मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा असा अपमान होत असताना तुमची जीभ का गप्प आहे? असा सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना शुक्रवार, १२ सप्टेंबर रोजी केला.
कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने शिवाजीनगर स्टेशनचे नामांतर सेंट मेरी करण्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. केशव उपाध्ये म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराजांचा असा अपमान होत असताना तुमची जीभ का गप्प आहे? काँग्रेससोबत सत्तेच्या खुर्चीत बसताना तुम्ही शिवरायांचा वारसा विसरलात का? शिवसेनेच्या नावाने मत मागणारे उद्धव ठाकरे यांचे आज शिवाजी महाराजांच्या नावाच्या अपमानावर मौन का? स्वाभिमानाच्या गप्पा मारणारे शरद पवार, आज काँग्रेसच्या या षड्यंत्रावर तुमचा रोष कुठे हरवला?" असा सवाल त्यांनी केला.
जगभर फिरणारे राहुल गांधी रायगडावर कधी गेलेत का?"दिल्लीतील औरंगजेब मार्गाचे नाव तेच राहावे असा आग्रह धरणाऱ्या काँग्रेसला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रेम कुठून असणार? बेंगरुळू मेट्रोच्या शिवाजीनगर स्टेशनचे सेंट मेरी हे नामांतर करणे ही केवळ नावबदलापुरती लहान बाब नाही तर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काँग्रेसच्या मनात पंडित नेहरूपासून दडलेल्या खोलवरच्या वैराची प्रकट अभिव्यक्ती आहे. हिंदवी स्वराज्याचा इतिहास, संस्कृती आणि अस्मिता कधीच काँग्रेसला मान्य नव्हती, त्यांनी कधीही शिवाजी महाराजांना आपला आदर्श मानले नाही, म्हणूनच पं. नेहरूनी शिवाजी महाराजांचा उल्लेख ‘वाट चुकलेला' असा केला होता. त्यानंतर गेल्या ७० वर्षात काँग्रेसच्या बैठकीत शिवाजी महारांजाचा सन्मानाने उल्लेख कधी झाला आहे का? जगभर फिरणारे राहुल गांधी शिवाजी महाराजांच्या रायगडावर कधी गेलेत का?" असाही सवाल त्यांनी केला.
छत्रपती शिवाजी महाराज काँग्रेसचे आदर्श नाहीत
छत्रपती संभाजी नगरच्या नामकरणाला विरोध करण्याऱ्या काँग्रेसला दिल्लीतील औरंगजेब रस्त्याबद्दल मात्र, अचाट प्रेम होते. त्या रस्त्याचे अब्दुल कलाम मार्ग असे नामकरण करताना मात्र विरोध केला होता. कारण काँग्रेसचे आदर्श राष्ट्रनायक शिवाजी महाराज हे नाहीत. कर्नाटकातील नाव बदलाचे हे कृत्य केवळ शिवाजी महाराजांचा नाही तर संपूर्ण भारतीय अस्मितेचा अवमान आहे," असेही केशव उपाध्ये म्हणाले.