मुंबई : राज्यातील बारव आणि विहीरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी शनिवार, १३ सप्टेंबर रोजी केली. सांस्कृतिक विभागातर्फे त्यांनी तज्ञांसोबत बैठक घेऊन बारव संवर्धन, संरक्षण याबाबतचा आढावा घेतला.
मंत्री आशिष शेलार म्हणाले की, “समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार राज्यात ऐतिहासिक वारसा असलेल्या आणि पुराणकाळापासून ज्यांच्या नोंदी सापडतात अशा ३ हजारांहून अधिक बारव आहेत. या सगळ्यामध्ये ऐतिहासिक मूल्य सुद्धा आहेत. यात ज्यापद्धतीचे स्थापत्यशास्त्र वापरले आहे, त्या स्थापत्यशास्त्राचा नमुना जगात दुर्मिळ आहे. जलसंवर्धन आणि जलसंधारणाचे कार्यही होते आहे. त्या पाण्याची उपयोगिताही झाली पाहिजे. यासाठी राज्यभरातल्या जिल्हाशहा असलेल्या या सगळ्या बारव आणि त्यांच्या नोंदणीची आवश्यकता लक्षात येते. म्हणून या बारव जतन, संवर्धन आणि उपयोगिता याची स्पष्ट उद्दिष्ट्ये आणि हेतूदर्शित केलेला शासन निर्णय नव्याने जारी करण्यात येणार आहे. या सगळ्यामध्ये शासकीय यंत्रणेतील अधिकारी आणि जलसंधारणात ऐतिहासिक वारसा विषयामध्ये काम करणाऱ्या तज्ञांची समिती करण्यात येणार आहे,” असे त्यांनी सांगितले.
तसेच पहिल्या टप्प्यात जिल्हाशहा याचे सर्वेक्षण करण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यामध्ये या सगळ्यांचे दस्तावेजीकरण करण्यात येणार आहे. तसेच शासकीय नोंदीही करण्यात येणार आहेत. जिल्हाशहा तज्ञांनी काम केल्यावर या बारवाचे जतन, संवर्धन आणि उपयोगिता होईल याचे मार्गदर्शन आपण त्यामध्ये घेणार आहोत. तसेच सर्वेक्षणातल्या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यावर यापुढे राज्यभरात जिल्हाशहा यांची उपयोगिता आणि जतन, संवर्धन कसे केले पाहिजे याची लोकसहभागातून जास्तीत जास्त माहिती पोहोचवतील. पथनाट्य किंवा अन्य पद्धतीने त्याची कार्यपद्धतीसुद्धा स्पष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या तीन महिन्यात यातला प्राथमिक सर्वेक्षणाचा राज्यातल्या सर्व बारवांच्या नोंदीचा स्पष्ट अहवाल येईल,” असे मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले.