मुंबई : मुंबईत जैन समुदायाच्या ऐतिहासिक रथयात्रेचे आयोजन करण्यात आले असून यातून श्रद्धा, शिस्त आणि एकतेचे दर्शन घडणार आहे. या सोहळ्यात सुमारे एक लाख जैन उपासक विश्वशांतीचा संदेश देणार असल्याची माहिती रथयात्राचे आयोजक मुंबई जैन संघाचे पदाधिकारी मुकेश जैन यांनी दिली. या ऐतिहासिक रथयात्रेत कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत.
रथयात्रेचे स्वरूप कसे असणार?दि. १४ सप्टेंबर रोजी दक्षिण मुंबईतील सी.पी. टँक येथून सकाळी ९ वाजता या भक्ती सोहळ्याच्या रथयात्रेला सुरुवात होणार असून पुढे सिक्कानगर, खेतवाडी, प्रार्थना समाज, ऑपेरा हाऊस, गावदेवी, ऑगस्ट क्रांती मैदान, मथुरादास हॉल आणि गोवालिया टँक भागात या यात्रेचा समारोप होईल.
गेल्या पाच वर्षांपासून श्री मुंबई जैन संघ संघटनेच्या वतीने या भव्य रथयात्रेचे आयोजन करण्यात येते. यात जैन उपासक मोठ्या भक्तीभावाने जिनशासनाचे अनुयायी म्हणून सहभागी होतात. विश्वबंधुता आणि शांतीचे प्रतीक असणारी ही रथयात्रा असून या ऐतिहासिक रथयात्रेत कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. तसेच हजारों श्रावक-श्राविका शिस्तबद्ध आणि भक्तिभावाने रथयात्रेत मार्गक्रमण करणार असल्याची माहिती संघाचे पदाधिकारी आशिष शहा यांनी दिली.
रथयात्रेचे वैशिष्ट्य काय?जैन धर्माच्या २४ तीर्थांकरांच्या भव्य प्रतिमेसह सजवलेल्या रथांची शोभायात्रा हे या सोहळ्याचे वैशिट्य ठरणार आहे. तसेच भगवान महावीर स्वामी यांची भव्य २० फुटी प्रतिमा संपूर्ण यात्रेत रथावर विराजमान असणार असून त्या प्रतिमेवर मनमोहक पुषवृष्टी करण्यात येणार आहे. शहरातील विविध दोनशेपेक्षा जास्त जैन संघ एकत्र आल्याने संस्कृती आणि एकात्मतेचे भव्य दर्शन यावेळी घडणार आहे. त्याचबरोबर चारशेपेक्षा अधिक पूज्य साधु-साध्वी आणि हजारों विद्यार्थी यात्रेत सहभागी असतील. तसेच भक्तीमय संगीतासाठी १५ पेक्षा जास्त धार्मिक वाद्यवृंद आणि धार्मिक संदेश देणारी ५५ पेक्षा अधिक चलचित्र हे या रथ यात्रेचे आकर्षण ठरणार आहेत. भगवान महावीर स्वामींच्या २५५१ निर्वाण महोत्सवाच्या अंतर्गत रथयात्रेदरम्यान विविध उपक्रम राबवले जाणार असून सकल प्रीतिभोजनाचेही आयोजन करण्यात आले असल्याचे श्री मुंबई जैन संघ संघटनेचे पदाधिकारी आशिष शहा यांनी सांगितले. या रथ यात्रेला ऐतिहासिक करण्यासाठी श्री मुंबई जैन संघ संगठनेचे वीरेंद्र शाह, घेवरचंद बोहरा, नितीन व्होरा,राकेश शाह, जयेश भाई लब्धी यांच्यासह अन्य कार्यकर्ते कार्यरत आहेत.