मुंबई, भारतातील सर्वात मोठे कंटेनर पोर्ट असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाने (जेएनपीए ) शाश्वततेकडे पावले टाकत घोषणा केली आहे की, जेएनपीए-विशेष आर्थिक क्षेत्राने (एसईझेड ) आपल्या सर्व कामकाजासाठी १०० टक्के हरित ऊर्जेकडे यशस्वी संक्रमण केले आहे. या एसईझेडने दि. १ सप्टेंबरपासून प्रभावी ठरणाऱ्या ६.० मेगावॅट ग्रिड-कनेक्टेड पवन ऊर्जेच्या खरेदीसाठी नव्या अल्पकालीन ओपन अॅक्सेस करारावर स्वाक्षरी केली आहे. या करारान्वये वीज खरेदीचा दर केवळ रु.३.१२ प्रति युनिट (केडब्ल्यूएच) इतका कमी असेल.
या यशाबद्दल बोलताना जेएनपीएचे अध्यक्ष आणि व्हीपीपीएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक उन्मेष शरद वाघ म्हणाले, “जेएनपीएमध्ये आम्ही ठामपणे मानतो की शाश्वतता आणि प्रगती ही हातात हात घालून पुढे जायला हवी. आमच्या एसईझेडचे १००टक्के हरित ऊर्जेकडे झालेले संक्रमण हे जबाबदार व भविष्याभिमुख औद्योगिक परिसंस्था घडवण्याच्या आमच्या दृष्टीकोनाचे प्रतीक आहे. या हरित बदलाचे नेतृत्व करून जेएनपीए भारतातील शाश्वत, बंदर-केंद्रित औद्योगिक विकासाला गती देणारा आघाडीचा घटक असल्याची पुन्हा एकदा पुष्टी करत आहे. जेएनपीए एसईझेड आमच्या नोड-टू-नेटवर्क धोरणातील महत्त्वाचा दुवा आहे, ज्यामुळे आम्हाला टर्मिनल सेवांच्या पलीकडे जाऊन सर्वसमावेशक पोर्ट परिसंस्थेतील आमची भूमिका बळकट करता येते.”
एक परवानाधारक म्हणून, जेएनपीए एसईझेड वीज मंत्रालयाने निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, खुल्या प्रवेशाद्वारे ग्राहकांसाठी वीज खरेदी करते. ऑगस्ट २०२१ मध्ये स्थापन झाल्यापासून, एसईझेड पारंपारिक स्त्रोतांकडून ६.३० रुपये/केडब्ल्यूएच दराने वीज मिळवत आहे. हे संक्रमण पर्यावरणीय आणि आर्थिकदृष्ट्या एक महत्त्वाचा टप्पा आहे, ज्यामुळे खर्च कमी करताना हरित ऑपरेशन्स सक्षम होतात.