येत्या ३ वर्षांत आदिवासींच्या जीवनात आमुलाग्र परिवर्तन घडणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    13-Sep-2025   
Total Views |

यवतमाळ : महाराष्ट्रात आदिवासी समाजासाठी घरे, रस्ते, वीज, पाणी, वसतिगृह आणि रोजगार अशा सुविधांसाठी योजना-उपक्रम राबविण्यात येत असून, पुढील ३ वर्षांत आदिवासींच्या जीवनात आमुलाग्र परिवर्तन घडेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, १३ सप्टेंबर रोजी व्यक्त केला.

यवतमाळ येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एकूण ३३५ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन तसेच विविध उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आलाय यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, खासदार संजय देशमुख, आ. राजू तोडसाम, आ. किसनराव वानखेडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “केंद्र शासनाने आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक महत्वाच्या योजना हाती घेतल्या असून त्यासाठी देशात १ लक्ष कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. महाराष्ट्रातही आदिवासी समाजासाठी घरे, रस्ते, वीज, पाणी, वसतिगृह व रोजगार अशा सुविधांसाठी योजना-उपक्रम राबविण्यात येत असून, पुढील ३ वर्षांत आदिवासींच्या जीवनात आमुलाग्र परिवर्तन घडेल. आदिवासी समाजासाठी ५४ हजार कुटुंबांना घरे, नळांद्वारे पाणी, उपचारासाठी दवाखाने, वसतिगृह अशा अनेक सुविधा वेगाने पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी विकासासाठी ज्या योजना आणि उपक्रम आणले. आदी कर्मयोगी योजनेतून जिल्ह्यातील ३६६ गावांची निवड झाली आहे. या योजनेतून राज्यातील ३० लाख युवकांना प्रशिक्षित करण्यात येणार असून त्यातून स्थानिक नेतृत्वाचा विकास होणार आहे.”

सर्व शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देणार

“शासनाने अनुकंपा तत्वावरील सेवाप्रवेशाचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला. त्यात पंधरा हजार युवकांना अनुकंपातून नियुक्ती देण्यात येणार आहे. सुमारे ३५ मे. वॅट सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्याने शेतीला १२ तास दिवसा वीज मिळत आहे. शेतकऱ्यांना दिवसा दहा तास मोफत वीज देण्याचेही नियोजन आहे. यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांसाठी आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने निधीची कमतरता पडू देणार नाही. पावसाने जिल्ह्यात शेती, घरे, पशुधन यांचे नुकसान झाले. त्याची भरपाईही लवकरात लवकर अदा केली जाईल,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी यवतमाळ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन तसेच उपक्रमांचा शुभारंभ करण्यात. त्यात आदिवासी विकास विभागाची पाच वसतिगृहे आणि इतर कामे मिळून ५१ कोटी रुपये किंमतीच्या कामांचा समावेश आहे. तसेच बांधकाम विभागाची ६७ कोटींची कामे, मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजनेत ११ सौर ऊर्जा प्रकल्प आणि इतर कामांसाठी १५८ कोटी व इतर विविध विभागांच्या ५९ कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनातर्फे मिशन कॉम्पिटिटिव्ह एक्सलन्स, रोड मेंटेनन्स डिजीटल प्लॅटफॅार्म, ई-मित्र चॅटबॅाट, मिशन उभारी, समग्र डॅशबोर्ड, प्रोजेक्ट सॅन्ड मॅप, शासन आपल्या मोबाईलवर, सी. आर. एफ. ॲन्ड वार रुप डॅशबोर्ड यासह इतर विविध नाविण्यपूर्ण उपक्रमांचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यात अनुकंपा तत्वावर २७ उमेदवारांना सेवेत घेण्यात आले. त्यातील ४ उमेदवारांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.


अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....