पालघर तालुक्यातील शेतकऱ्यांचा बारामतीतील 'ग्रीन गोल्ड' मार्गदर्शन शिबिरात उत्स्फूर्त सहभाग.

    13-Sep-2025
Total Views |


पालघर, रोटरी क्लब ऑफ पालघरच्या पुढाकाराने बारामती येथे आयोजित ‘ग्रीन गोल्ड’ शेतकरी मार्गदर्शन शिबिरात पालघर तालुक्यातील केळवे, मासवण, मनोर आणि किराट या भागांतील २० शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या शिबिरात आधुनिक शेतीतंत्रज्ञान, सेंद्रिय शेतीचे फायदे आणि उत्पादनवाढीच्या नव्या संधींबाबत शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. आधुनिक पद्धतीने शेती करताना पर्यावरणपूरक दृष्टिकोन कसा अंगीकारायचा, याचेही महत्त्व सांगण्यात आले.

या उपक्रमाचे आयोजन रोटरी क्लब ऑफ पालघरचे अध्यक्ष संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. क्लबचे सेक्रेटरी मनीष पिंपळे आणि अनिल पाटील यांनी शिबिरात प्रत्यक्ष उपस्थित राहून शेतकऱ्यांना विविध सत्रांमध्ये सक्रिय सहभागासाठी प्रेरित केले.

शिबिरातील अनुभवाबाबत बोलताना अनेक शेतकऱ्यांनी सांगितले की, “या शिबिरातून मिळालेल्या माहितीचा प्रत्यक्ष वापर आपल्या शेतात करून उत्पादन वाढवण्याचा निर्धार आम्ही केला आहे.”

रोटरी क्लब ऑफ पालघरचा हा उपक्रम ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पारंपरिक शेती आधुनिक, पर्यावरणपूरक शेतीकडे वळवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.