महाराष्ट्रात उद्योग आणि गुंतवणूकदारांना पोषक इको सिस्टिम उपलब्ध : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    11-Sep-2025   
Total Views |

मुंबई : ‘इज ऑफ ड्युईंग बिझनेस’ अंतर्गत महाराष्ट्रात उद्योग आणि गुंतवणूकदारांना पोषक इको सिस्टिम उपलब्ध असून उद्योग आणि गुंतवणुकीसाठी हे सर्वोत्तम राज्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, ११ सप्टेंबर रोजी केले.

जियो वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे इंडिया-ऑस्ट्रेलिया बिझनेस अँड कम्युनिटी अलायन्स (आयएबीसीए) ग्लोबल फोरम लिडर्स मीट आणि सीईओंसोबत राऊंटटेबल कॉन्फरन्स वेळी ते बोलत होते. यावेळी पणन मंत्री जयकुमार रावल, ऑस्ट्रेलियाचे उच्चायुक्त फिलीप ग्रीन, उद्योग विभागाचे सचिव पी. अन्बलगन यांच्यासह विविध उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "गुंतवणूकदार आणि उद्योजकांच्या राज्य शासनाकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तत्पर असून राज्य शासन विविध क्षेत्रांविषयी नवीन धोरण आखत आहे. येत्या काळात १४ क्षेत्रांसाठीची धोरणे जाहीर होणार आहेत. त्यामध्ये सेवा क्षेत्राचा समावेश आहे. राज्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये सेवा क्षेत्राचा मोठा वाटा आहे. उद्योजकांना गुंतवणूकदारांना अडचणी येऊ नयेत सर्व परवानग्या लवकर प्राप्त करता याव्यात यासाठी मैत्री पोर्टल निर्माण करण्यात आले आहे. एक खिडकी योजना असून उद्योजकांना राज्यात गुंतवणूक करताना चांगला अनुभव यावा यासाठी प्रयत्नशील आहे."

शासन उद्योग आणि गुंतवणूकदारांसाठी सकारात्मक

"इज ऑफ ड्युईंग बिझनेस मध्ये नव्याने सुधारणा करण्यात येत असून गुंतवणुकीच्या नवीन संकल्पना राबवण्यात येत आहेत. राज्यात एक्सप्रेस वे चे जाळे उभारले जात आहे. वाढवण बंदरामुळे राज्य सागरी व्यापार क्षेत्रात महत्वाचा भागीदार असणार आहे. संपूर्ण राज्यातील महत्त्वाची ठिकाणे सहा तासाच्या अंतराने वाढवण बंदराशी जोडली जात आहेत. राज्यात सांडपाणी व्यवस्थापन, त्यावरील प्रक्रिया, सौर ऊर्जा, पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीच्या मोठ्या संधी आहेत. त्याचा ऑस्ट्रेलियातील उद्योगांनी फायदा घ्यावा. या क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी पुढाकार घ्यावा. पुणे येथे नवीन विमानतळ उभारण्यात येत आहे. त्यामुळे पुणे शहराच्या विकासाला आणखी गती मिळेल. पुण्यात जलद वाहतुकीसाठी पायाभूत सुविधांचे नवनवीन प्रकल्प उभारण्यात येत आहेत. शासन उद्योग आणि गुंतवणूकदारांसाठी सकारात्मक निर्णय घेत आहे," असे त्यांनी सांगितले.


अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....