राम कथा ऐकणे म्हणजे जीवनाचा मार्ग प्रशस्त करणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    13-Sep-2025   
Total Views |

यवतमाळ : राम कथा ऐकणे म्हणजे जीवनाचा मार्ग प्रशस्त करणे. पिढ्यानपिढ्या आपण राम कथा ऐकत आलेलो आहोत. मात्र, मोरारी बापू यांच्या वाणीतून राम कथा ऐकणे, हे सहस्त्रनाम ऐकण्याचे सौभाग्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, १३ सप्टेंबर रोजी केले.

चिंतामणी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित मोरारी बापू यांच्या राम कथा प्रवचन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री संजय राठोड, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, खासदार संजय देशमुख, आमदार बाळासाहेब मांगुळकर, बळवंत वानखेडे, किशोर जोरगेवार, राजू तोडसाम, ॲड, आशिष देशमुख, रामकथेचे आयोजक डॉ. विजय दर्डा, राजेंद्र दर्डा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “राम कथा ही सर्वात सुंदर कथा आहे. त्यामुळे ही राम कथा ऐकणे म्हणजे जीवनाचा मार्ग प्रशस्त करणे आहे. राम कथेमध्ये संपूर्ण जीवनाची सुंदर शिकवण आहे. मोरारी बापू यांच्याकडून अर्थपूर्ण राम कथा ऐकायला मिळणे हा प्रत्येकासाठी सौभाग्याचा क्षण आहे. प्रभू रामचंद्राचे जीवन हे मर्यादेचे पालन करणारे आहे. त्यामुळे ते सर्वोत्तम मर्यादा पुरुष ठरले आहेत. राम कथा ही त्याग, तप, तेज, अनुशासन आणि भावनांचा संगम आहे. आज पाचशे वर्षानंतर प्रभू राम अयोध्येत त्यांच्या हक्काच्या ठिकाणी विराजमान झाले आहेत ही प्रत्येक भारतीयाला गौरव वाटणारी बाब आहे.”

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जवाहरलाल दर्डा यांच्या जीवनावर आधारित 'पेन ॲण्ड पर्पज' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री यांच्याहस्ते जवाहरलाल दर्डा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रकाशित शंभर रुपयांचे नाणे मोरारी बापू यांना समर्पित करण्यात आले.


अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....