वसईत भाजपचं काँग्रेसविरोधात निषेध आंदोलन; राहुल गांधींच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया.

    13-Sep-2025
Total Views |

वसई, बिहार काँग्रेसकडून टेक्नॉलॉजीचा वापर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत मातोश्रीबाबत सोशल मीडियावर अपमानास्पद पोस्ट व्हायरल करण्यात आल्याचा आरोप करत, भाजपा महिला मोर्चाने आज वसई येथे आचोळे पोलिस ठाण्यासमोर जोरदार निषेध आंदोलन केले.

या आंदोलनाचं नेतृत्व भाजपा महिला मोर्चाच्या वसई-विरार जिल्हाध्यक्षा प्रज्ञा पाटील यांनी केलं. आंदोलन भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या निर्देशाने आयोजित करण्यात आले होते. आंदोलनात भाजपा आमदार राजन नाईक यांचीही उपस्थिती होती.

प्रज्ञा पाटील यांनी यावेळी सांगितले की, "मातृशक्तीचा अपमान करणाऱ्या काँग्रेस आणि राहुल गांधींना जनता कधीच माफ करणार नाही. भाजपा कार्यकर्ते अशा अध:पतन झालेल्या राजकारणाविरोधात ठामपणे लढा देतील."

आमदार राजन नाईक यांनी काँग्रेसवर टीका करत म्हटलं की, "मागील ११ वर्षांत देशात विकास आणि सुशासनाचे वातावरण आहे. त्यामुळे काँग्रेसकडे पंतप्रधानांविषयी बोलण्यासाठी कोणताही मुद्दा राहिलेला नाही. म्हणूनच ते खालच्या पातळीवरचं राजकारण करत आहेत. बिहार निवडणुकीत इंडी आघाडीचा पराभव निश्चित आहे."

या आंदोलनात जिल्हा व सर्व मोर्चा, सेल, प्रकोष्ठचे पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.