मुंबई : प्रभू रामचंद्रांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक शहराला बदनाम करण्याचे काम उबाठा गट आणि मनसेच्यावतीने करण्यात येत आहे. संजय राऊत ड्रग्जच्या विरोधात मोर्चा काढणार असतील तर त्यांनी दिनो मोरियाला सोबत घेऊन मोर्चा काढला पाहिजे, असा खोचक टोला भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी शुक्रवार, १२ सप्टेंबर रोजी लगावला.
नवनाथ बन म्हणाले की, "मनसे नेते बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे यांना माझी विनंती आहे की, या ड्रग्ज विरोधी मोर्चामध्ये संजय राऊत सहभागी होत असतील तर त्यांची आधी ब्लड टेस्ट करून घ्यावी. त्यानंतरच नाशिकमध्ये ड्रग्स विरोधात मोर्चा काढावा. या पवित्र शहराला बदनाम करण्याचे काम उबाठा गट करत असेल तर नाशिककर त्यांना जशास तसे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला ड्रग्सच्या विरोधात मोर्चा करायचा असेल तर त्याची सुरुवात वांद्र्यापासून केली पाहिजे आणि दिनो मोरियाला त्या मोर्चात सहभागी करून घेतले पाहिजे."
"गेल्या १५ वर्षापासून संजय राऊत उबाटा गटाचे नाशिकचे संपर्क प्रमुख आहेत. त्यांनी गुंडांना हाताशी धरून नाशिकला बदनाम केले. नाशिकचे राजकारण खराब करण्याचे काम त्यांनी केले. नाशिकच्या भूमीत राक्षसाच्या भूमिकेत येऊन संजय राऊत नाशिकला बदनाम करतात. पण तुम्ही कितीही मायावी असलेल्या मारीची भूमिका घेतली तरी नाशिककर तुम्हाला सडेतोड प्रत्युउत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत. ड्रग्सच्या विरोधात मोर्चा काढण्याचा तुम्हाला अधिकार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ड्रगच्या विरोधात कारवाई करण्याची भूमिका सातत्याने घेतली आहे. ड्रग्सचे व्यवहार करणाऱ्यांना शिक्षा देण्याचे काम हे केंद्रीय गृहमंत्रालय आणि राज्याचे गृहमंत्री देवाभाऊ अतिशय समर्थपणे करत आहेत. परंतू, तुम्ही नाशिकला बदनाम करणार असाल तर येणाऱ्या नाशिकच्या महापालिका निवडणुकीत नाशिककर जनता तुम्हाला जशास तसे उत्तर देईल," असेही ते म्हणाले.
कावळ्याच्या श्रापाने गाय मरत नाही"संजय राऊत सातत्याने महाराष्ट्रात अराजकता पसरवण्याचे काम करत आहेत. त्यांच्या डोक्यात आणि विचारांमध्ये अराजकता आहे. त्यांच्या विचारांची भेसळ झालेली आहे. आजपर्यंत प्रखर हिंदुत्ववादी भूमिका घेणारे संजय राऊत किंवा उबाठा गट यांची एवढी वैचारिक भेसळ झाली की, त्यांना नेपाळसारखी परिस्थिती महाराष्ट्रात घडवायची आहे. पण तुम्ही कितीही अशा बाता केल्या तरी कावळ्याच्या श्रापाने गाय मरत नाही."
२५ वर्षांत कितीदा जनतेतून निवडून आलात?"संजय राऊत आजपर्यंतच्या २५ वर्षाच्या राजकीय कार्यकर्दीत एकदा तरी जनतेतून निवडून आलेले आहेत का? राज्यसभेच्या निवडणुकीत ते फक्त अर्ध्या मतांनी निवडून आलेत. येणाऱ्या काही दिवसांत मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यावेळी संजय राऊत यांनी वॉर्ड ठरवावा, त्या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचा सर्वसामान्य कार्यकर्ता संजय राऊत यांच्या विरोधात जनतेमधून निवडून येईल. त्यांची एवढीच खुमखूमी असेल तर पक्षाने संधी दिली तर मीदेखील त्यांच्या विरोधात वॉर्डमध्ये निवडणूक लढवण्यास तयार आहे. खरी जनता कुणाच्या पाठीशी आहे हे कळेल. त्यानंतर संजय राऊत यांनी जनतेच्या गप्पा माराव्या," अशी टीकाही त्यांनी केली.
जनाब उद्धव ठाकरे निषेध करणार का?"कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्टेशनचे नाव बदलण्याचा नालायकपणा काँग्रेसच्या सरकारने केला. जनाब उद्धव ठाकरे याचा निषेध करणार आहेत का? जनाब संजय राऊत आणि छोटे मिया आदित्य ठाकरे या घटनेचा निषेध करणार आहेत का? जोपर्यंत ते या घटनेचा निषेध करणार नाहीत तोपर्यंत त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाबद्दल उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसची साथ सोडली पाहिजे. अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत उबाठा गटाचा धुव्वा उडवल्याशिवाय राहणार नाही," असेही नवनाथ बन म्हणाले.