ओली यांचा भारतविरोधी द्वेष कायम! राजीनाम्यानंतर आली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, "मी भारताला आव्हान ..."

    11-Sep-2025   
Total Views |

काठमांडू : (KP Sharma Oli blame India nepal political crisis) नेपाळमध्ये सरकारविरोधात झालेल्या हिंसक निदर्शनांनंतर सत्तेतून बेदखल झालेले माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. यात त्यांनी भारतविरोधी विधान केले आहे. ओली यांनी भारतावर संताप व्यक्त करत शाब्दिक हल्लाबोल केला आहे. केपी शर्मा ओली हे सध्या नेपाळी सैन्याच्या संरक्षणाखाली शिवपुरी बॅरेकमध्ये राहत असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली.

ओली काय म्हणाले?

माध्यमांमधून समोर आलेल्या वृत्तानुसार, केपी शर्मा ओली यांनी त्यांच्याच पक्षाच्या सरचिटणीसांना एक पत्र पाठवले आणि त्यात त्यांनी भारताविरुद्ध भाषण केले. ओली म्हणाले की, "जर मी लिपुलेखवर प्रश्न उपस्थित केले नसते तर मी पदावर असतो. मी संवेदनशील मुद्द्‌यांवर भारताला आव्हान देण्याचे धाडस दाखवले आणि हे त्याचेच परिणाम आहेत." ओली एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी पुढे आरोप केला की, “अयोध्या आणि प्रभू रामचंद्रांबद्दलच्या भूमिकेची राजकीय किंमत चुकवावी लागली आहे. मी अयोध्येत राम जन्माला विरोध केला म्हणून मला सत्ता गमवावी लागली” असा दावा केपी शर्मा ओली यांनी केला. ‘भगवान प्रभू राम भारतीय नाहीत. ते नेपाळी होते’ “नेपाळमध्ये बीरगंजच्या पश्चिमेला भगवान राम यांची अयोध्या आहे. भारताने एक वादग्रस्त अयोध्या निर्माण केलीय” अशी वक्तव्य ओली यांनी केली होती. ओली यांनी लिपुलेख हा नेपाळचा असल्याचा दावा केला होता.

लिपुलेखचा वाद काय आहे?

लिपूलेख हा भारत-नेपाळमधील वादग्रस्त सीमावाद आहे. काळ्यापाण्याच्या आस-पासच हे क्षेत्र आहे. दोन्ही देश काली नदीच्या उगमावरुन असहमत आहेत. ही नदी लिपूलेखच्या उत्तर-पश्चिमेला लिंपियाधुरा येथून उगम पावते असा नेपाळचा दावा आहे. त्यामुळे कालापाणी आणि लिपूलेख या भागात येतात. भारताच म्हणणं आहे की, ही नदी कालापानी गावापासून सुरु होते. त्यामुळे हा उत्तराखंडचा भाग आहे.




अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\