करवतीची धार पुढे सरली तरी कापते, मागे सरली तरी कापते, असे म्हणतात. याचा अर्थ काही गोष्टी केल्या, तरी नुकसान होते आणि नाही केल्या तरीही नुकसान होते. उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि महाविकास आघाडी या त्रिकुटाची सध्या अशीच काहीशी चलबिचल अवस्था! विशेषतः उद्धव ठाकरे तर अलीकडे फारच सैरभैर झालेले दिसतात. मनसे की मविआ, असा गहन प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी ते सतत धडपडत आहेत. मग कधी ‘शिवतीर्था’वर बैठका, तर कधी ‘मातोश्री’वर बंद दाराआड चर्चा असे सगळे सुरू आहे.
असाच एक भेटीचा योग बुधवारी राज ठाकरेंच्या निवासस्थानी ‘शिवतीर्था’वर जुळून आला. तब्बल अडीच तासांच्या या भेटीत राज ठाकरे आणि मविआचा समतोल कसा साधता येईल, यावर उद्धव ठाकरेंची चर्चा झाल्याचे समजते. संजय राऊतांनी ठाकरे बंधूंच्या या भेटीला कौटुंबिक भेटीचे लेबल लावले असले, तरी या वाढत्या गाठीभेटींमध्ये आगामी पालिकेच्या निवडणुकीची समीकरणांवरुन काथ्याकूट सुरु आहे, हे निश्चित!
वास्तविक, आजवर उबाठा गटाने किती पक्षांसोबत आघाड्या केल्या आणि आजवर त्यातील किती टिकून आहेत, हा संशोधनाचाच विषय. त्यात आता पुन्हा एका नव्या युतीच्या आशेने निघालेल्या उद्धव ठाकरेंची द्विधा मनःस्थिती झालेली दिसते. नवी युती केली, तर जुनी युती रुसेल आणि जुनी युती कायम ठेवली, तर महापालिका ताब्यात घेणे अवघड होईल. त्यामुळेच यातून मध्यम मार्ग काढण्यासाठी त्यांची ही उठाठेव.
काँग्रेस आणि मनसे यांच्यातील विस्तवही जात नाही, हे जगजाहीर असताना काँग्रेसला वगळून आघाडी स्थापन करता येईल का? यासाठीचे मनसुबे आखणे उद्धव ठाकरेंनी सुरू केल्याचे समजते. दुसरीकडे, राज ठाकरे मविआत आल्यास पुढची भूमिका काय, यावर आम्ही चर्चा करू, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी सांगून टाकले. त्यामुळे आता एका म्यानात दोन तलवारी राहतील का? हा पहिला प्रश्न आणि राज ठाकरेसुद्धा युतीच्या नादात आणि पालिकेच्या मोहापायी आपल्या बंधूंच्या पावलावर पाऊल ठेवतील का? हा दुसरा प्रश्न. यांची उत्तरं मात्र येणारा काळच देईल!
डबलढोलकीचे पुढारी
अबुधाबी येथे भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामना रंगणार होणार आहे. हा सामना उबाठा गटाला मान्य नसून त्याच्या निषेधार्थ महिला आघाडीकडून ‘माझे कुंकू माझा देश’ असे आंदोलन करण्यात येणार आहे म्हणे. दस्तूरखुद्द संजय राऊत यांनीच याबाबतची माहिती दिली. एकेकाळी ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव ठेवून सैनिकांच्या अभियानात तुम्ही धर्म का आणता, असा उफराटा प्रश्न विचारणारे राऊत अचानक त्यांच्या पक्षाच्या आंदोलनाला ‘माझे कुंकू, माझा देश’ असे नाव देतात म्हणजे नवलच!
शिवाय पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या, असे मृतांच्या नातेवाईकांनी वारंवार ओरडून ओरडून सांगितले असताना त्याला विरोध करणारेही राऊतच! ‘ऑपरेशन सिंदूर’वर टीका करण्यातही ते आघाडीवर आणि पहलगाम हल्ल्यावरून सरकारला धारेवर धरायला तर सर्वांत पुढे. मग या सगळ्यात राऊतांनी कितीतरी वेळा आपल्या बौद्धिक क्षमतेचे दर्शनच घडवले. खरेतर, राऊतांनी या आंदोलनाची माहिती देताना ‘सिंदूर की रक्षा में शिवसेना मैदान में’ वगैरे वल्गनाही केल्या. परंतु, नेमका आताच हा पुळका कशासाठी?
दोन दिवसांपूर्वी नेपाळमध्ये जे घडले ते भारतातही घडू शकते, असे बेताल विधान संजय राऊतांनी परवाच केले. आपलेच दात आणि आपलेच ओठ असे म्हणतात. खरेतर, नेपाळची तुलना भारताशी करून राऊतांना नेमके काय साध्य करायचे? हा मोठा प्रश्न. शिवाय ही तुलना करण्यापर्यंत त्यांची मजल जावी आणि त्यानंतर लगेच आंदोलनाची वगैरे हाक द्यावी, यामागचा गौडबंगाल न समजण्यासाठी जनता आंधळी नाही. असो!
खरेतर, मुंबई महानगरपालिकेसाठीची ही तुमची नौटंकी सगळेच ओळखून आहेत. शिवाय पालिकेसाठी वाट्टेल ते, अशी तुमची अवस्थाही मंजूर आहे. पण, मुळात प्रश्न हाच की, संजय राऊत अजून किती काळ ही डबलढोलकी वाजवत बसणार? कधीतरी कुठल्या एका म्हणण्यावर ठाम राहा, एकदा घेतलेल्या भूमिकेवर अडून राहा म्हणजे झाले, अन्यथा, या डबलढोलकीच्या एक ना धड भाराभर चिंध्या होण्यास वेळ लागणार नाही.