या आवश्यक पायाभूत सुविधा यांमुळे आता कोणीही लांब पल्ल्याचा ‘ईव्ही’ प्रवास करू शकतो, हे सिद्ध करण्यासाठी प्रफुल्ल यावेळी मोहीम आखत आहे.

प्रफुल्ल आजपर्यंतच्या प्रवासाचे वर्णन करताना सांगतात, "या प्रवासांनी मला बॅटरी रेंज किंवा रस्त्यांच्या परिस्थितीच्या मर्यादांपेक्षा बरेच काही शिकवले आहे. त्यांनी गतिशीलतेचा खरा अर्थ काय आहे, हे समजून घेण्यास मदत केली आहे. गतिशीलता म्हणजे कनेशन, फक्त हालचाल नव्हे. तुम्ही भेटता त्या लोकांबद्दल, तुम्ही ज्या संस्कृतींकडून शिकता आणि तुम्ही मागे सोडता, त्या पाऊलखुणांबद्दल आहे. शाश्वतता ही एकट्याचा प्रयत्न नाही. खरा परिणाम समुदाय, सहकार्य आणि सामायिक उद्देशातून होतो. ‘ईव्ही’ ही केवळ भविष्यातील यंत्रे नाहीत. ती आजची साधने आहेत अशी साधने आहेत, जी नियमितपणे वापरात आल्यावर पद्धतशीर बदल घडवू शकतात. प्रत्येक किमीने माझा विश्वास दृढ केला आहे की, नवोपक्रम केवळ तेव्हाच परिवर्तन बनतो जेव्हा तो सर्वांसाठी उपलब्ध असेल. मी एक चांगले, स्वच्छ, अधिक जोडलेले जग निर्माण करण्यावर विश्वास ठेवणाऱ्या संस्था, कथाकार, नवोन्मेषक आणि बदल घडवणार्यांशी सहयोग करण्याचा प्रयत्न करीत आहे. जर हे तुमच्याशी सुसंगत असेल, तर माझ्याशी जोडले जा आणि आपण एकत्र बदल कसा घडवू शकतो, हे सर्वांना सांगायला मला नक्कीच आवडेल.” भारताची शाश्वत वाहतूक साधने आणि पर्यावरणरक्षण हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी खारीचा वाटा उचलणाऱ्या, प्रफुल्ल कोल्हे यांना त्याच्या पुढील मोहिमेसाठी आणि भ्रमंतीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून अनेकानेक शुभेच्छा!

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.