सौरऊर्जेचा पर्वत

Total Views |

जगातील सात आश्चर्यांपैकी एक असणारी ‘ग्रेट वॉल ऑफ चायना’ आपण सर्वजण जाणतोच. मात्र, आता अपारंपरिक ऊर्जानिर्मितीला चालना देण्यासाठी आणि संपूर्ण जगाचे लक्ष वेधण्यासाठी चीनने, आणखी एक आविष्कार घडवत जागतिक विक्रम रचला आहे.

या स्वयंप्रकाशित झालेल्या मिंगशा पर्वताला, जगभरातून मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत आहेत. जागतिक आकर्षण असलेल्या निसर्गरम्य परिसरातील एकूण ४० हजार सौरऊर्जेवर चालणार्‍या दिव्यांनी, मिंगशा पर्वत प्रकाशमान केला आहे. यामुळे रात्रीच्या वेळी या वाळवंटाच्या आकर्षणात वाढ झाली आहे. या अनोख्या उपक्रमामुळे ‘एलईडी’च्या सर्वांत मोठ्या प्रदर्शनासाठीचा ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’, चीनने आपल्या नावे केला आहे. दि. २८ ऑगस्ट २०२५ रोजी मिंगशा पर्वत प्रकाशित करण्यासाठी, ३६ हजार, ८६२ इंटेलॅम्प सौरदिव्यांची एक विशेष साखळी गुंफण्यात आली. या प्रदर्शनाने जपानमध्ये लावलेल्या २४ हजार, ७६५ सौरदिव्यांच्या मागील विक्रमांना मोडले आहे. ‘इंटेलॅम्प’ ही चीनमधील एक नामांकित कंपनी असून, या कंपनीने २००४ साली सौरऊर्जानिर्मिती घटकांच्या निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला.

चीन जगातील ९० टक्क्यांपेक्षा जास्त सौरदिवे तयार करतो. इंटेलॅम्पने प्रकाशित केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमच्यासाठी हा विक्रम केवळ एक संख्या नाही. त्यांचा हा नवीन विक्रम, अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रातील चीनच्या विशाल क्षमतेवर प्रकाश टाकतो. जगभरात शाश्वत प्रकाश पर्याय प्रदान करण्याच्या त्यांच्या ध्येयाचीही पुष्टी करतो. चीनच्या राष्ट्रीय ऊर्जा प्रशासनाच्या मते, २०२४ साली चीनमध्ये युटिलिटी-स्केल सौरऊर्जा क्षमता ८८० गिगावॅटपेक्षा जास्त झाली. चीनमध्ये इतर कोणत्याही देशांपेक्षा जास्त युटिलिटी-स्केल सौरऊर्जा आहे.

नियोजित सौरक्षमता प्रकल्पांमुळे, चीनच्या सौरक्षमतेत सतत वाढ होण्याची चिन्हे आहेत. ग्लोबल सोलर पॉवर ट्रॅकरनुसार, चीनमध्ये ७२० गिगावॅटपेक्षा जास्तीचे सौरऊर्जा प्रकल्प विकासाधीन आहेत. सुमारे २५० गिगावॅट प्रकल्प बांधकामाधीन, जवळजवळ ३०० गिगावॅटचे पूर्वबांधकाम टप्प्यात आणि १७७ गिगावॅटचे प्रकल्प घोषित करण्यात आले आहेत. उद्योगाधीन सर्वांत मोठे प्रकल्प, उत्तर चीनमधील इनर मंगोलिया प्रदेशात आहेत. इनर मंगोलियामधील कुबुकी वाळवंट, ग्रेट सोलर वॉल या सौर प्रकल्पांच्या एका मोठ्या संग्रहाचे नियोजित ठिकाण आहे. २०३० सालापर्यंत पूर्ण होण्याचे नियोजन असलेल्या या ‘ग्रेट सोलर वॉल’च्या योजनांमध्ये, सुमारे १०० गिगावॅट स्थापित क्षमतेची तरतूद आहे. जी मंगोलिया आणि शेजारच्या प्रदेशांमध्ये, २५० मैलांपेक्षा लांब आणि तीन मैल रुंद क्षेत्र व्यापते.

ग्रेट सोलर वॉलच्या दोन घटकांतर्गत, मंगोलिया कुबुकी वाळवंट उत्तर आणि दक्षिण मेगाबेस अनुक्रमे सात गिगावॅट आणि सहा गिगावॅटच्या नियोजित स्थापित क्षमतेसह पूर्वबांधकाम टप्प्यात आहेत. चीनने जागतिक अक्षय ऊर्जानिर्मितीपैकी ३२ टक्के उत्पादन केले असून, त्यानंतर अमेरिका (११ टक्के), ब्राझील (७.० टक्के), कॅनडा (४.७ टक्के) आणि भारत (४.३ टक्के) यांचा क्रमांक लागतो. २०२२ मध्ये जागतिक स्तरावरची अक्षय गुंतवणूक जवळजवळ ५०० अब्जांपर्यंत पोहोचली, जी त्यावर्षी नवीन वीजक्षमतेच्या ८३ टक्के होती. अक्षय ऊर्जा उद्योग जवळजवळ १.४ कोटी लोकांना रोजगार देतो. २०२४ मध्ये चीनने इतर कोणत्याही देशापेक्षा, जास्त पवन ऊर्जा टर्बाइन आणि सौर पॅनेल बसवले. पॉलिसिलिकॉन आणि लिथियमसारख्या महत्त्वाच्या कच्च्या मालाच्या उत्खननावर कडक नियंत्रण असल्यामुळे, जागतिक हरित ऊर्जा शर्यतीत चीनने कशी प्रगती या आकडेवारीवरूनच अधोरेखित होते. जागतिक स्तरावर सौरऊर्जा बाजारपेठेत निवासी सौर पॅनेल स्थापनेत लक्षणीय वाढ होत आहे, ज्याचे प्रमुख कारण घरमालकांनी शाश्वतता आणि ऊर्जा स्वातंत्र्याला दिलेले प्राधान्य. ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीसारख्या देशांमध्ये सामूहिक सौर उपक्रमांना गती मिळत आहे. दरम्यान, वाढीव कार्यक्षमता आणि ऊर्जा साठवणूक प्रणालीसारख्या सौर तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे, सौर गुंतवणुकीचे आकर्षण वाढत आहे. सौरऊर्जेकडे होणारा बदल केवळ बदलत्या ग्राहक मूल्यांना प्रतिबिंबित करत नाही, तर या उद्योगातील भागधारकांनाही वेगाने विकसित होणार्‍या बाजारपेठेत विस्तारण्यासाठी मोठ्या संधीदेखील प्रदान करणारा ठरतो आहे.

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.