मुंबई : आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी राज्यातील सर्व सेक्टरमधील अडचणी समजून घेऊन आपली संस्था मजबूत नसली तरी आपली मार्गदर्शकाची भूमिका आहे. येणाऱ्या वर्ष-दोन वर्षाच्या काळात राज्य संघासह सर्व जिल्हा बोर्ड हे अत्यंत सक्षम झालेले असतील, असा विश्वास भाजपा गटनेते, मुंबई बँक आणि महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी शुक्रवारी मुंबई सहकारी बोर्डाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व्यक्त केला.
तसेच देशाच्या सहकाराला दिशा देण्याचे काम राज्याच्या सहकाराने केले. पण अलीकडच्या काळात आपण मागे जात राहिलो. ते गतवैभव पुन्हा राज्यातील सहकाराला आणायचेय. आतापर्यंत ग्रामीण भागातील लोकं सहकाराचे नेतृत्व करत होते. आता राज्याच्या सहकाराचे नेतृत्व मुंबईतील माझा सहकारातील कार्यकर्ता करेल, असेही दरेकर म्हणाले.
या प्रसंगी मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष आणि राज्य सहकारी संघाचे संचालक प्रकाश दरेकर, मुंबई जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष अनिल गजरे, मुंबई जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, संचालक नंदकुमार काटकर, नितीन बनकर, विष्णू घुमरे, जयश्री पांचाळ, जिल्हा सहकारी बोर्डाचे उपाध्यक्ष विजय केदारे, मानद सचिव विठ्ठलराव वाळुंज, सहसचिव श्रीधर जगताप, सहकारी जीवनचे संपादक आणि सहकार आघाडीचे अध्यक्ष सुनील बांबूळकर, सहकारी जीवनचे सहसंपादक अमोल खरात, जिल्हा सहकार विकास अधिकारी एस. एस. म्हात्रे यांसह मोठ्या संख्येने सहकारी संस्थांचे पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना आ. दरेकर म्हणाले कि, सहकाराच्या दृष्टीने मुंबई जिल्हा सहकारी बोर्ड आणि वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत महत्वाची असते. वार्षिक सर्वसाधारण सभेचा अर्थ वर्षभरात ज्यांच्यावर विश्वास टाकून संचालक मंडळ निवडले, ज्यांनी आपला लेखाजोखा आपल्या सभासदांसमोर मांडला. काही कमतरता असतील तर त्या सभासदांनी कराव्यात. पुन्हा हा डोलारा सक्षमपणे ताकदीने पुढे न्यावा, अशा उद्देशाने वार्षिक सभा होत असते.
दरेकर पुढे म्हणाले कि, सहकारासाठी झोकून देऊन काम केले पाहिजे. सहकार ही राज्याची मोठी ताकद आहे. मुंबईतील पतसंस्था, अर्बन बँका एकत्रित येऊन आखणी केली तर मुंबईचे चित्र बदलण्याची ताकद आपल्या सहकारात आहे. लाडक्या बहिणींसाठी आपल्या जिल्हा बँकेने उद्योग व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज योजना आणली. आज शेकडो महिलांना व्यवसायासाठी एक लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले आहे. हे शक्य झाले ते फक्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे, असेही दरेकर म्हणाले.
दरेकर पुढे म्हणाले कि, आज अनेक चांगल्या सूचना वक्त्यांनी केल्या आहेत. त्या सकारात्मक घेऊन काम करायला हवे. सकारात्मकतेनुसार येणाऱ्या काळात बदल करावा. हे व्यासपीठ मिळालेय त्याचा शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी उपयोग झाला पाहिजे. मुंबईत दोन तीन प्रशिक्षण केंद्रे आहेत. या प्रशिक्षण केंद्रातून आपण कोणते दर्जेदार प्रशिक्षण देतो? मुंबईसारख्या आर्थिक शहरात दर्जेदार प्रशिक्षण देत नसू तर आपले प्रशिक्षण घ्यायला कोण येईल? प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक घ्यावे लागतील. त्यांना प्रसंगी वेतन देण्याचीही व्यवस्था करू पण सहकाराच्या ताकदीच्या मार्गदर्शनाची गरज आहे. येणाऱ्या सहा महिन्यात तशा प्रकारचे चित्र बदललेले शंभर टक्के दिसेल, असा विश्वासही दरेकरांनी बोलताना व्यक्त केला.
दरेकर पुढे म्हणाले कि, एकमेकांच्या संस्थांना आम्ही ताकद देत नाही. त्यामुळे जी संघटित ताकद निर्माण व्हायला हवी होती ती दुर्दैवाने झाली नाही. आगामी काळात निश्चितपणे आपण वेगवेगळे प्रयोग करणार आहोत. मुंबईत स्वयं पुनर्विकास योजना सुरु केली. अनेकांना हे दिवास्वप्न वाटत होते, मात्र ते कृतीत उतरवून दाखवले. स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातून मोठमोठ्या घरात लोकं राहायला गेली आहेत. हा चमत्कार आपण सहकारातील लोकच करू शकतो, असे सांगत दरेकर पुढे म्हणाले कि, केवळ या वार्षिक सभेपूरते नाही तर भविष्यात मुंबईच्या सहकारासाठी जेव्हा आम्ही हाक मारू त्यावेळी आपण ताकदीने या. तुमच्या ताकदीवर मुंबईच्या सहकाराला गतवैभव नक्की आणू, असा विश्वासही दरेकरांनी व्यक्त केला.
मुंबईची अर्थव्यवस्था सहकाराच्या ताब्यात हवी
दरेकर म्हणाले कि, एक परिवार म्हणून आपण सहकारात काम करतो. तशाच पद्धतीने येणाऱ्या काळात काम करूया. सुदैवाने राज्यात सरकार आपले आहे. मी त्या सरकारला सहकारासाठी चार कामे सांगू शकतो. केंद्रातही पहिल्यांदाच सहकार खाते निर्माण झाले. केंद्र सरकारही सहकाराला ताकद देतेय. महाराष्ट्रातील सहकारा देशात प्रथम क्रमांकाचा होता. मुंबईत सहकारी संस्था ताकदवान, सशक्त झाल्या पाहिजेत. जिथे जबाबदारी घेतो तिथे त्या जबाबदारीचे पालन केले पाहिजे. स्पर्धेच्या बदलत्या युगात आपल्याला क्वालिटीशी तडजोड करता येणार नाही. मुंबईतील अर्थव्यवस्थेवर सहकाराचा पगडा हवा, मुंबईची अर्थव्यवस्था सहकाराच्या ताब्यात हवी, असेही दरेकर म्हणाले.
सहकार बोर्ड म्हणजे मुंबईतील सहकाराचा पालक
दरेकर म्हणाले कि, सहकार बोर्ड म्हणजे मुंबईतील सहकाराचा पालक होय. जसे पालक आपल्या मुलाबाळांना काय हवे-नकोय बघत असतात तसेच सहकार बोर्डाचे प्रत्येक संस्थेत लक्ष असले पाहिजे. तुम्हाला जे सहकार्य लागेल त्यासाठी मुंबई बँक मदत करेल. परंतु त्यासाठी मुंबई जिल्हा बोर्डाच्या संचालकांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहनही दरेकर यांनी यावेळी केले.