चिंतामणीच्या सेवेकऱ्याला गाण्याच्या माध्यमातून मानाचा मुजरा!

    11-Sep-2025   
Total Views |

मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव देशभरातल्या भाविकांसाठी चर्चेचा विषय असतो. हा गणेशोत्सव उत्साहात साजरा होतो तो बाप्पाच्या सेवेतील सेवेकऱ्यांमुळे आणि त्यांच्या अविरात श्रमामुळे. चिंचपोकळीचा चिंतामणी हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान. नवसाला पावणाऱ्या आपल्या या बाप्पाला भेटण्यासाठी अनेक जण आतुर असतात. त्यांच्या दर्शनाची ही अनुभूती सुखाची ठरते ती कार्यकर्त्यांमुळे. चिंतामणीच्या चरणी मागच्या दोन दशकाहून अधिक काळ अविरत सेवा देणारे व्यक्तिमत्व म्हणजे पांडुरंग मोरे उर्फ पांड्या मामा. मागच्या तीन दशकांहून अधिक काळ चिंतामणीच्या सेवेमध्ये जीवन व्यतीत करणारे सगळ्यांचे लाडके पांडुरंग मोरे अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.

पांडुरंग मोरे यांच्या कार्याला सलाम करणारे एक आगळे वेगळे गीत मयेकर फिल्सच्या माध्यामतून साकारण्यात आले आहे. 'सुखकर्ता मोरया' या गाण्यामध्ये पांडुरंग मोरे यांच्या सेवाकार्याला वंदन करण्यात आले आहे. केवल वालंज यांच्या आवाजातून व विपुल शिवलकर यांच्या शब्दसुमनांमधून साकारलेले हे गीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. दृकश्राव्य माध्यमातून गीताचे दिग्दर्शन प्रथमेश अवसरे यांनी केले आहे, तर या गीतामागची पटकथा पराग सावंत यांनी लिहीली आहे. पांडुरंग मोरे यांच्या भूमिकेत काम केलेले शशिकांत दळवी यांनी सुद्धा अत्यंत तन्मयतेने आपली भूमिका वठवल्याचे पाहायाला मिळते.

"पांडुरंग मोरे यांचे कार्य प्रकाशझोतात येणे गरजेचे"

"पांडुरंग मोरे मागचे ३५ ते ४० वर्ष, चिंचपोकळीच्या चिंतामणीची मनोभावे सेवा करत आहेत. अनेक वर्षांपासून माझी अशी इच्छा होती की त्यांचं काम लोकांसमोर आलं पाहिजे. चिंचपोकळीचा चिंतामणी हा विषय केंद्रस्थानी ठेवून, मग आम्ही म्युझिक व्हिडीओ तयार करण्याचा विचार केला, जो आज लोकांच्या पसंतीस उतरला आहे. निस्वार्थी भावाने बाप्पाची आराधना करणारे, सेवा करणारे पांडुरंग मोरे, हे आपल्या समाजाचे खरे आधारस्तंभ आहेत "
- मयुरेश मयेकर, निर्माता.

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.