मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जेष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी शनिवार, १३ सप्टेंबर रोजी राजीनामा देत पक्षाला जय महाराष्ट्र केला. यावेळी कमीत कमी अपेक्षा ठेवूनही माझ्या वाट्याला उपेक्षाच आली, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.
गेल्या काही दिवसांपासून प्रकाश महाजन पक्षात नाराज असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर अमित ठाकरे यांनी प्रकाश महाजनांची समजूतही काढली होती. दरम्यान, आता शनिवारी त्यांनी फेसबूकवर एक व्हिडीओ प्रसिद्ध करत राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.
प्रकाश महाजन म्हणाले की, “गेल्या काही दिवसांपासून आपण कुठलेतरी आता थांबले पाहिजे ही भावना माझ्या मनात येत आहे. खरे म्हणजे मी गंगेला बोल लावला त्यावेळी किंवा पहलगामच्या वेळीच थांबायला पाहिजे होते. पण काहीतरी सुधारणा होईल, असे मला वाटले होते. माझ्या मनात अत्यंत कमी अपेक्षा आहेत. कुठल्याही पक्षात राहिलो तरी मला निवडणूकीच्या तिकीटाची किंवा कुठल्याही पदाची गरज नव्हती. फक्त हिंदूत्वाचा विचार जोपासला जावा एवढीच एक भावना होती. परंतू, कमीत कमी अपेक्षा ठेवूनही माझ्या वाट्याला खूप उपेक्षा आली. लोकसभेच्या रणधूमाळित मला कधी विचारण्यात आले नाही. विधानसभेच्या वेळीही प्रचारापुरते मला वापरण्यात आले. माझ्यावर दिलेली जबाबदारी मी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली. माझ्या कामाचे कौतूक नाही पण ज्या चूका माझ्या हातून झाल्याच नाही त्याचे बोल मला लावण्यात आले,” असे ते म्हणाले.
अमित ठाकरे यांना दिलेला शब्द पाळू शकलो नाही
“मी फक्त अमितजी यांचा थोडा अपराधी आहे. मी छत्रपती संभाजीनगरच्या सभेत त्यांना शब्द दिला होता की, मी तुमच्यासोबतच काय तुमच्या मुलासोबतदेखील काम करेन. पण दुर्दैवाने अशी परिस्थिती आली की, मी दिलेला शब्द पाळू शकत नाही. कधीकधी माणसाच्या क्षमतेप्रमाणे किंवा योग्यतेप्रमाणे त्याला मिळत नाही, हा नशीबाचा एक भाग मी समजतो. असंख्य मनसैनिकांनी माझ्यावर मनापासून प्रेम केले. ते वेळोवेळी माझ्यासाठी धावून आले, त्या सर्वांचा मी कायम ऋणी राहीन. पण मला आता आपण इथे थांबले पाहिजे आणि या मनोरुग्ण अवस्थेतून बाहेर आले पाहिजे असे वाटते. त्यामुळे मी आज थांबायचा निर्णय घेतला आहे,” असेही प्रकाश महाजन म्हणाले.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....