उबाठा गटाने ‘माझा लादेन, माझा पाकिस्तान’ अभियान राबवावे; नवनाथ बन यांचे टीकास्त्र

    13-Sep-2025   
Total Views |

मुंबई : ‘माझा देश माझं कुंकू’ नव्हे, तर उबाठा गटाने ‘माझा लादेन, माझा पाकिस्तान’ अभियान राबवावे, अशी खरमरीत टीका भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी शनिवार, १३ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेत बोलताना केली.

नवनाथ बन म्हणाले की, “संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना ‘माझा देश, माझं कुंकू’ म्हणण्याचा अधिकार नाही. त्यांनी अनेकदा पाकिस्तानप्रेम दाखवले आहे. त्यामुळे त्यांनी ‘माझा लादेन, माझे पाकिस्तान’ असे अभियान राबवावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे रक्षण करत आहेत आणि उद्धव ठाकरेंकडून मात्र, पाकिस्तानचा उदो-उदो होतोय. भारतीय सैनिकांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना धूळ चारली. पाकिस्तानला कंठस्थान घालण्याचे काम आपल्या जवानांनी केले. त्याच धर्तीवर उद्या आपल्या भारतीय क्रिकेटपटूंनी पाकिस्तानला पराभूत केल्याशिवाय राहणार नाही. आजवर पाकिस्तान जिंकल्यानंतर तुम्हाला आनंद होत आलेला आहे. पण यावेळी भारत जिंकेल तेव्हा मातोश्रीच्या बाहेर, सामनाच्या बाहेर आणि संजय राऊत यांच्या घरासमोर दणदणीत पद्धतीने फटाके फोडले पाहिजेत.”

औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवणार का?

“पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरमध्ये ९ हजार कोटींच्या विकास प्रकल्पांचा शुभारंभ करत आहेत. मात्र, संजय राऊत छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असून ते औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवतात का हे पाहण्यासाठी त्यांच्या दौऱ्याकडे लक्ष आहे. मोदीजी विकास करतात, तर राऊत समाजात फूट पाडण्याचे काम करत आहेत,” असेही ते म्हणाले.

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दहा वर्षांच्या कर्तृत्वामुळे महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरले. तर उद्धव ठाकरे अडीच वर्षांच्या कार्यकाळात अडीच दिवसही मंत्रालयात गेले नाहीत. महाराष्ट्राने देवेंद्रजींना तीन वेळा आशीर्वाद दिला, १३२ जागा निवडून दिल्या. याउलट ठाकरे गटाला १५ जागाही मिळवता आल्या नाहीत. त्यामुळे देवेंद्रजी सक्षम आहेत, तर उद्धवजी अकार्यक्षम, हेच यातून सिद्ध होते,” असेही ते म्हणाले.

पत्राचाळ घोटाळ्यावर पत्रकार परिषद घ्या

“पत्राचाळीत मराठी माणसाचे घर हिरावले गेले, लोक बेघर झालेत. या घोटाळ्यातूनच संजय राऊतांना १०० दिवस तुरुंगवास झाला. जर हिंमत असेल तर त्यांनी पत्राचाळ घोटाळ्यावर पत्रकार परिषद घ्यावी. त्या पत्रकार परिषदेचा संपूर्ण खर्च मी माझ्या वैयक्तिक पैशातून करतो,” असे आव्हानही नवनाथ बन यांनी संजय राऊत यांना दिले.

“संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा खून केला. ज्यांनी हिंदुत्व आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार रुजवला, राऊतांनी त्यांच्या विचारांचा विश्वासघात केला. औरंगजेबाचा उदो-उदो करण्याचे हे पाप महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही. राऊतांनी कितीही अराजकता माजवण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानेच चालतो,” असेही ते म्हणाले.

पगारी म्हणणे हा लाडक्या बहिणींचा अपमान


“लाडक्या बहिणींना फडणवीस सरकारने सन्मान निधी दिला. त्यांना ‘पगारी’ म्हणणे म्हणजे महिलांचा अपमान आहे. आमच्या लाडक्या बहिणी येणाऱ्या निवडणुकांमध्ये राऊतांना उत्तर देतील. खरेतर पगारी नोकर कोण आहेत हे महाराष्ट्राला माहिती आहे. राऊत सामनामधून उद्धव ठाकरेंची बाजू मांडतात आणि त्यासाठी पगार घेतात. त्यामुळे त्यांनी महिलांचा अपमान थांबवावा.”

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....